आजचं प्रेझेन्टेशन काही कारणाने रद्द करण्यात आले. मी आणि अविनाशने भरपूर मेहनत घेतली होती याबाबतीत. अविनाश नव्या पिढीचा शिलेदार आणि कामाच्या बाबतीत माझा उजवा हात! पण वरचेवर प्रमोशन मिळण्यासाठी कौटुंबिक आयुष्यावर पाणी सोडत कायम उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करणारा… आम्ही एकत्र काम करून जवळपास तीन वर्षे झाली होती आणि रोजच्या कामाच्या बाबतीत मला सहकाऱ्यांकडून काय अपेक्षित असते, हे तो अचूक ओळखायचा.
प्रेझेन्टेशन रद्द झाल्याने अविनाश थोडासा हिरमुसला होता. मीच मग त्याची समजूत काढली आणि आम्ही ऑफिसमधून निघालो. संध्याकाळची वेळ. रस्त्यावर तुडुंब गर्दी होती. एवीतेवी अचानक मिळालेला हा मोकळा वेळ सत्कारणी लावण्यासाठी मी अविनाशला घेऊन नरिमन पॉइंटच्या समुद्र किनाऱ्यावर बांधलेल्या कठड्यावर बसायला आणले. समोर दूरवर अस्ताला जाणारा सूर्य पाण्यात अर्धवट बुडण्याच्या तयारीत होता. इतकं निवांत देखील आपण बसू शकतो, हे मला अविनाशला पटवून द्यायचं होतं. पाच-एक मिनिटे आम्ही दोघेही गप्प बसून होतो. अचानक अविनाश बोलायला लागला, “सर हा निवांतपणा हवाहवासा वाटतोय मला. इतके दिवस सततच्या कामामुळे काहीतरी हातून निसटू बघत होते… त्याचा उलगडा आज होतोय मला.” त्याचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं, जे माझ्या चेहऱ्यावर त्याला वाचता आलं.
“सर, काय झाले? काही चुकले का माझे?” अविनाशने मला विचारलं.
ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होतो कित्येक महिने, तो क्षण असा अचानक समीप येईल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. अधिक वाट न बघता मी लगोलग बोलायला सुरुवात केली…
हेही वाचा – मनाची श्रीमंती… मित्राची अनोखी कहाणी!
“अविनाश, अरे इतके दिवस तू सतत जी चूक करत होतास ती चूक आज अखेर तुला जाणवली, यातच सगळं आलं… तुला ससा आणि कासवाची गोष्ट माहीत आहे का?”
“हो आहे माहीत. पण त्याचा इथे काय संबंध?”
“फार मोठा संबंध आहे. वेगाने धावत गेलेला ससा दमून झाडाखाली विश्रांती घ्यायला बसतो आणि तिथेच त्याला गाढ झोप लागते. संथ गतीने चालणाऱ्या कासवाने झोपलेल्या सशाला मागे टाकून अखेर शर्यत जिंकलेली असते. तू सुद्धा कलियुगातील ससा आहेस. जो शारीरिक आणि मानसिक ताकद न ओळखता प्रमोशनसाठी तहान-भूक हरपून कामात स्वतःला बुडवून घेतोय. रोज उशिराने घरी पोहोचून कौटुंबिक सुखाच्या आनंदाला मुकतोय. आयुष्यात पैसा मिळवणं गरजेचं जरूर आहे, पण पैसा म्हणजेच सर्वस्व, असं मानणं देखील तितकंच चुकीचे आहे.”
“आयुष्याच्या तराजूत कार्यालयीन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या अचूकपणे तोलून धरणं अतिशय आवश्यक आहे. ज्याला ते जमते तो सगळ्या बाबतीत यशस्वी ठरतो. आपलं शरीर देखील एक प्रकारचं मशीन आहे ज्याला ठराविक काळानंतर पुरेशा विश्रांतीची गरज असते. ती जर का मिळाली नाही तर, ते मशीन मुदतीपूर्वीच कायमचे नादुरूस्त बनून अडगळीत जाऊन बसते. आज तू सुद्धा स्वतःला मशीन समजून काम करतो आहेस. जे तातडीने थांबले पाहिजे. तू किती तास काम करतोस, यापेक्षा काय काम करतोस आणि कंपनीच्या प्रगतीमध्ये तुझ्या कामाचं महत्त्व आणि टक्केवारी बघूनच प्रमोशनसाठी तुझी शिफारस होत असते, हे कायम लक्षात ठेव.”
हेही वाचा – मैत्रीच्या गोठलेल्या वाटा वितळू लागल्या!
“सर तुमच्या मनात काय आहे, ते स्पष्टपणे कळलं आहे मला आणि उद्यापासूनच तुम्हाला माझ्यात सकारात्मक बदल झालेला दिसेल. इतके दिवस मी काय गमावलं आहे, हे आज उशिराने का होईना, पण माझ्या लक्षात आणून दिलेत तुम्ही, त्यासाठी तुमचे आभार कसे मानू मी?”
“कासव बनून तू आजवर बघितलेल्या ध्येयाची पूर्ती करण्याचे वचन मला दे. आज इथे आहेस तू… उद्या आणखी दुसऱ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर रूजू होशील, तेव्हा तुझ्या हाताखाली काम करणाऱ्यांना ससा आणि कासवाची ही गोष्ट जरूर सांग. ही गोष्ट पिढ्यानपिढ्या सांगत आणि ऐकतं आले आहेत लोक.”
“सर, चला निघूया का? आज नेहमीपेक्षा लवकरच घरी पोहोचतो मी. माझ्या लेकाबरोबर खेळायला उत्सुक आहे मी.”
“चल, निघूया खरंच. संसार म्हणजे एक प्रकारचा उत्सव असतो आणि तो अधिकाधिक चांगल्या पद्धतीने साजरा करायला तू आजपासून सुरुवात करतो आहेस, यापेक्षा अधिक समाधानाची गोष्ट नाही माझ्यासाठी! तुला त्यासाठी मनापासून शुभेच्छा.”
बोलत बोलत आम्ही चर्चगेट स्टेशनवर पोहोचलो आणि तिथल्या गर्दीत हरवून गेलो.


