नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला…
‘माणूस एक माती’ नावाच्या एका मराठी सिनेमात मी काम केलं. त्यात सिद्धार्थ जाधवने माझ्या मुलाची भूमिका केली होती. गणेश यादव, स्वप्निल राजशेखर, रुचिता जाधव आणि बरेच मातब्बर कलाकार होते. साधीच कथा होती. सिनेमा खूप छान झाला होता. फार चालला नाही, पण ज्यांनी ज्यांनी बघितला त्या प्रत्येकाचं मत होतं की, सिनेमा छान झालाय. माझं काम पण मस्त झालंय. ऐकून एकदम खूश व्हायला होत होतं. सिनेमा कौटुंबिक होता. सिनेमागृहात रडारड होतच होती…
सिनेमाचा प्रीमियर होता. सगळी टीम, पाहुणे, मोठ-मोठे कलाकार हजर होते. त्यात एक नुकताच प्रसिद्ध झालेला पब्लिकचा लाडका ॲक्टर सपत्नीक हजर होता. बायकोशी ओळख करून दिली… तिने वाकून नमस्कार केला आणि सिनेमा सुरू होतोय म्हटल्यावर सगळे हॉलमध्ये जायला निघाले. मध्यंतर झाल्यावर सगळे बाहेर आले. भारावले होते सगळे. सिनेमाबद्दलच बोलत होते. चहा, समोसा खाऊन सगळे जण पुन्हा हॉलमध्ये शिरले.
हेही वाचा – अभ्यास एके अभ्यास… पाठ सोडेना!
सिनेमा संपल्यावर बरेच जण रडत, मुसमुसत बाहेर येत होते. सगळे जण भेटून, कौतुक करत निघून गेले… तो मुलगा आणि त्याची बायको काही कुठे दिसले नाहीत. थोडंसं खटकलं. मध्यंतरात एवढं कौतुक करणारे लोक न भेटताच निघून कसे गेले? थोड्या वेळाने विसरून गेले.
दुसऱ्या दिवशी त्याच मुलाचा कॉल आला! मनात म्हटलं, ‘आता कशाला कॉल करतोय हा? काल तर निघून गेला काही न सांगता.’
समोरून त्याचा आवाज… ‘ताई खूप खूप सॉरी. मी सिनेमा संपल्यावर तुम्हाला न भेटता, न बोलता निघून गेलो. सिनेमा खूप सुंदर आहे. तुमचं काम अप्रतिम… खूप रडलो आम्ही दोघे… आणि सॉरी बोलायला म्हणून निघून गेलो… माझे आई, बाबा नेरळला राहतात. मी सिनेमा संपल्यावर गाडी सरळ नेरळला जाऊन थांबवली. घरच्या अंगणात पोचलो. रडू अनावर होत होतं. बेल वाजवली. बाबांनी दार उघडलं. मध्यरात्री 2-2.30 वाजता मला दारात बघून ते घाबरले. काहीच सुचत नव्हतं त्यांना! कारण मी घरी जाण्यापूर्वी त्यांना येतोय, हे कायम कळवायचो. असा अचानक दारात उभा राहिलो तर, आई, बाबा घाबरणारच नं? ते दोघे दारात उभे होते आणि त्यांना बघून मी त्याच्या पायावर कोसळलो. खूप रडलो… त्या दोघांनाही काही कळेच ना की, याला काय झालंय? बायको आम्हा तिघांना घेऊन आत आली. दरवाजा बंद केला. मला अजून उमाळा आला…’
हेही वाचा – दोन वेण्या अन् रीमा दिदी…
‘आई, बाबांनी समजावलं, डोक्यावरून, पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, ‘आता सांग…’ मी म्हणालो, ‘आई, बाबा कधी तुम्हाला चुकून किंवा मुद्दामून जर का मी दुखावलं असेल तर सॉरी. मला माफ करा. आम्ही चौघांनी खूप गप्पा मारल्या. पहाटे 5 वाजता आईने आम्हाला चहा बनवून दिला. मी आंघोळ केली. आम्ही दोघे आईबाबांचा निरोप घेऊन निघालो. बायकोला घरी सोडून मी सेट वर पोचलो. तयार झालो आणि शूट सुरू झालं… आता जरा मोकळा वेळ मिळाला, तसा म्हटलं ताईशी बोलूयात…’ खूप वेळ बोललो आम्ही. मग म्हणाला, ‘कधी योग आला तर, माझ्या आईचा रोल कराल का?’ मी हसले, म्हटलं, ‘जरूर करेन.’ काही काळानंतर त्याने मला खरंच एका सिनेमात त्याच्या आईचा रोल देऊ केला. तो सिनेमा शूट सुरू होण्यापूर्वीच बंद झाला. पण आमची दोस्ती आणि त्याच्या आईचं काम करण्याचं वचन मात्र आजही अबाधित आहे!


