Monday, March 16, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : ऐसा वरिपडिलां प्रयाणकाळीं, बुद्धीतें भ्रमु न गिळीं...

Dnyaneshwari : ऐसा वरिपडिलां प्रयाणकाळीं, बुद्धीतें भ्रमु न गिळीं…

अध्याय आठवा

यत्र काले त्वनावृत्तिमावृत्ति चैव योगिनः ।  प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥23॥

तेवींचि आणिकेंही एकें प्रकारें । हें जाणतां आहे सोपारें । तरि देह सांडितेनि अवसरें । जेथ मिळती योगी ॥204॥ अथवा अवचटें ऐसें घडे । जे अनवसरें देह सांडे । तरि माघौतें येणें घडे । देहासीचि ॥205॥ म्हणोनि काळशुद्धी जरी देह ठेविती । तरी ठेवितखेवीं ब्रह्मचि होती । एऱ्हवीं अकाळीं तरी येती । संसारा पुढती ॥206॥ तैसें सायुज्य आणि पुनरावृत्ती । ये दोन्ही अवसराआधीन आहाती । तो अवसरु तुजप्रती । प्रसंगें सांगों ॥207॥ तरि ऐकें गा सुभटा । पातलिया मरणाचा माजिवटा । पांचै आपुलालिया वाटा । निघती अंती ॥208॥ ऐसा वरिपडिलां प्रयाणकाळीं । बुद्धीतें भ्रमु न गिळीं । स्मृति नव्हे आंधळी । न मरे मन ॥209॥ हा चेतनावर्गु आघवा । मरणीं असे टवटवा । परि अनुभविलिया ब्रह्मभावा । गंवसणी होऊनि ॥210॥ ऐसा सावध हा समवावो । आणि निर्वाणवेऱ्हीं निर्वाहो । हें तरीच घडे जरी सावावो । अग्नीचा आथी ॥211॥ पाहां पां वारेन कां उदकें । जैं दिवियाचें दिवेपण झांके । तैं असतीच काय देखे । दिठी आपुली ॥212॥ तैसें देहांतींचेनि विषमवातें । देह आंत बाहेरि श्लेष्मा आते । तैं विझोनि जाय उजितें । अग्नीचें जेव्हां ॥213॥ ते वेळीं प्राणासीचि प्राणु नाही । तेथ बुद्धि असोनि करील काई । म्हणोनि अग्नीविण देहीं । चेतना न थरे ॥214॥

हेही वाचा – Dnyaneshwari : पाहें पां तरंग होत जात, परि तेथ उदक तें अखंड असत…

अर्थ

हे भरतश्रेष्ठा, तथापि कोणत्या काळी देहावसान झाले असताना योगी अनावृत्तीप्रत जातात (जन्ममरणापासून मुक्त होतात) आणि (कोणत्या काळी देहावसान झाले असताना) आवृत्तीप्रत (पुनर्जन्माप्रत) जातात, तो काळ सांगतो. ॥23॥

त्याचप्रमाणे आणखीही एका प्रकाराने हे (निजधाम) जाणणे सोपे आहे. तरी योगी लोक योग्य काळी देहत्याग करून जेथे प्राप्त होतात (ते माझे निजधाम होय), ॥204॥ अथवा, अकस्मात असे घडते की, योग्याचा देह अयोग्य काळी पडला तर, त्याला पुन्हा जन्माला यावे लागते ॥205॥ म्हणून योग्यांनी योग्य काळी देह ठेवला तर, देह ठेवताक्षणीच ब्रह्म होतातं; एरवी त्यांनी जर अयोग्य काळी देह ठेवला तर, ते पुन्हा संसाराला येतात. ॥206॥ त्याप्रमाणे मद्रूप होणे आणि जन्ममरणाच्या फेर्‍यात सापडणे, हे दोन्ही ठराविक मरणवेळेच्या आधीन आहेत. आता प्रसंगानुसार त्याच काळासंबंधाने विचार तुला सांगतो. ॥207॥ तर अर्जुना ऐक, मरणाचा जोर प्राप्त झाला असता, शेवटी पंचमहाभूते आपापल्या वाटेने निघतात. ॥208॥ असा मरणकाळ प्राप्त झाला असताना बुद्धीला भ्रम गिळीत नाही, स्मरणशक्ती आंधळी होत नाही, आणखी मन मरत नाही. ॥209॥ याप्रमाणे हा सर्व इंद्रियसमुदाय मरणसमयी टवटवीत असतो, पण तो अनुभवलेल्या ब्रह्मस्थितीला आकलन केल्यामुळे प्रसन्न असतो. ॥210॥ याप्रमाणे हा इंद्रियसमुदाय सावध असणे आणि तो त्याचा सावधपणा शेवटपर्यंत टिकणे, हे जर अग्नीचे सहाय्य असेल तरच घडेल. ॥211॥ असे पाहा की, वार्‍याने अथवा पाण्याने जेव्हा दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो, तेव्हा (शाबूत) असलेली आपलीच दृष्टी पाहू शकते काय? ॥212॥ त्याप्रमाणे देह पडण्याच्या वेळी होणार्‍या त्रिदोषाने देह आतबाहेर कफाने व्यापला जातो, त्यावेळी जेव्हा अग्नीचे तेज विझून जाते ॥213॥ त्यावेळी प्राणासच क्रियाशक्ती नसते, मग तेथे बुद्धी असून काय करील? म्हणून अग्निशिवाय शरीरात चेतना (ज्ञानकला) टिकत नाही. ॥214॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : हिंवाचिया झळुका, जैसें हिंवचि पडे उष्णोदका…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!