नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मंडईमध्ये विक्रीसाठी येताहेत. रंगीबेरंगी भाज्या, ताजी फळं… मंडईत शिरलं की, ताज्या भाज्या आणि फळांचा सुरेख सुगंध आणि रंग चित्तवृत्ती प्रसन्न करतात. तिथेच चाहूल लागते भोगी आणि संक्रांतीची. संक्रांत जवळ आली आहे. आता तर दुकानांमधून किंवा ठेला-गाड्यांवर रंगीबेरंगी प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या आकर्षक वस्तू दिसायला लागतात. कितीतरी बायका त्या वस्तू थोडीफार घासघीस करून डझनाच्या भावात घेत असतात. करेक्ट. हळदी कुंकवाचं वाण लुटण्याची तयारी सुरू झाली आहे.
आता रोज बायका छान छान साड्या नेसून, नटूनथटून सगळीकडे हळदी कुंकवाचा आनंद लुटत फिरणार. काही वर्षांपूर्वी अशाच एका हळदी कुंकवाला मी हजेरी लावली होती. ही आठवण लिहिताना हात जड झाले आहेत, छाती दाटलीय, डोळे भरून आले आहेत. ते तिचं, माझ्या सख्ख्या मामीचं शेवटचं हळदी कुंकू होतं. जे तिला आणि आम्हा सगळ्यांनाच माहीत होतं! तशी तर मामींना सवयच होती. घरी आलेल्या सवाष्णीला हळद कुंकू लावून, हातावर साखर ठेऊन मगच तिची पाठवणी करायची. घरात कसली फुलं आणि गजरे असतील तर तेही हातावर ठेवणं…
हेही वाचा – आयुष्याच्या एका वळणावर… जोडीदाराची गरज!
मोठ्या मामांना टाटा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. फार तर 15 दिवस, असे डॉक्टर म्हणाले आणि मामा घरी आले. पठ्ठ्याने पाच-सहा महिने वाढवले, ती गोष्ट वेगळी. संक्रांत झाली… किंक्रांत झाली. मधे दोन-तीन दिवस गेले. आम्ही सगळे मामांना भेटायला गेलो होतो. आम्हाला सगळं संपलंय ते माहीत होतं. हळदी कुंकूचं पर्व सुरू होतं. आम्हाला पाहून मामींनी त्यांच्या बाईंना बाजारातून तिळाचे लाडू, फुलं आणि वाणासाठी म्हणून काही वस्तू घेऊन यायला सांगितलं.
हेही वाचा – मैत्रिणींनो स्वत:ला जपा!
घरात एक बोचरी शांतता होती. आमच्याशी थोडं बोलून थकलेल्या मामांना डोळा लागला होता. मामीने जरा बरीशी साडी नेसली. त्यांच्या बाई बाजारातून परत आल्या. मामींनी आम्हाला हळदी कुंकू लावलं, फुलं, तीळगूळ आणि वाण दिलं. काय मनस्थिती असेल त्यांची? त्यांना माहीत होतं की, ते त्याचं शेवटचं हळदी कुंकू आहे. मान वर करून कुणाकडेही बघण्याची माझी हिम्मत होत नव्हती. मामींनी मला वाकून नमस्कार केला (आमच्याकडे नमस्कार करताना सवाष्णीचं वय बघत नाहीत. लहान-मोठ्या सगळ्या जणींना वाकून नमस्कार करतात) आणि माझा बांध फुटला. भरल्या डोळ्यांनी माझी आई आणि बहीण मला रडू नकोस म्हणून खुणावत होत्या. अवस्था त्यांचीही माझ्यासारखीच झाली होती. मामी मात्र कसनूस हसल्या. त्यांचं शेवटच हळदी कुंकू पार पडलं होतं.
चार महिन्यांनी मामा गेले. आजही मामाच्या घरी गेले की, निघताना मामी सांगतात, ‘देव्हाऱ्यातलं हळदी कुंकू लावून घे गं!’ तेव्हा माझ्या मनात किती पडझड होते, हे मी कोणालाच सांगू शकत नाही…!


