Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : ऐसा अध्यात्मलाभ तया, होय गा धनंजया…

Dnyaneshwari : ऐसा अध्यात्मलाभ तया, होय गा धनंजया…

अध्याय सातवा

असंतुष्टीचिया मदिरा । मत्त होवोनी धनुर्धरा । विषयांचां वोवरां । विकृतीसी असे ॥169॥ तेणें भावशुद्धीचिया वाटे । विखुरले विकल्पाचे कांटे । मग चिरिलें आव्हांटे । अप्रवृत्तीचे ॥170॥ तेणें भूतें भांबावलीं । म्हणोनि संसाराचिया आडवामाजीं पडिलीं । मग महादुःखाचां घेतलीं । दांडेवरी ॥171॥

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् । ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥28॥

ऐसे विकल्पाचे वांयाणे । कांटे देखोनि सणाणे । जे मतिभ्रमाचे पासवणें । घेतीचिना ॥172॥ उजू एकनिष्ठतेचां पाउलीं । रगडूनि विकल्पाचिया भालीं । महापातकाची सांडिली । अटवीं जिहीं ॥173॥ मग पुण्याचे धांवा घेतले । आणि माझी जवळीक पातले । किंबहुना ते चुकले । वाटवधेयां ॥174॥

जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये । ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥29॥

एर्‍हवीं तरी पार्था । जन्ममरणाची निमे कथा । ऐसिया प्रयत्नातें आस्था । विये जयांची ॥175॥ तयां तो प्रयत्नुचि एके वेळे । मग समग्रें परब्रह्में फळे । जया पिकलेया रसु गळे । पूर्णतेचा ॥176॥ ते वेळीं कृतकृत्यता जग भरे । तेथ अध्यात्माचें नवलपण पुरे । कर्माचें काम सरे । विरमे मन ॥177॥ ऐसा अध्यात्मलाभ तया । होय गा धनंजया । भांडवल जया । उद्यमीं मी ॥178॥ तयातें साम्याचिये वाढी । ऐक्याची सांदे कुळवाडी । तेथ भेदाचिया दुबळवाडी । नेणिजे तो ॥179॥

हेही वाचा – Dnyaneshwari : येर तनुमनप्राणीं, जे निरंतर माझेयाचि वाहणीं…

अर्थ

अर्जुना, असंतोषरूप दारूच्या योगाने उन्मत्त होऊन पंचविषयरूपी खोलीमध्ये विकाररूपी स्त्रीसह राहतो. ॥169॥ त्या द्वंद्वमोहाने अंत:करणशुद्धीच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरले आणि नंतर निषिद्ध कर्माचे आडमार्ग खुले केले. ॥170॥ त्यायोगाने प्राणी भांबावले आणि म्हणून संसाररूपी अरण्यात पडले आणि मग मोठमोठ्या दु:खाच्या दांडक्याने बडवले गेले. ॥171॥

परंतु ज्या पुण्यकर्म करणाऱ्या लोकांच्या पापाचा नाश झालेला असतो, ते (सुखदु:खादी) द्वंद्वरूपी मोहाने रहित होऊन निश्चयपूर्वक माझी भक्ती करतात. ॥28॥

असे विकल्पाचे पोकळ अणकुचीदार काटे पाहून, जे बुद्धिभ्रंशरूपी माघार घेतच नाहीत (म्हणजे बुद्धीला भ्रंश पडू देत नाहीत) ॥172॥ ज्यांनी सरळ एकनिष्ठेच्या पावलांनी विकल्परूपी काट्यांची टोके चेंगरून मोठमोठ्या पातकांचे अरण्य (मागे)  टाकले आहे. ॥173॥ नंतर ज्यांनी पुण्यरूप धाव घेतली आणि जे माझ्याजवळ प्राप्त झाले; फार काय सांगावे? असे ते भक्त या (काम, द्वंद्वमोह वगैरे) वाटमाऱ्यांच्या तडाख्यातून सुटले ॥174॥

जे जरा आणि मरण यापासून मुक्त होण्याकरिता माझा आश्रय करून यत्न करतात, ते त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला आणि संपूर्ण कर्माला जाणतात. ॥29॥

अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर, ज्या प्रयत्नाने जन्ममरणाची कथा संपते, अशा प्रयत्नांस ज्यांची इच्छा उत्पन्न करते ॥175॥ मग त्यांना तो प्रयत्नच एकदम संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलद्रूप होतो. ते परब्रह्मरूपी फळ पिकले असता त्यातून पूर्णतेचा रस गळतो. ॥176॥ त्यावेळी कृतकृत्यतेने जग भरून जाते आणि ब्रह्माच्या सहजस्थितीची अनोळख फिटते. कर्मांचे प्रयोजन संपते आणि मन नाहीसे होते. ॥177॥ अर्जुना, ज्याच्या व्यापाराला भांडवल मी असतो, त्याला असा अध्यात्माचा लाभ होतो. ॥178॥ त्याला साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो. त्या ऐक्याच्या ठिकाणी तो भेदाचे दारिद्र्य जाणतच नाही. ॥179॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : येथें भूतें जियें अतीतलीं, तियें मीचि होऊनि ठेलीं…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!