नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
मी चौथ्या महिन्याची प्रेग्नंट होते… पहिलटकरीण… तरीही नाटकाच्या दौऱ्यावर कोकणात गेले होते. मला तसे डोहाळे कडकच होते. कसलाही वास चालायचा नाही. अन्न पोटात टिकत नव्हतं. नाटकात मेन रोल यशवंत दत्त करत होते. ते रोज संध्याकाळी प्रयोगासाठी निघताना माझ्या हातावर नरम बंदीचा लाडू ठेवायचे. तो खाल्ला की, त्यानंतर काहीही खाल्लं तरी पोटात ते टीकायचं. वेडेच डोहाळे होते!
दौऱ्यावर असताना साधारण रात्री 10 ते 10.30 च्या सुमारास प्रयोग सुरू होऊन 12 ते 12.30 वाजेपर्यंत संपत असे. त्यानंतर मेकअप पुसून, कपडे बदलून, बॅकस्टेज वाले सेट वगैरे सगळं आवरून, आम्ही जेऊन बसमध्ये बसून हॉटेलवर परतत असू. साधारण पहाटेचे 3-4 वाजायचे. जेवण उरकून आम्ही बायका गप्पा मारत बसकडे चालायला लागलो. थंडी होती. सगळ्याजणी झोपायच्या तयारीने गाऊन घालून होतो. मी वरून स्वेटर घालून शिवाय, शाल पांघरून, बोलत बोलत बसच्या दिशेने निघालो. अचानक मला काही समजायच्या आत माझ्या मानेवर आणि खांद्यावर कोणाच्या तरी मजबूत हाताची पकड पडली आणि ते काका कानात हळूच कुजबुजले, ‘सरळ चालत रहा. इथे तिथे बघू नकोस.’ आवाज ओळखीचा होता. त्यामुळे गुपचूप ऐकून सरळ चालत गेले. बसमध्ये चढले. पांघरूण घेऊन झोपले. पण त्या काकांनी गुपचूप सरळ चाल असे म्हटलं आणि माझ्या बाजूने खूप साऱ्या बर्फाच्या लाद्या गेल्यासारखा थंडावा मला जाणवला. अगदी शिरशिरी आली होती.
दोन दिवसांनी दौरा संपला आणि आम्ही मुंबईसाठी निघालो. निघताना ते काका मला म्हणाले, ‘त्या रात्री तुझ्या बाजूने एक बाई गेली, जी तुम्हाला कोणालाही दिसली नाही. पण मला जाणवली. एक तर आपण कोकणातल्या गावात होतो. अमावास्या होती त्यात तू दिवसातली! तू जर इथेतिथे बघत टिवल्याबावल्या करत बसकडे निघाली असतीस तर, तिने नक्कीच तुला झपाटलं असत!’
‘बापरे, असं तर मी फक्त पुस्तकात वाचलं होतं किंवा मोठ्या माणसांच्या तोंडून कधीतरी ओझरत ऐकलं होतं… हे माझ्या बाबतीत घडू शकल असतं! खूप घाबरले. म्हटलं आता डिलिव्हरी होईपर्यंत नाटकात काम नको करायला आणि डॉक्टर बाई म्हणाल्या की, ‘चौथा महिना पूर्ण होईल, आता नाटक बंद. कारण, बाळ आता आकार घेणार आणि तू जस वागशील तसं अंगिकारणार. तेव्हा आता जन्मानंतर बाळ किमान 8-10 महिन्यांचं होईपर्यंत काम नको करूस.’ …आणि मी काही काळासाठी थांबले होते. भीती होतीच…
पुढे सर्व काही व्यवस्थित झालं. मुलगा झाला. आता त्याचं लग्न झालंय. पण अजूनही ती रात्र विचार करायला लावते… खरंच असं काही असतं का? असतं तर तेव्हा नक्की काय घडलं असतं?
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


