Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari :  जें नानागती पावतें, तें चित्त वरील आत्मयातें…

Dnyaneshwari :  जें नानागती पावतें, तें चित्त वरील आत्मयातें…

अध्याय आठवा

तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥74॥ आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे।

तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ॥7॥

म्हणोनि सदां स्मरावें । मातेंचि तुवां ॥75॥ डोळां जें देखावें । कां कानी हन ऐकावें । मनीं जें भावावें । बोलावें वाचे ॥76॥ तें आतं बाहेरी आघवें । मीचि करूनि घालावें । मग सर्वीं काळीं स्वभावें । मीचि आहें ॥77॥ अगा ऐसिया जरी जाहालिया । मग न मरिजे देह गेलिया । मा संग्रामु केलिया । भय काय तुज ॥78॥ तूं मन बुद्धि सांचेंसीं । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी । तरी मातेंचि गा पावसी । हे माझी भाक ॥79॥ हेंच कायिसया वरी होये । ऐसा जरी संदेहो वर्तत आहे । तरी अभ्यासूनि आदीं पाहें । मग नव्हे तरी कोपें ॥80॥

अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना । परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ॥8॥

येणेंचि अभ्यासेंसिं योगु । चित्तासि करीं पां चांगु । अगा उपायबळें पंगु । पहाड ठाकी ॥81॥ तेविं सदभ्यासें निरंतर । चित्तासि परमपुरुषाची मोहर । लावीं मग शरीर । असो अथवा जावो ॥82॥ जें नानागती पावतें । तें चित्त वरील आत्मयातें । मग कवण आठवी देहातें । गेलें की आहे ॥83॥ पैं सरितेचेनि ओघें । सिंधुजळा मीनलें ओघें । तें काय वर्तत आहे मागें । म्हणोनि पाहों येती ॥84॥ ना तें समुद्रचि होऊन ठेलें । तेविं चित्ताचें चैतन्य जाहालें । जेथ यातायात निमालें । घनानंद जें ॥85॥

हेही वाचा – Dnyaneshwari : देखा बालकाचिया धणी धाइजे, कां शिष्याचेनि जाहलेपणें होईजे…

अर्थ

ज्याप्रमाणॆ जिवंत असताना, जी गोष्ट आवडीने अंत:करणात राहाते, तीच मरणाचे वेळी वारंवार मनात येते, ॥74॥ आणि मरणसमयी ज्यास जी वस्तु आठवते त्याच गतीला तो जातो.

म्हणून सर्व काळी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास, म्हणजे तू नि:संशय मजप्रतच येशील. ॥7॥

असे आहे म्हणून तू नेहेमी माझेच स्मरण कर. ॥75॥ डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानांनी जे ऐकावे अथवा मनाने ज्याची कल्पना करावी किंवा वाणीने जे बोलावे ॥76॥ वरील सांगितलेले व्यवहार आत बाहेर मीच करून घाल, मग सर्वकाळ सहज मीच आहे. ॥77॥ अरे, असे झाले म्हणजे मग देह नाहीसा झाला तरी, तो मरत नाही. मग लढाई केलीस तरी तुला काय भय आहे? ॥78॥ तू मनबुद्धि ही खरोखर माझ्या स्वरूपात अर्पण करशील, तर मग माझ्याशी एकरूपच होशील, हे माझे प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे. ॥79॥ अशी स्थिती कशाने होईल, असा जर संशय तुझ्या मनात राहिला असेल तर, अगोदर अभ्यास करून पाहा. मग ती स्थिती झाली नाही, तर रागाव. ॥80॥

हे पार्था अभ्यासयोगामुळे स्थिर झालेल्या आणि अन्यत्र न जाणार्‍या चित्ताने (परम पुरुषाचे) सतत स्मरण करणारा मनुष्य त्या तेजस्वी परम पुरुषाप्रत जातो. ॥8॥

याच अभ्यासाबरोबर चित्ताची सांगड चांगल्या प्रकारे घाल. अरे, प्रयत्नांच्या बळावर पांगळा देखील पर्वत चढून जातो. ॥81॥ त्याप्रमाणे चांगल्या अभ्यासाने तू निरंतर आपल्या चित्ताला परमपुरुषाचे ध्यान लाव. मग शरीर राहो अथवा जावो ॥82॥ नाना गतींना पावणार्‍या चित्ताने एकदा आत्म्यास वरले, मग देह आहे किंवा गेला, याची आठवण कोणी ठेवायची? ॥83॥ नदीच्या ओघाबरोबर घो घो करीत समुद्राच्या पाण्यास मिसळालेले जे पाणी, ते मागे काय चालले आहे, म्हणून पहाण्याकरिता परत येते काय? ॥84॥ नाही. तर, ते समुद्रच होऊन राहिले, त्याप्रमाणे ते चित्तच चिद्रूप बनल्यावर मग त्या ठिकाणी जन्ममरणाचा शीण सहजच संपला, कारण ते चैतन्य एकरस आनंद आहे. ॥85॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : पैं अथावीं घट बुडाला, तो आंतबाहेरी उदकें भरला…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!