अध्याय आठवा
जें आतांचि सांगितलें होतें । अगा अधियज्ञ म्हणितला जयातें । जे आदींचि तया मातें । जाणोनि अंतीं ॥59॥ ते देह झोळ ऐसें मानुनी । ठेले आपणपें आपणचि होउनी । जैसा मठ गगना भरुनी । गगनींचि असे ॥60॥ ये प्रतीतीचिया माजघरीं । तयां निश्चयाची वोवरी । आली म्हणोनि बाहेरी । नव्हेचि से ॥61॥ ऐसें सबाह्य ऐक्य संचलें । मीचि होऊनि असतां रचिलें । बाहेरी भूतांचीं पांचही खवलें । नेणतांचि पडिलीं ॥62॥ उभयां उभेपण नाहीं जयाचें । मा पडिलिया गहन कवण तयाचें । म्हणोनि प्रतीतीचिये पोटींचें । पाणी न हाले ॥63॥ ते ऐक्याची आहे वोतिली । कीं नित्यतेचिया हृदयीं घातली । जैसी समरससमुद्रीं धुतली । रुळेचिना ॥64॥ पैं अथावीं घट बुडाला । तो आंतबाहेरी उदकें भरला । पाठीं दैवगत्या जरी फुटला । तरी उदक काय फुटे ॥65॥ नातरी सर्पे कवच सांडिलें । कां उबारेन वस्त्र फेडिलें । तरी सांग पां कांहीं मोडलें । अवेवामाजीं ॥66॥ तैसा आकारु हा आहाच भ्रंशे । वांचूनि वस्तु ते सांचलीचि असे । तेचि बुद्धि जालिया विसुकुसे । कैसेनि आतां ॥67॥ म्हणोनि यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते । जे मोकलिती देहातें । तें मीचि होती ॥68॥ एऱ्हवीं तरी साधारण । उरीं आदळलिया मरण । जो आठवु धरी अंतःकरण । तेंचि होईजे ॥69॥ जैसा कवणु एकु काकुळती । पळतां पवनगती । दुपाउलीं अवचितीं । कुहामाजीं पडिला ॥70॥ आतां तया पडणयाआरौतें । पडण चुकवावया परौतें । नाहीं म्हणोनि तेथें । पडावेंचि पडे ॥71॥ तेंवि मृत्यूचेनि अवसरें एकें । जें येऊनि जीवासमोर ठाके । तें होणें मग न चुके । भलतयापरी ॥72॥ आणि जागता जंव असिजे । तंव जेणें ध्यानें भावना भाविजे । डोळा लागतखेवों देखिजे । तेंचि स्वप्नीं ॥73॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तेचि अविद्येची जवनिक फिटे, आणि भेदभावाची अवघि तुटे…
अर्थ
अर्जुना, ज्यास अधियज्ञ म्हणतात म्हणून आताच सांगितले, त्या मला जे पुरुष जिवंत असतानाच जाणून, मरणकाळीही जाणतात ॥59॥ ज्याप्रमाणे मठ हा पोकळीने भरून पोकळीत असतो, त्याप्रमाणे ते पुरुष देह खोटा आहे असे विचाराने जाणून आपणच (आत्मरूप) होऊन आपल्या ठिकाणी असतात. ॥60॥ अशा या वरील अनुभवाच्या माजघरात, निश्चयाच्या खोलीत त्यास झोप आली. म्हणून त्यास बाह्य विषयांची आठवणच होत नाही. ॥61॥ याप्रमाणे अंतर्बाह्य ऐक्य भरलेले असून ते पुरुष मद्रूप होऊन राहिले असता, बाहेर पाचही भूतांच्या खपल्या पडल्या तरी, त्यास खबरच नाही. ॥62॥ जिवंतपणी सर्व व्यवहार करीत असता, ज्यास शरीराच्या उभेपणाची जाणीव नाही, त्यास मग शरीर पडण्य़ाचे संकट कोणते असणार? म्हणून अशाही प्रसंगी त्यांच्या स्वरूपानुभावाच्या पोटातील (निश्चयरूप) पाणी हालत नाही. ॥63॥ ती त्याची प्रतीती ऐक्यरसाची जणू काय ओतलेली असते अथवा त्रिकालाबाधित जे स्वरूप, त्या स्वरूपाच्या हृदयात ती जणू काय घातलेली असते. त्याची प्रतीती ऐक्यतारूपी समुद्रात जणू काय धुतलेली असल्यामुळे ती मळत नाही. ॥64॥ अथांग पाण्यात घट बुडाला असता तो आतबाहेर पाण्यानेच भरलेला असतो. नंतर दैववशात् पाण्यात असतानाच जर फुटला तर, त्या घटात असलेले पाणी फुटते काय? ॥65॥ अथवा सर्पाने कात टाकली अगर एखाद्याने उकडते म्हणून वस्त्र टाकले तर, असे करण्यात अवयवांमध्ये काही मोडतोड झाली का? सांग बरे? ॥66॥ त्याप्रमाणे वरवर भासणारा जो शरीररूपी आकार तोच नाश पावत असून त्या शरीराशिवाय असणारी आत्मवस्तू तर, जशी सर्वत्र भरलेली आहे तशीच आहे. तीच आत्मवस्तू आपण अनुभवून झाल्यावर आता (देहपाताच्या वेळी) बुद्धीचा निश्चय कसा डगमगेल? ॥67॥ म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात, ते मद्रूपच होतात. ॥68॥ एरवी साधारण विचार करून पाहिले तर, मरण येऊन ठेपले असता मनुष्याच्या मनाला ज्या वस्तूची आठवण होते, तीच वस्तू तो होतो. ॥69॥ ज्याप्रमाणे कोणी एखादा मनुष्य काकुळतीने वार्यासारखा पळत असता एकाएकी दोन्ही पावले निसटून आडात पडला ॥70॥ आता त्याला पडण्यापूर्वी, ते पडणे चुकवण्याकरिता दुसरा काही उपाय नाही म्हणून जसे त्याला पडावेच लागते. ॥71॥ त्याप्रमाणे मृत्यूच्या त्या प्रसंगी, जी काही एक वस्तू जीवाच्या समोर येऊन उभी राहते (ज्या वस्तूकडे त्याचे मन लागते) ती वस्तू होणे मग कोणत्याही प्रकाराने चुकत नाही. ॥72॥ आणि जेव्हा (मनुष्य) जागा असतो, त्यावेळेला त्याच्या वृत्तीने ज्याचा ध्यास घेतलेला असतो तेच त्याला डोळा लागल्याबरोबर स्वप्नात दिसते. ॥73॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : देखा बालकाचिया धणी धाइजे, कां शिष्याचेनि जाहलेपणें होईजे…


