ॲड. कृष्णा पाटील
भाग -1
“अरे, जिच्यासोबत मी सोळा वर्षे संसार केला ती माझी होऊ शकली नाही. तिला मी पूर्ण समजलो नाही. आता येणारी तर एकदम नवीन असणार. तिला मी काय समजू शकणार?” आभाळाकडे नजर लावून सूरज उदास मनाने बोलत होता. त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. कशातच मन लागत नव्हतं. त्याची पत्नी जाऊन आज तीन वर्षे झाली होती. ती जिवंत असताना दोघांचे कधीही पटले नाही. सगळा संसार ओढून ताणूनच सुरू होता. सूरज कधीतरी नंदूकडे यायचा. सगळ्या गोष्टी सांगायचा. मनातल्या सर्व बऱ्या-वाईट गोष्टी सांगण्याचं त्याचं एकमेव ठिकाण म्हणजे नंदू. अगदी बालवयापासूनच दोघांची मैत्री.
गावाबाहेर भैरवीच्या टेकडाजवळ हायवेला लागून ज्योतिर्लिंग चहा सेंटर होतं. पत्र्याचे शेड टाकून तिथेच चार प्लास्टिकच्या खुर्च्या टाकलेल्या होत्या. हायवेचे काम सुरू झाल्यावर गावातील केरबाने ही टपरी टाकलेली होती. नंतर त्याचं रूपांतर “ज्योतिर्लिंग चहा सेंटर”मध्ये झालं. नंदू आणि सूरज नेहमी इथेच बसायला यायचे.
नंदू म्हणाला, “तरीपण सूरज तू फेरविचार करायला हवास. पूर्वीचं झालं गेलं विसरून जायला हवं. नव्याने जिंदगीला सुरुवात करायला हवी. असं कोरडेपणाने कुठपर्यंत जगणार आहेस?” चहा पिऊन झालेल्या रिकाम्या कपावर सूरज टिकटिक वाजवत होता. तो खूप खोलवर विचाराच्या तंद्रीत होता. नंदूचं बोलणं तो शांतपणे ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर कमालीची उदासीनता पसरली होती. त्याला पराकोटीचा थकवा आला होता. आता कोणताच संवाद त्याला नको होता. तरी पण तो अशक्त आवाजात म्हणाला, “तुला खरं सांगू का? माणुसकी आणि जीवनावरूनच माझा विश्वास उडाला आहे. आपण का जगायचं आणि कशासाठी जगायचं, हे प्रश्न तर मला सुरुवातीपासूनच पडायचे. जगण्याचे प्रयोजन आजपर्यंत सापडलेले नाही. ज्या प्रेमासाठी आपण रात्रंदिवस राबतो ते प्रेमही मला उमगलं नाही. कदाचित माझ्या अपेक्षा जास्त असतील. कदाचित माझं थोडंफार चुकीचं असू शकेल. परंतु समजून घेणारं मला कोणी भेटलं नाही. जी भेटली होती ती तशी…”
सूरज प्रचंड निराश झाला होता. तो बोलत होता तेही खरं होतं. खरं म्हणजे, त्यांच्या संसारामध्ये दुःखाचं काहीही कारण नव्हतं. कोणतंही असं मोठं संकट आलं नव्हतं. गरीबीचा किंवा पैशा-अडक्याचा सुद्धा प्रश्न नव्हता. खाऊन-पिऊन सुखी असणारा तो परिवार होता. परंतु काही केल्या दोघांची वेव्हलेंथ जुळत नव्हती. सूरज असा वक्तशीरपणा जपणारा. काटेकोर स्वभावाचा. पूर्ण डिसिप्लिन. पण या उलट कामिनीचं होतं. ती कधीच कोणत्या गोष्टी गांभीर्याने घेत नव्हती. आपण जिंदगी मनसोक्त जगण्यासाठी जन्माला आलो आहे असंच ती म्हणायची. तिला दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं, असं कधीच वाटत नव्हतं.
कामिनी आयटी कंपनीत जॉब करत होती. महिन्याला ऐंशी हजार रुपये कमवत होती. सूरजला ती नेहमी म्हणायची, “माझं संपूर्ण शिक्षण माझ्या आई-वडिलांनी केलं आहे. मला जो जॉब लागला आहे, तोही त्यांच्यामुळेच लागला आहे. त्यामुळे माझ्या पगारावर केवळ आणि केवळ माझा अधिकार आहे. त्या पैशाचं काय करायचं, काय नाही ते मी ठरवणार. मला माझ्या पगाराबाबत कोणीही विचारलेलं आवडत नाही.”
हेही वाचा – दुसरा दु:खी, आपण सुखी!
सूरज म्हणाला, “तुझ्या पगारातला एक रुपया सुद्धा आम्हाला नको आहे. परंतु बाबांचं म्हणणं आहे की, आपलं कुटुंब हे ‘एकत्र कुटुंब’ आहे. त्यामुळे येणारा सगळा पगार आणि त्याचा हिशेब घरी द्यायला हवा. मीही माझा संपूर्ण हिशेब घरी देत असतो. केवळ कुटुंबप्रमुख म्हणून बाबांना या गोष्टी हव्या असतात. त्यांनी कधी आपल्याकडून रुपयची अपेक्षा केलेली नाही.”
“पण मी हिशेब का द्यायचा? मी कष्ट करते. मी पैसे मिळवते. माझ्या पगाराचा हिशेब मागणारे तुम्ही कोण? मला पूर्ण शिक्षण देऊन, जॉब लावला तरी आई-वडिलांनी कधी हिशेब विचारला नाही. तुम्ही मात्र दर महिन्याला मला हिशेब विचारत राहता.”
सूरज म्हणाला, “तू पण मला दर पगाराला विचारतेस. मी माझा सर्व हिशेब तुझ्याकडेच देत असतो. माझे एटीएम कार्ड तुझ्याकडेच आहे. मी कधी तक्रार केली का? आई-बाबा तर केवळ हिशेब विचारतात. तुझ्याकडे पन्नास लाख शिल्लक असले तरी, त्यातले पन्नास रुपये सुद्धा कोणी मागत नाही. तुम्ही मिळवताय, तुम्ही तुमच्या आणि मुलांच्या भवितव्यासाठी बचत करा… हेच त्यांचं सांगणं असतंय. काय चुकतंय त्यांचं?”
“मला माझ्या पगाराबाबत कोणीही विचारलेलं चालणार नाही. बस्. या पलीकडे मला काही बोलायचे नाही…”
“आता तंद्रीतून बाहेर या. दिवस मावळायला गेला आहे. उर्वरित भागावर उद्या चर्चा करूया.” नंदू हसत हसत म्हणाला. त्याने चहाचे बिल भागवले. नंतर सूरजने जवळ येऊन त्याच्या पाठीवर थाप मारली. उठून दोघेही गावाकडे जाण्याच्या रस्त्याला लागले.
सायंकाळ व्हायला आली होती. सगळीकडे हळूहळू अंधार पसरू लागला होता. नंदू आणि सूरज गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने चालत जात होते. घरात कुणीच नव्हतं. सूरजची आई पाच-सहा दिवसांपूर्वीच तीर्थयात्रेला गेली होती. ती बिचारी मुलाच्या भविष्याच्या काळजीने खंगली होती. एकुलता एक पोरगा. तीन-चार वर्षांपूर्वी बापही अचानक निघून गेला. सुनेचं वागणं त्यांना पसंत नव्हतं. मुलाच्या आयुष्याचं कसं होणार, या काळजीने त्यांना मधुमेह झाला होता. रक्तदाब तर अगोदरच वाढला होता. एकेदिवशी निमित्त फक्त तापाचं झालं… दोन दिवस स्वानंद हॉस्पिटलला ॲडमिट केलं. तिसऱ्या दिवशी गावाकडे प्रेतच आलं. घर ओसाड पडलं.
सूरजने घराचे कुलूप काढले. दरवाजा उघडून तो आत गेला. उजव्या बाजूला त्याची प्रशस्त बेडरूम होती. तिकडे नजर गेल्यावर त्याला आठवलं. वीस बाय वीसची बेडरूम नको म्हणत असताना बाबा म्हणाले, “पुढे मुलं झाल्यानंतर ही सुद्धा अपुरी पडणार आहे. त्यांना चालता येईपर्यंत व्यवस्थित खेळता यायला हवं.” बेडरूम करतानाच बाबांनी अशी भव्यदिव्य केली होती. आपली नातवंडे मनसोक्त खेळली पाहिजे. सुसंस्कारी निपजली पाहिजेत. दुसरी पिढी स्वाभिमानी बनली पाहिजे. कसली कसली स्वप्नं पाहिली होती बाबांनी…
पण दुर्दैव हे की, सुट्टीच्या दिवशी पुण्याहून ज्या-ज्या वेळी कामिनी आणि सूरज गावाकडे आली, त्या-त्या वेळी कामिनी गावाकडे कधीच थांबली नाही. एक दिवस जीवावर उदार होऊन मुक्काम केला की, लगेच आई-वडिलांच्याकडे जात असे. तिथे मात्र ती चार-चार दिवस राहात असे. परत ड्युटीवर जात असताना तिथूनच जात असे.
सूरजच्या दोन्ही मुलांना आजी-आजोबांचा लळाच लागू शकला नाही. कामिनीने जाणीवपूर्वक तो लावून घेतला नाही. एके दिवशी सूरजने तिला समजावून सांगितले… म्हणाला, “मुलं आजी-आजोबा सोबत लहानाची मोठी झाली तर, त्यांच्यावर संस्कार चांगले होतात. त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने आपणास विचार करावा लागेल. गावी गेलो की, मुलं गावीच खेळलेली बरी.”
त्यावर संतापाने कामिनीने डोळे वटारले. म्हणाली, “इथे आज्जी-आजोबा आहेत आणि तिकडे कोण आहे? तिकडे आजी-आजोबा नाहीत? का ते संस्कार करू शकत नाहीत? तुम्हाला तुमच्या आई-बापाचं कौतुक वाटत असेल. परंतु आतून ती कशी आहेत हे मलाच माहीत आहे. माझ्या मुलांच्यावर त्यांची सावलीसुद्धा पडता कामा नये!”
सूरजचा संयमच तुटला. वाटलं उठावं आणि दोन तडाके लावावेत. परंतु ते त्याच्या संस्कारामध्ये बसत नव्हतं. तो गप्प बसला. रात्रभर तळमळत राहिला. इतक्या हेकट स्वभावाची बायको आपल्याला मिळाली याचा त्याला पश्चाताप वाटू लागला.
बेडरूमकडे पाहत तो तसाच किचनमध्ये गेला. गॅस पेटवला. पातेल्यामध्ये रात्रीसाठी भात टाकला. पुण्याला तो कधीकधी स्वतः स्वयंपाक करायचा. त्याला बऱ्यापैकी स्वयंपाक येत होता. हँगरचा टॉवेल काढून तो बाथरूममध्ये गेला. थोड्याच वेळात फ्रेश होऊन बाहेरच्या कोचवर निवांत बसला.
आई सात दिवसांकरिता तीर्थयात्रेला गेली होती. घरी सूरज एकटाच होता. एकटा असला की, घर खायला उठतं. दिवसभर नंदू बरोबर वेळ जात होता. पण रात्र झाली की, अंगावर काटा यायचा. खरं म्हणजे, आता भीतीचं कारण नव्हतं. परंतु पूर्वी झालेले वाद, नवरा बायकोचे भांडण आणि एकमेकांना केलेली शिवीगाळ हे काही केल्या त्याच्या लक्षातून जात नव्हते.
कुकरची शिट्टी वाजताच तो उठला, गॅस कमी केला. पुन्हा कोचकडे परतला. समोरचा टीव्ही बंद करून तो तसाच पडून राहिला. तो छताकडे पाहात विचार करीत राहिला. दोन्ही मुलांना तिने फक्त आई-वडिलांपासून तोडलं नाही, तर माझ्यापासूनही तोडलं. घटस्फोटाची केस दाखल केल्यानंतर कामिनीने डायरेक्ट कोर्टाला प्रश्न विचारला होता… “साहेब, माझे शिक्षण माझ्या आई-वडिलांनी पूर्ण केलं. मला त्यांनीच जॉब लावला. नंतर माझं लग्न झालं. त्यामुळे माझ्या येणाऱ्या पगारावर माझाच पूर्ण अधिकार आहे. तरीही सासरची माणसे मला हिशोब विचारत राहिली. मी अजिबात दिला नाही. माझं काय चुकलं सांगा साहेब. माझ्या पगारावर माझा पूर्ण अधिकार आहे की नाही?”
कोर्टाने सांगितले, “तुम्ही तुमच्या वकिलांशी चर्चा करा. त्यातून तुम्हाला काही शंका असतील तर मला विचारा.”
कोर्टरूमच्या बाहेर आल्यानंतर वकिलांनी तिला समजावून सांगितले. वकील म्हणाले, “आपल्या हिन्दू धर्मामध्ये लग्न म्हणजे पवित्र बंधन असते. एकदा लग्न झाले की, आई-बाप, भाऊ-बहीण या सर्वांशी तुमचा संबंध तुटला. तुमचे स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव हे सुद्धा राहात नाही. हे सर्व सासरचेच लावावे लागते. आंतरजातीय लग्न असेल तर, ज्याच्याबरोबर लग्न केले जाते, त्याची जात तुम्हाला चिकटते. त्यामुळे लग्नानंतर तुम्ही स्वतः आणि तुमची जी काही मिळकत आहे, त्या सर्वांवर अप्रत्यक्षपणे सासरचा अधिकार राहतो. सासरच्या मिळकतीमध्ये तुम्हाला हिस्सा मिळतो. परंतु पती जिवंत असेपर्यंत त्याबाबतही कुठे खटला दाखल करता येत नाही. कारण, नवरा आणि बायको हे दोन्ही एकच आहेत, असे कायदा मानतो.”
कामिनी म्हणाली, “म्हणजे माझ्या पगारावर सासरच्या लोकांचा अधिकार आहे, असे तुम्हाला म्हणायचे आहे का?”
वकील म्हणाले, “तुम्ही सुशिक्षित आहात. तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या आहेत. तुम्ही जो अर्थ काढणार आहात, तो काढा.”
कुठल्याच बाबतीमध्ये ती मागे हटायला तयार नव्हती. तिचा पगार म्हणजेच तिला सर्वस्व वाटत होतं. कोर्टापुढे प्रकरण मिटवण्यासाठी आले तेव्हा कोर्टाने सांगितले, “मुलाच्या भवितव्याचा विचार करून तुम्ही निर्णय घ्या. दोन मुलं झाली आहेत. आता घटस्फोट घेऊन काय करणार आहात?”
हेही वाचा – सुटका सावकारी पाशातून…
कामिनी म्हणाली, “साहेब मी महिन्याला ऐंशी हजार रुपये मिळवते. मला माझी दोन मुलं जड नाहीत. मी त्यांचं भवितव्य उज्ज्वल बनवू शकते. शिवाय मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे. मला कुणाच्या टेकूची गरज नाही. मला माझ्या आई-वडिलांनी स्वाभिमानाने राहायला शिकवले आहे. त्यामुळे या केसमध्ये मी कदापी तडजोड करणार नाही. माघार तर, अजिबात घेणार नाही. मला घटस्फोट हवा आहे. राहता राहिली मुलांची जबाबदारी. दोन्हीही मुलं सासरमध्ये जगू शकणार नाहीत. त्या दोन्ही मुलांची मी जबाबदारी घेत आहे. मी तसे लिहून देते. यापुढे मला तिकडे जायचे नाही.”
सूरज म्हणाला, “इतकी भावनिक होऊन निर्णय घेऊ नकोस. विचार करण्यासाठी अजून थोडा कालावधी घे. आपण ज्या मार्गाने निघालो आहे, तो मार्ग अत्यंत विषारी आहे. आपण दोन जीव जन्माला घातले आहेत. तुझ्या पगाराचा हिशेब आणि तू मिळवतेस तो पैसा याचा विषय आता कधीच संपला आहे. तुला घरातील नव्हे मी सुद्धा विचारणार नाही. गेली दहा वर्षे मी तुला कधी विचारले नाही. आता काय विचारणार आहे? तू किती कमवतेस? किती खर्च करतेस? याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. परंतु आपण आत्तापर्यंत एकत्र राहिलो. आयुष्याच्या शेवटपर्यंत असेच राहूया, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. केवळ तुला पैसा मिळतो म्हणून भरलेला संसार मोडणे योग्य नाही. अजून विचार कर.”
कामिनी शांत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही बदल झाला नाही. अत्यंत क्रूर चेहऱ्याने तिने पेपरवर सह्या केल्या. तो पेपर वकिलांच्याकडे देत म्हणाली, “साहेब तुम्ही तुमचे काम पुढे चालू ठेवा. आपल्याला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे.” तिने सूरजकडे पाहिले सुद्धा नाही. सूरजकडे पाठ करून ती कोर्टाबाहेर ताडताड चालत गेली.
क्रमश:
मोबाइल – 9372241368


