Thursday, January 15, 2026

banner 468x60

Homeललितस्वप्न : खोल… खोल… न संपणारा जिना!

स्वप्न : खोल… खोल… न संपणारा जिना!

स्नेहा सुतार

भाग – 1

काल विजयादशमी. चांगल्याचा वाईटावर, सत्याचा असत्यावर या दिवशीच तर विजय झालेला. रामाने रावणाचा वध केलेला. खरंच? चांगल्याचा वाईटावर विजयवर विजय होतो खऱ्या आयुष्यात? कोण वाईट मुळात? प्रत्येकाला तर आपणच स्वतःच बरोबर वाटत असतं! मी करतोय ते बरोबर हेच वाटत असतं नाही का? मला तर हल्ली आत्तापर्यंत मी जगलेल्या आयुष्याने प्रचंड कन्फ्यूज केलंय माणसा माणसांबाबत. कोण, कसं, कुठे, काय वागतं हे कळतच नाही!!! कोण कधी कसं बदलेल हेही कळत नाही! दहा तोंडांच्या रावणाचा वध झाला. दहा तोंडांची माणसं मात्र आजूबाजूला खूप दिसतात. एक तोंड खरं म्हणता म्हणता दुसरं तोंड दिसतं. दुसरं तोंड खरं म्हणता म्हणता तिसरं… स्वतःमध्ये कितीतरी माणसं दडवून असतायत माणसं.

बा. भ. बोरकरांच्या, सौमित्रच्या, मंगेश पडगांवकरांच्या, ना. धों. च्या, कुसुमाग्रजांच्या, गुरू ठाकूरांच्या कविता, चं. गो. च्या चारोळ्या, सलील- संदीपची गाणी या सगळ्यांवर निस्सीम प्रेम करणारी मी आयुष्य जगताना कित्येकदा (बहुधा बऱ्याच वेळा) शुद्ध अपेक्षाभंगाच्या अनुभवाने व्यथित झाले. ‘आयुष्य सुंदर आहे’ असे विचार मनात घेऊन जगताना आयुष्याने मी कसा वाईट हेच जास्त दाखवून दिले. तरीही, मला जाम मजा वाटते, आजूबाजूला बघताना. माणसं कशी बदलतायत हे बघताना… खरंतर, ती मजा हळूहळू मलाच पोखरू लागतेय. मी अजून अजून विचार करत बसतेय या सगळ्याचा… असं कसं? असं का? कशामुळे? जगात शाश्वत काहीच नाही? एखादा तरी माणूस आपल्या विचारांप्रती, भावनांच्या बाबतीत शाश्वत नाही? असे बरेच दिसतात की! पण मग ती माणसं माझ्या आयुष्यात का नाही? किंवा माझ्याबाबतीत असं का नाही?…

विचार करता करता पणजी कधी आलं कळलं पण नाही. ती बसमधून उतरली. हातातली बॅग सांभाळत तिने डावी-उजवीकडे बघितलं आणि ती सरळ निघाली. दुसरी बस पकडायला. आजही पुन्हा तेच स्वप्न सकाळचं… ‘मी म्हापशात आहे. वाट बघतोय तुझी. लवकर ये.’ मेसेज अलर्ट ऐकताच नोटिफिकेशनमधूनच तिने मेसेज वाचला आणि इतक्यात हातात असलेलं सगळं काम सोडून “मी निघते,” एवढं सर्वांना म्हणून ती जिना उतरतेय. जिना उतरतेय… अजूनही उतरतेय… जिना संपतच नाही. गोल गोल फिरतोय. खाली… खाली… खाली… ती जातच आहे. पायऱ्या उतरतच आहे. बापरे! दम लागलाय. पाणी हवंय पण तिला थांबायचं नाहीये, कारण तो वाट पाहतोय तिची. तिला जायचंय. त्याच्याकडे. धावत, पळत. पण मेला हा जिनाच संपत नाहीये कसा… खोल… खोल… खोल… ती उतरत चाललीये… तो थांबलाय… वाट बघतोय… मी येतेय रे.. थांब! डोळ्यातून पाणी वाहतंय सतत… पण तेही पुसायला तिला वेळ नाहीये. मी येतेय सोन्या… मी येतेय. काय करू हे संपतच नाहीये… हे संपतच नाहीये रे… 

हेही वाचा – आपुलेची मरण पाहिले म्यां डोळा…

खाडकन तिचे डोळे उघडले…. असं सकाळचं स्वप्न. बसकडे जाता जाता तिला आठवलं. आज डोकं खरंतर जास्तच भिरभिरतंय. नुसते विचार. तिला वेड लागेल असे विचार. ती बसमध्ये चढली. मागची सीट तिने पकडली. खरंतर, दोन सीट सोडल्या तर पूर्ण बस रिकामी होती. ती बसमध्ये पुढून चढलेली. पण मागच्याच सीटवर तिला बसायला हवं होतं. त्या सीटच्या मागे बसमधून खाली उतरायचं दार. ही सीट म्हणजे सगळ्यात दुर्लक्षित सीट, असं तिला वाटायचं. खरं खोटं देव जाणे! पण या सीटवर बसणं म्हणजे सगळ्या जगापासून मी दूर आहे, असं तिला वाटायचं. जगापासून दूर म्हणजे स्वतःपुरतं… एकटं…. एकाकी!

कानातले इअरफोन नीट करून मग ती गाणी लावायची वेगवेगळी. आता पण चालू होतं. ‘आताशा असे हे मला काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते… ” आणि खरोखरच हिचे डोळे पाण्याने भरून यायला लागले… आपोआपच. रुमाल डोळ्यांशी नेऊन तिने भरभर रुमाल भिजवला. बरं झालं, बसमध्ये मला बघणारं कुणी नाही. बरं झालं, मला कुणीच बघत नाही. बरं झालं, बस अजून भरली नाही. आता माणसं येतील. बसमध्ये बसतील, उभी राहतील. बसमधल्या मिळेल त्या दांड्याला लगडतील. “फाटी वच पोवया, फाटी वच!!!” म्हणून कंडक्टर पुढून दारातून येऊन खेकसत राहील एकसारखा… दाराकडल्या दांड्याला माणसं लगडेपर्यंत हा असा ओरडत राहील. वाटलं तर बसमध्ये चढून एकेकाला ढकलेल. “जागो हा मरे फाटल्यान कितलो…” माणसं हसतील, किचकीचतील, बोलतील, खुसफुसतील… एक ना दोन, अनेक माणसं. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली, वेगवेगळ्या रंगातली, वेगवेगळ्या वासाची, वेगवेगळ्या आवाजाची, वेगवेगळी वागणारी… त्यात सगळ्यात मोठा आवाज असेल तो कंडक्टरचा. कोण समजत असेल हा कंडक्टर स्वतःला? बसचा मालक, हीरो, बसचा राजा… केवढ्या मोठ्याने बोलेल, “पोयशे काढ, खंय वयता?” कोणीतरी गडबडून जाईल याच्या येण्याने. कुणी पैसे काढून हाताच्या मुठीत गच्च धरून ठेवेल, कुणी चुरगळलेली नोट सरळ करेल, कुणी मनातल्या मनात ठरवत असेल कुठला स्टॉप सांगायचा, कुणाला भीती वाटेल हा माझ्या जागी मला पोहोचवेल की नाही? कुणी वेळेत पोहोचू की नाही याचा आराखडा तयार करत असेल. कुणाच्या मनात काय असेल!!!

पण खरंच बरं झालं अजून हे चित्र तयार झालं नाही. अजून एकेका सीटवर माणसं येऊन बसतायत. या की त्या, हे विचार करून बसतायत म्हणजे अजून बऱ्याच सीट्स आहेत बसमध्ये. तिच्या लक्षात आलं, तिच्या कुरळ्या केसांची एक बट कुठूनशी निसटून तिच्या डोळ्यांवर आलीये. हुळहुळ नुसती! पण जाऊ दे, हेही बरं वाटतंय. तिने ती नीट करायची तसदी घेतली नाही. दुपारचा डोळ्यांना विरघळ आणणारा वारा ऊन ऊन वाहत होता. आजूबाजूला हरतऱ्हेचे आवाज असले तरी, आता ती आणि सलील दोघेच त्या बसमध्ये होते. सलील तिला त्याच्या डोळ्यातल्या पाण्याविषयी गाण्यातून सांगत होता… 

हेही वाचा – मनाची श्रीमंती… मित्राची अनोखी कहाणी!

हळूहळू तिने विचार केलेलं मघाचं बसमधलं चित्र आकार घ्यायला लागलं… म्हणता म्हणता बस हळूहळू पुढे सरकू लागली. येतोयस की जाऊ? अशा अविर्भावात बस मागे पुढे करून ड्रायव्हर न बोलताच लोकांना प्रश्न विचारू लागला. मधेच “चल मरे या आता!” म्हणून कपाळावरचा घाम गाडीच्या काचेवरच्या समोरच्या वायपरसारखी तर्जनी वापरून पुसत होता. “राव रे या…” म्हणून खाली रस्त्यावर कंडक्टर अजून माणसांना हाताने बोलवत होता. शेवटी बसच्या दाराकडच्या दांड्याला माणसं लगडली तसा बसचा कंडक्टर बसमध्ये चढला, शेवटचं एकदा मोठ्याने लोकांना बोलवून एकदाचं “चल या रे” असं ड्रायव्हरला म्हणून त्याने खाडकन दार लावून घेतलं. आणि बस निघाली. बसमधली माणसं बसच्या धक्क्याने हलू डुलू लागली. वाऱ्याची झुळूक अधिक तीव्र झाली. हुळहुळणारी डोळ्यांवरची बट आता अज्जिबात ऐकेना, तेव्हा ती बोटाने कानामागे तिला घ्यावीच लागली. फोनच्या व्हॉल्यूमचं प्लस बटण दोनवेळा दाबलं तसं सलील मोठ्याने गाणं म्हणू लागला… अगदी इतरांचा, आजूबाजूचा आवाज तिच्यापुरता दबून गेला एवढ्या मोठ्यानं…

क्रमश:

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!