डॉ. विवेक वैद्य
प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतात. आता माझा एक मित्र आहे, त्याने लग्नच केले नाही. तो आम्हा सगळ्या संसारी मित्रांना म्हणतो मी तुमच्यापेक्षा सुखी आहे. आम्हीही ते मान्य करतो, पण आमचा एक वात्रट मित्र त्याला म्हणतो, “भले तू आमच्यापेक्षा सुखी असशील, पण स्वर्गसुख म्हणजे काय? हे तुला मरेपर्यंत समजणार नाही.” तर, ते असो. माझ्याही सुखाच्या कल्पना काही खूप मोठ्या नाहीत… मी छोटया गोष्टीत सुख शोधतो.
आता सकाळी बायको भेंडी किंवा ढेमसे किंवा शोपालक अशी आपल्याला न आवडणारी भाजी करणार असते… “ती भाजी मला आवडत नाही. तू दुसरंही काही कर,” हे सांगण्याची हिम्मत आपल्यात नसते. आपण बाहेरून दुपारी येऊन जेवणासाठी बसावे आणि भेंडीऐवजी चक्क हॉटेलमधील चमचमीत व्हेज कोल्हापुरी आपल्या पानात पडावी, आपण आश्चर्यचकित! मग मुलगा म्हणाला की, “आई काही काम करायला दुसऱ्या खोलीत गेली तर, भाजी जळाली. नेमके घरातले कांदे बटाटेही संपलेले. मग मीच आईला म्हणालो, कशाला आता परत दुसरी भाजी करते? मी जवळच्या “काका का ढाबा” येथून भाजी घेऊन येतो.” (आमच्या वात्रट कार्ट्यानेच आई दुसऱ्या खोलीत गेलेली पाहून मध्यम आचेवर ठेवलेली भाजी गॅसची आच वाढवून जाळली असावी, असा मला दाट संशय आहे… पण आपण कशाला बोला? आम खाने का, लेकिन पेड नहीं गिनने का!) तर, सांगायचे काय तर मी छोट्या गोष्टीत सुखी होतो. सुख सुख म्हणजे तरी काय असते?
हेही वाचा – …अन् अंकूसोबत नव्याने संसार सुरू केला!
आमच्याकडे बायकोच्या माहेरचे बरेच लोक आले होते. आजकालच्या रिवाजप्रमाणे मी त्या सगळ्यांना हॉटेलला जेवायला घेऊन गेलो. बरीच मंडळी होती, प्रत्येकाने वेगळी ऑर्डर दिली… आता माझ्या खिशाला कितीची फोडणी बसते, याचा विचार करत मी माझ्यासाठी फोडणीचा भात सांगणार होतो… पण मेन्यूत तो नव्हता! जेवण संपत आले आणि मी जरा वॉशरूमला गेलो. मी परत आलो तोपर्यंत वेटर बिल घेऊन आला होता आणि आलेल्या पाहुण्यांपैकी एकाने बिल देऊनही टाकले होते! मी त्याला खूप म्हणालो की, “तुम्ही आमचे पाहुणे आहात तर तुम्ही बिल देणे उचित नाही.” त्याला पैसे देण्याचा प्रयत्नही केला, पण त्यानेठ अजिबात घेतले नाहीत.
रात्री बायको तणतण करत होती… “तुम्ही त्याचवेळी बाथरूमला कसे गेले?” मी निष्पाप चेहरा करून म्हणालो, “ते काय कोणाच्या हातात असते? शिवाय, बिल आपण मागवल्याशिवाय येत नाही. ते मागवलेलंच नव्हतं…”
“मग ते आले कसे?”
“मला काय माहीत? “मी चेहरा अजूनच भोळा करतो.
बायकोला दाट संशय आहे की, वॉशरूमला जाता जाता मीच वेटरला बिल घेऊन जायला लावले. पण तिच्याकडे यासाठीचा पुरावा नसल्याने ती नुसतीच तणतणत राहते!
तर सांगायचे म्हणजे मी छोट्या गोष्टीत सुखी होतो. सुख सुख म्हणजे तरी काय असते?
हेही वाचा – गोष्ट कैकेयी आणि मंथराची… अमोल आणि सुशीलाची सुद्धा!
बायकोची एक सुंदर मैत्रीण बऱ्याच महिन्यांनी तिला भेटायला आली. आता एवढी सुंदर आहे तर तरुणपणी किती सुंदर असेल? तर ते असो. त्या दोघी गप्पा मारत असताना मी सहज म्हणून तिथे जातो आणि फॉरमॅलिटी म्हणून दोन शब्द तिच्याशी बोलतो… योगायोग म्हणा की, आणखी काही तिच्या आणि माझ्या आवडीच्या गोष्टी कॉमन निघाल्या! मग काय? चांगल्याच गप्पा रंगल्या. बायकोच्या अस्वस्थ चेहऱ्याकडे मी दुर्लक्ष केले. गप्पा मारता मारता विषय माझ्या ऑफिसवर आला…
“पण भाऊजी आज तुम्ही घरी कसे? ऑफिसला सुट्टी का?”
आता बायकोने उत्साहाने माहिती पुरवली, “अगं ते निवृत्त झाले नं यावर्षी? आता घरीच असतात!”
(हे सांगण्याचा मुख्य उद्देश माझे वय सांगण्याचा होता. पण परिणाम उलटाच झाला.)
“बापरे! वाटत नाही एवढे वय असेल तुमचे? छान मेन्टेन केलंय हां तुम्ही स्वतःला…”
मी आपले “कसचं कसचं…” म्हणून लाजून मान खाली घातली.
“आमच्या यांनाही सांगा न काही टिप्स छान मेन्टेन राहण्यासाठी… खूप वजन वाढले आहे त्यांचे.” इति मैत्रीण (आता आमची कॉमन झालेली!)
मीही उत्साहाने माहिती पुरवणारच होतो, तेवढ्यात बायकोचा संतापाने लाल झालेला चेहरा नजरेस पडला आणि मी तिथून काढता पाय घेतला.
मैत्रीण गेल्यावर बायको रागारागाने म्हणाली, “काय गरज होती आमच्या गप्पांत यायची? “
“अगं, घरात आलेल्या पाहुण्याकडे फॉरमॅलिटी म्हणून विचारपूस करायला नको? तिला काय वाटले असते! आपल्या मैत्रीणीचा नवरा एवढा गर्विष्ठ? दोन शब्द बोलायला ही आला नाही…”
मी आपला चेहरा शक्य तितका भाबडा ठेवून म्हणालो. बायको काही बोलत नाही, पण भांडे नको तितके आपटते. मी काय करणार?
दोन दिवसांनी मी हळूच बायकोला विचारतो, “तुझ्या त्या मैत्रिणीचा फोन आला होता का? तिला काही हेल्थ टिप्स द्यायच्या होत्या.” बायको माझ्याकडे जळजळीत नजरेने पाहाते… त्यामुळे पुढे मी काही बोलू शकत नाही.
तर, सांगायचे काय की, मी छोट्या छोटया गोष्टीत सुखी होतो. सुख सुख म्हणजे तरी काय असते? एका तत्वज्ञानी माणसाने म्हटले आहे, ‘सुख हे सापेक्ष असते…’ म्हणजे काय ते मला माहीत नाही. माझे आपले साधेसुधे तत्वज्ञान असते… तर ते असो…


