डॉ. विवेक वैद्य
संध्याकाळ संपत आलेली… तो तिची वाट पाहत तयार होऊन बसलाय… ती येते घाईघाईत… त्याच्याकडे ‘सॉरी’ या अर्थाने बघते… म्हणते,
“शॉवर घेऊन येते.”
तो मान डोलावतो. ती तयार होऊन येते.
“आज जरा साधीच साडी नेसली, मऊ स्पर्शाची, भरजरी नको आणि मोजकेच दागिने घातले… खूप गरम होतय ना म्हणून!”
“Relax. मी कुठे काही म्हटलंय? कदाचित, दिवसभर खूप काम केल्याने होत असेल गरम…” त्याचा स्वर समजदारीचा!
“हो रे. आज अजिबात फुरसत नव्हती… करू तयारी?”
“मी करून ठेवलीय तयारी… नेहमीप्रमाणे!” तो मिश्किलपणे म्हणतो. ती लाडीक कटाक्ष टाकते.
“बरं मॅडम, आज दिवसभरात तुमच्याशी बोलणे नाही झाले, तुम्ही बिझी असल्याने… पाडव्याचे काय गिफ्ट हवे राणीसाहेबांना?”
ती विचारात पडते… अंतर्मुख होऊन… आपला डॉक्टरी पेशा, त्यात गायनकोलॉजिस्ट. कसलीच नियमितता नाही… ना निश्चित जेवण्याची वेळ, ना झोपण्याची, ना कोणत्या कामाची… कधी शॉर्ट ट्रिप ठरवावी किंवा हॉटेल, मूव्ही नवऱ्याबरोबर जाण्याचे ठरवावे तर, डिलिव्हरीचा पेशंट ठरलेला! तरीही, कधीही नाराज ना होता, स्वतःची नोकरी सांभाळून जमेल तितके घरकाम करतो. कधीच कटकट नाही, उलट आपण कधी वैतागल्यावर गमतीने म्हणतो, “अगं, देवाला काय माहीत की डॉक्टर मॅडमला रविवारी संध्याकाळी बाहेर जायचे असते म्हणून! नाहीतर त्याने प्रसववेदना सोमवारी सुरू केल्या असत्या…”
नेहमीच खंबीरपणे आपल्यामागे उभे राहणाऱ्या नवऱ्याचा तिला अभिमान वाटला. आणखी काय हवे?
“काय विचार करतेयस एवढा? काय पाहिजे?”
ती त्याच्याकडे डबडबलेल्या डोळ्यांनी पाहात, म्हणते…
“अशीच तुझी साथ पाहिजे!”
हेही वाचा – सुख सुख म्हणजे काय असतं?
तो रिलॅक्स असतो. मस्त फ्रेश होऊन छान झब्बा घालतो. तिने आठवणीने काढून ठेवलेली सोन्याची चेन घालतो… अंगठी घालतो… (एरवी ग्लोव्हज् घालताना ती नडते म्हणून तो कधीच अंगठी घालत नाही.) तीही ठेवणीतली भरजरी साडी नेसते… चार दागिने घालते… त्याला ओवाळण्यासाठी तबक तयार करायला घेते तेवढ्यात… त्याचा मोबाईल वाजतो. ती थबकते. पुढे काय होणार याचा तिला अंदाज आलेला असतो.
“इमर्जन्सी?” तो फोनवर बोलत असतो… “हो, हो, लगेच निघतो.”
तो घाईघाईत गळ्यातील चेन आणि हातातील अंगठी काढून तिच्याकडे देतो. उतरलेल्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहात अपराधी स्वरात म्हणतो, “सॉरी हनी, पेशंटला सेटल करून येतो, नंतर करूया पाडवा…!”
ती मनात म्हणते, ‘तुझ्याशी गाठ बांधली तेव्हाच याची तयारी ठेवली होती.’ ती त्याच्या हातावर थोपटते अन् म्हणते, “ये जाऊन. आज एक जीव वाचला तर त्याच्या सगळ्या कुटुंबाची दिवाळी चांगली जाईल….”
हेही वाचा – दिवाळी पहाट अन् फोन कॉल…
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


