Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari :  एऱ्हवीं त्रैलोक्य हें धनुर्धरा, तिये गांवींचा गा पसारा...

Dnyaneshwari :  एऱ्हवीं त्रैलोक्य हें धनुर्धरा, तिये गांवींचा गा पसारा…

अध्याय आठवा

शारदीयेचिये प्रवेशीं । अभ्रें जिरती आकाशीं । मग ग्रीष्मांतीं जैशीं । निगती पुढती ॥162॥ तैशी ब्रह्मदिनाचिये आदी । हे भूतसृष्टीची मांदी । मिळे जंव सहस्त्रावधी । निमित्त पुरे ॥163॥ पाठीं रात्रींचा अवसरु होये । आणि विश्व अव्यक्तीं लया जाये । तोही युगसहस्त्र मोटका पाहे । आणि तैसेंचि रचे ॥164॥ हें सांगावया काय उपपत्ती । जे जगाचा प्रळयो आणि संभूती । इये ब्रह्मभुवनींचिया होती । अहोरात्रामाजीं ॥165॥ कैसें थोरिवेचें मान पाहें पां । तो सृष्टिबीजाचा साटोपा । परि पुनरावृत्तीचिया मापा । शीग जाहला ॥166॥ एऱ्हवीं त्रैलोक्य हें धनुर्धरा । तिये गांवींचा गा पसारा । तो हा दिनोदयीं एकसरां । मांडत असे ॥167॥ पाठीं रात्रींचा समो पावे । आणि अपैसाचि सांठवे । म्हणिये जेथिंचें तेथ स्वभावें । साम्यासि ये ॥168॥ जैसें वृक्षपण बीजासि आलें । कीं मेघ हें गगन जाहालें । तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ॥169॥

परस्तस्मात् तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात् सनातनः । यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥20॥

तेथ समविषम न दिसे कांहीं । म्हणोनि भूतें हे भाष नाहीं । जेविं दूधचि जाहालिया दहीं । नामरूप जाय ॥170॥ तेविं आकारलोपासरिसें । जगाचें जगपण भ्रंशे । परि जेथें जाहालें तें जैसें । तैसेंचि असे ॥171॥ तैं तया नांव सहज अव्यक्त । आणि आकारावेळीं तेंचि व्यक्त । हें एकास्तव एक सूचित । एऱ्हवीं दोनी नाहीं ॥172॥

हेही वाचा – Dnyaneshwari : जें दुर्मतीचें मूळ, जें कुमार्गाचें फळ…

अर्थ

शरद् ऋतूच्या आरंभीं ज्याप्रमाणे ढग आकाशात नाहीसे होतात आणि नंतर ग्रीष्म ऋतूच्या शेवटी जसे ते पुन्हा उत्पन्न होतात ॥162॥ त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी हे भूतसृष्टीचे समुदाय, हजार चौकड्यांच्या काळाचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होत राहातात. ॥163॥ मग रात्रीचा वेळ होते आणि विश्व अव्यक्तात लीन होते. तीही हजार चौकड्यांची रात्र अंमळ उजाडली की, पूर्वीप्रमाणे जगत् उत्पन्न होऊ लागते. ॥164॥ हे सांगावयास कारण काय तर, ब्रह्मलोकाच्या एका दिवसरात्रीमध्ये जगाची उत्पत्ती आणि संहार होतात. ॥165॥ ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण कसे आहे! पाहा की, जो सृष्टीरूपी बीजाचे साठवण आहे, पण तोही पुनरावृत्तीच्या मापाला शीग (टोक) झाला. ॥166॥ हे अर्जुना, एरवी तर, हा जो त्रैलोक्याचा विस्तार, तो त्या ब्रह्मदेवाच्या गावचा दिवस उजाडल्याबरोबर एकदम रचला जातो. ॥167॥ मग रात्रीचा वेळ प्राप्त झाला की, तो (त्रैलोक्याचा पसारा) आपोआप लीन होतो, (व तो) जेथून उत्पन्न झाला, तेथे स्वभावत: साम्याला येतो, असे म्हणतात. ॥168॥ ज्याप्रमाणे झाड बीजरूपाला येते, अथवा ढग हे आकाशरूप होतात, त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जेथे समावेश होतो, त्यास साम्य असे म्हणतात. ॥169॥

पण वर सांगितलेल्या अव्यक्तापलीकडचे दुसरे जे सनातन अव्यक्त तत्व आहे, ते सर्व भूते नाहीशी झाली तरीही नाहीसे होत नाही. ॥20॥

तेथे (त्या साम्यावस्थेत) सम (एकसारखे एक) विषम (एकाहून एक भिन्न) हे काही दिसत नाही. म्हणून (त्या साम्यावस्थेस) भूते असे म्हणता येत नाही. ते कसे तर ज्याप्रमाणे दूध हे दही झाल्यावर त्याचे दूध हे नाव आणि पातळपणाचे स्वरूपही जाते ॥170॥ त्याप्रमाणे आकार नाहीसा झाल्याबरोबर जगाचा जगपणा नाश पावतो. पण जग जेथून झाले, ते अव्यक्त जसेच्या तसेच असते. ॥171॥ त्यावेळी त्य़ास (साम्यावस्थेस) सहज अव्यक्त असे म्हणतात आणि आकाराला आले म्हणजे त्यास व्यक्त (जग) असे म्हणतात. व्यक्त आणि अव्यक्त ही दोन्ही नावे एकाच्यामुळे दुसरे, अशी सापेक्ष दिलेली आहेत. विचार करून पाहिले तर, स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव नाहीत. ॥172॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : जैं चोकडिया सहस्त्र जाये, तैं ठायेठावो विळुचि होये…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!