मयुरेश गोखले
आज श्रीरंगसोबत तिचे कडाक्याचे भांडण झाले होते. रात्री न जेवताच ती झोपायचा प्रयत्न करीत होती. श्रीरंग तिचा बेस्ट फ्रेंड म्हणजे अगदी स्वप्नील जोशींचा मितवा वगैरे असा! घरच्यांना न सांगता गेले कित्येक दिवस ती श्रीरंगला भेटत होती. तिच्या घरच्यांना श्रीरंग आणि तिची मैत्री अजिबात आवडत नव्हती. तरी ती त्यांचा विरोध पत्करून त्याला भेटायला जात होती. पण आजकाल श्रीरंग खूप विचित्र वागायला लागला होता. रोज खूप वेळ भेटत जा, म्हणून तिच्यासोबत भांडायला लागला होता. ती इतका वेळ त्याला देऊ शकत नव्हती… आणि ती कधी भेटली नाही तर, श्रीरंग खूप चीड चीड करायचा तिच्यावर! तिने श्रीला खूप समजावून पाहिले, पण तो समजूनच घेत नव्हता. शेवटी एक दिवस स्फोट झाला आणि दोघांचे खूप भांडण झाले . ती श्रीला वाटेल तस सुनावून आली होती.
तिने ठरवले की आता बस झालं… आता संपवायचं हे सगळं… ब्रेकअप हा एकच पर्याय. मनाशी पक्का निश्चय केला तिने ‘ब्रेकअप’!
निश्चय तर झाला, पण झोप लागत नव्हती… रात्र संपत नव्हती.. घड्याळाचा टिक टिक आवाज पण खूप मोठा वाटायला लागला. रागाने गादीवरून उठून ती खिडकीपाशी आली. एक वाऱ्याची झुळूक तिला स्पर्शून गेली.
हेही वाचा – Love story : उलटून रात्र गेली…
श्री नेहमी म्हणायचा की, मी नसताना जेव्हा तुला माझी खूप आठवण येईल तेव्हा वारा होऊन मी बिलगेन तुला…! या वाऱ्यासोबत तिला श्री जवळ असल्याचा भास होत होता. आता तिच्या जुन्या आठवणी तिला छळू लागल्या…
एका पौर्णिमेच्या रात्री दोघे निवांत नदी किनारी भटकत होते. रात्रीचे दहा वाजून गेल्यामुळे वर्दळ कमी झाली होती. दोघेही एका बेंच वर बसले. पश्चिमेकडून गार वारा वाहात होता. ती चंद्राकडे पाहात होती. ती काही बोलणार एवढ्यात श्रीने तिचा हात हातात घेऊन तिला खसकन जवळ ओढले… तिला काही समजायच्या आत तिला घट्ट मिठीत घेतले. तिला मिठी हवीहवीशी वाटली, पण भीती वाटत होती. श्रीरंगपेक्षा तिला स्वतःची भीती वाटत होती. वाहवत गेलो तर तिलाच भावना आवरता येणार नव्हत्या. हे वादळ तिच्या मनात सुरू असताना तिच्या मानेवर श्रीने अलगद ओठ टेकवले. त्याच्या श्वासाची ऊब तिला जाणवू लागली. आता तिची मिठी घट्ट झाली होती. श्रीने लगेच स्वतःला सावरले आणि हलकेच दूर व्हायचा प्रयत्न केला. तिच्या डोळ्यात बघून श्री म्हणाला की, ‘तुला गिल्टी वाटेल असं मी कधीच वागणार नाही. आय एम सॉरी.’ मग कितीतरी वेळ नजर एकमेकांशी बोलत होती आणि शब्द मुके झाले होते. बराच उशीर झालाय घरी वाट पाहत असतील, असं म्हणून त्याने ती चांदणी रात्र आवरली.
या अशा अनेक आठवणी ती कधीच विसरू शकणार नव्हती. आज नातं संपवायच ठरवलं तर, आठवणी जास्तच छळू लागल्या. सुरेश भटांच्या एका गीतातील ओळीचा अर्थ त्या रात्रीसुद्धा इतका कळला नव्हता, जितका आज कळला. वाऱ्याची एक झुळूक शरीराला स्पर्शून गेली आणि “श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात…” या ओळी ती खरोखर अनुभवत होती.
हेही वाचा – गहिवरला मेघ नभी…
त्या रात्री श्री तिच्यासोबत काहीही करू शकला असता आणि तिने नकार पण नसता दिला. पण श्री असं काहीच वागला नाही. कारण त्याला तिची काळजी होती. तो खूप प्रेम करायचा आणि अशा व्यक्तीशी जो आपली इतकी काळजी करतो, आपल्यावर इतके प्रेम करतो त्याला आपण आयुष्यातून बेदखल करायला निघालो होतो, याचे तिला खूप वाईट वाटले.
वारा आणि आठवणी दोन्ही थांबत नव्हत्या… रात्र सरत नव्हती. त्या मालकंसी श्वासाशिवाय आपण जगूच शकत नाही, हे सत्य तिला कळले होते. शेवटी भावना अनावर होऊन तिने फोन हातात घेतला, तेवढ्यात श्रीचा फोन तिला आला. श्री काही बोलणार त्याआधी तिचे हमसून हमसून रडणे त्याला फोनवर ऐकू आले. ती खूप रडली… रडून रडून मोकळी झाली… आणि मग सूर्योदयापर्यंत त्यांचा मालकंस राग फोनवर सुरूच राहिला. मोबाइल – 9423100151


