Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeललितडॉ. प्रशांत, घार्गे सर अन् सहा एकर जमीन…

डॉ. प्रशांत, घार्गे सर अन् सहा एकर जमीन…

ॲड. कृष्णा पाटील

भाग – 1

तुम्हाला खरं सांगू का? माणसाची नियत कधी बदलेल काही सुद्धा सांगता येत नाही. तुम्ही कितीही विश्वासाने व्यवहार करा, तुम्ही कितीही त्याला प्रेमाने सांभाळा किंवा तुम्ही कितीही त्याला जीव लावा, एकदा का नियत बदलली की, या गोष्टीला काही एक अर्थ राहात नाही. आपण मात्र डोक्याला हात लावून बसतो. मी त्याच्यासाठी इतके केले. मी कदाचित माझ्या बायका-पोरांसाठी सुद्धा इतके केले नव्हते. पण याची ओळख तो विसरला. मग आपणच पश्चाताप करून घ्यायचा. आपणच आपला बीपी वाढवून घ्यायचा. आपणच आपल्याला शुगर सारखा आजार लावून घ्यायचा.

माझे मित्र प्रशांत याला भेटायला जाताना मी हाच विचार करीत होतो. शेजारी ड्रायव्हर गाडी चालवत होता. मी मात्र विचाराच्या तंद्रीतच होतो. प्रशांतवर ही वेळ का यावी? त्याचं काय चुकलं असेल? प्रशांत आणि घार्गे सरांची अठ्ठावीस वर्षांची मैत्री होती. त्या मैत्रीच्या काळात काही दिवस मीही त्यांच्यासोबत होतो. त्यांच्या मैत्रीचे बरेच दिवस मी स्वतः जवळून पाहिले होते.

नागपाडा येथे प्रशांतचा ‘मानसी क्लिनिक’ या नावाने व्यवसाय आहे. प्राचार्य घार्गे सर डॉक्टर प्रशांतचे क्लायंट होते. त्यातूनच त्या दोघांची ओळख झाली होती. प्राचार्य घार्गे सर यांचा धाकटा मुलगा प्रसाद तर कायम प्रशांतकडे सल्ल्यासाठी येत असे. तो ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला इस्रायलला घेऊन जाण्यासाठी प्रशांतने भरपूर प्रयत्न केले. प्रशांत नेहमी स्वित्झर्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, फ्रान्स या देशात जात असतो. वर्षातले सहा महिने तो भारताबाहेरच असतो. प्रसादलाही मेडिकल लाइनला आणावे, अशी डॉक्टर प्रशांतची मनोमन इच्छा होती. मग एकेदिवशी प्रशांतने घार्गे सरांना बोलून दाखवले. प्रशांत म्हणाला, “सर, प्रसाद अत्यंत हुशार आहे. त्याला मेडिकल लाइनला घातला तर, तो नक्की त्याची जिंदगी बनवू शकतो. मी त्याला खूप सपोर्ट करीन. मनापासून सपोर्ट करीन. तुम्ही काहीही काळजी करू नका. फक्त त्याला परदेशात जाण्यासाठी होकार द्या.”

हेही वाचा – कामिनीने एवढा टोकाचा निर्णय घेणे गरजेचे होते का?

घार्गे सर दोन्ही हात जोडून हसत म्हणाले, “अहो डॉक्टर तुम्ही परदेशामध्ये जाण्याची भाषा बोलता. परंतु माझा पगार किती? मी त्याला पैसे पुरवणार किती? मेडिकल लाइनला कोट कोट रुपये खर्च येतोय. त्यामुळे तसं काही त्याच्या डोक्यात घालू नका.”

प्रशांत म्हणाला, “तुम्ही फक्त होकार द्या सर. बाकीचं माझं मी पाहतो. तुम्ही त्याची कशाला काळजी करता?”

आणि मग डॉक्टर प्रशांतने खरोखरच प्रसादला इस्रायलला नेण्यासाठी त्याचा व्हिसा आणि पासपोर्ट तयार केला. केवळ प्रवास खर्च नव्हे तर, तिथल्या शिक्षणाचा खर्चही त्यांनी उचलला. प्रसादने इस्रायलमधील बीएमएसची पदवी घेतली. बघता बघता प्रसाद तिथेच सेटल झाला. आता वर्षा-दोन वर्षांतून कधीतरी प्रसाद भारतात येतो. नाहीतर तो तिकडेच असतो.

प्रशांत एकदा घार्गे सरांना म्हणाला, “सर, प्रसादने आता चांगला जम बसवला आहे. तुम्ही पण व्हिसा आणि पासपोर्ट काढून घ्या. एकदा प्रसादकडे जाऊया. मीही तुमच्यासोबत येतो.”

घार्गे सर म्हणाले, “डॉक्टर, प्रसादने आता पदवी घेतली आहे. आता भारतातच चांगला फ्लॅट घेऊन तेथे त्याने व्यवसाय सुरू करावा, असे आम्हाला वाटते. त्यामुळे तिकडे जाण्याची इच्छा होत नाही.”

खरं म्हणजे, घार्गे सरांना प्रवासासाठी पैसे खर्च करणे नको वाटत होते. म्हणून ते काहीतरी निमित्त सांगून टाळाटाळ करीत होते. मग प्रशांतनेच एकदा घार्गे सर आणि त्यांच्या पत्नीची इस्रायलला जाण्यासाठी तयारी केली. त्यांचा व्हिसा, पासपोर्ट काढलाच, शिवाय दोघांची तिकिटेही काढली.

विमानात बसल्यानंतर घार्गे सरांचे डोळे पाणावले. घार्गे सर म्हणाले, “डॉक्टर आपल्या या मैत्रीचे ऋणानुबंध मी या जन्मात तरी फेडू शकणार नाही. तुम्ही माझ्या मुलाचं करिअर बनवलं. ते करिअर पाहण्यासाठी आम्हा दोघांनाही परदेशात घेऊन निघालेला आहात. हे उपकार मी कसे फेडणार?”

प्रशांतने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. खांद्यावर थोपटत तो म्हणाला, “सर, मैत्रीमध्ये या गोष्टीचे मोजमाप कधीच करायचे नाही. निदान माझा तरी तो स्वभाव नाही.”

इस्रायलमध्ये पंधरा दिवस काढल्यानंतर सर्वजण परत फिरले.

घार्गे सर आणि डॉक्टर प्रशांतची मैत्री अशी घट्ट होत गेली. अठ्ठावीस वर्षे या मैत्रीमध्ये कधीही खंड पडला नाही. एका ताटात जेवणारे मित्र म्हणून आजूबाजूच्या परिसरात त्यांची ओळख निर्माण झाली. मैत्री कशी असावी, याचा आदर्श नमुना म्हणून लोक त्यांच्याकडे पाहू लागले. दवाखान्याच्या व्यापामुळे डॉक्टर प्रशांतला बाकी कुठल्या कामात वेळ मिळत नव्हता. अशा वेळी घार्गे सर रात्रीअपरात्री येऊन सुद्धा मदत करायचे.

अशातच आणखी एक घटना घडली. डॉक्टर प्रशांतने नाशिकला एक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बांधायचे ठरवले. मग तर नागपाड्यामधला सगळाच व्याप घार्गे सर पाहू लागले. नागपाड्याला डॉक्टरांची सहा एकर जमीन होती. हळूहळू ती जमीन सुद्धा घार्गे सर कसू लागले. एके दिवशी सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे घार्गे सर आले. घार्गे सर आले की त्यांना ड्रायफ्रूटचे उपीट द्यायचा हा कायमचा पायंडा होता. घार्गे सरांची ती फेव्हरेट डिश होती. त्या दिवशी डॉक्टरने स्वतः ड्रायफ्रूटचे उपीट बनवले होते. दोघांनी डिश घेतल्या. गरम उपीट खाता खाता घार्गे सर म्हणाले, “डॉक्टर आता तुम्ही नाशिकला शिफ्ट होणार आहात. गेली पंधरा वर्षे मी तुमची शेती करत आहे. आता तर सेवानिवृत्त झालो आहे. म्हणून त्यामध्ये आता मी ड्रॅगन फळबाग लावायचा विचार करत आहे. तुमचं काय मत आहे?”

हेही वाचा – सूरजच्या आयुष्यात नवा ‘उष:काल’!

डॉक्टर म्हणाला, “घार्गे सर तुमची आणि माझी किती गाढ मैत्री आहे, ते फक्त आपल्या दोघांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही जे कराल ती पूर्व दिशा. त्यामध्ये बाग लावा, पाइपलाइन करा, आणखी काही करा. माझी काही एक हरकत नाही.”

मोकळी डिश बाजूच्या वॉशबेसिनमध्ये टाकता टाकता घार्गे सर म्हणाले, “तरी पण आपण नॉमिनल काय असेल ते भाडे ठरवूया.”

त्यावर डॉक्टर प्रशांत म्हणाला, “तुम्ही द्याल ते भाडे. मी घेईन ते भाडे. त्यामुळे त्याची तुम्ही काळजी करू नका. माझा शब्द म्हणजे न्यायाधीशाचा शब्द समजा.”

आणि मग प्रशांतची शेती घार्गे सर करू लागले. हळूहळू त्यांनी त्यात ड्रॅगन फळबाग घातली. मात्र बाग सहा एकरऐवजी त्यांनी फक्त दोन एकरमध्येच केली. त्यामुळे बाकीची शेती तशीच पडून राहिली. वास्तविक घार्गे सरांनी ती संपूर्ण शेती पाच वर्षे भाडे करारने घेतली होती. एकरी सत्तर हजार रुपये दर वर्षाला द्यायचे ठरले होते. म्हणजेच चार लाख वीस हजार रुपये दरवर्षी. तसे घार्गे सरांनी तोंडी वचन दिले होते.

बघता बघता एक वर्ष संपून गेले. घार्गे सरांची बाग अजून सुराला लागली नव्हती. त्यामुळे पहिल्या वर्षी सरांनी पेमेंट दिले नाही. दुसऱ्या वर्षी त्यांच्या बागेचे पिक गेले, पण सर घरी आले आणि डॉक्टर प्रशांतला म्हणाले, “यावर्षी बागेत खूप तोटा झाला आहे. खरं म्हणजे बाग वाढवायची की नाही याचा मी विचार करीत आहे. कारण या दोन एकरचेच एक लाख चाळीस हजार रुपये मी तुम्हाला देऊ शकत नाही.

प्रशांतने त्यांचा हात हातात घेतला. अत्यंत प्रेमाने म्हणाला, “ सर, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला होतील तसे पैसे द्या. पैशाचा व्यवहार आपल्या दोघांमध्ये येतोच कुठे?‌‌‌‌”

मग कसेबसे घार्गे सरांनी एक लाख रुपये डॉक्टरना दिले. बाकीचे तसेच राहिले.

वर्षा मागून वर्षे जात राहिली. दरवर्षी हे असंच चालत राहिलं. डॉक्टर प्रशांत नाशिकला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट झाला. तिथेच त्याची प्रॅक्टिस सुरू झाली. इकडे सहा एकर जमीन ही घार्गे सरांच्या ताब्यातच होती. तीन-चार वर्षे झाली तरी घार्गे सर भाडे द्यायचे नाव काढत नव्हते. त्यामुळे एके दिवशी डॉक्टर आणि त्याच्या मुलांनी निर्णय घेतला की, आपण ती जमीन विकून टाकूया. एवीतेवी घार्गे सरांना सुद्धा परवडत नाही.

सोमवारी सकाळी डॉ. प्रशांत आपल्या मुलाला घेऊन घार्गे सरांच्या घरी आला. नेहमीप्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर प्रशांत म्हणाला, “सर, आता आम्ही नाशिकला कायमचे शिफ्ट झालो आहोत. म्हणून इथली जमीन विकायचा निर्णय घेतला आहे. तुम्ही आता ती जमीन करीतच आहात. तुम्हीच ती जमीन घ्यावी, अशी आमची विनंती आहे.”

क्षणभरच घार्गे सर गोंधळून गेले. त्यांना काही बोलावे सुचत नव्हते. परंतु ते सावध झाले आणि म्हणाले, “डॉक्टर, मला ती जमीन परवडणारी नाही. तुम्ही ती कुणालाही विका.”

डॉ. प्रशांत म्हणाला, “तुम्हीच घेतली असती तर बरे झाले असते. घरची जमीन घरातच राहिली असती.

यावर घार्गे सर काहीच बोलले नाहीत. थोड्यावेळाने पुन्हा प्रशांत म्हणाला, “ठीक आहे. समजा मी जमीन कुणाला विकली तरी तुमच्या बागेचे पीक जाईपर्यंत त्या जमिनीचा विकत घेणाऱ्या नवीन मालकाला ताबा घेऊ देणार नाही. शिवाय, तुमचे जे पण काही पुढील एका वर्षाचे नुकसान झाले असेल, ते पण मी द्यायला तयार आहे.”

घार्गे सर म्हणाले, “ठीक आहे. मी माझ्या बायका, मुलांना विचारतो आणि तुम्हाला दोन दिवसांत भेटायला येतो.”

क्रमश:

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!