Friday, January 16, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari :  पैं जो जिये देवतांतरीं, भजावयाची चाड करी…

Dnyaneshwari :  पैं जो जिये देवतांतरीं, भजावयाची चाड करी…

अध्याय सातवा

जयाचिये प्रतीतीचा वाखौरां । पवाडु होय चराचरा । तो महात्मा धनुर्धरा । दुर्लभु आथी ॥137॥ येर बहुत जोडती किरीटी । जयांचीं भजनें भोगासाठीं । जे आशातिमिरें दृष्टी -। मंद जाले ॥138॥

कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः । तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥20॥

आणि फळाचिया हांवा । हृदयीं कामा जाला रिगावा । कीं तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ॥139॥ ऐसे उभयतां आंधारीं पडले । म्हणोनि पासींचि मातें चुकले । मग सर्वभावें अनुसरले । देवतांतरां ॥140॥ आधींच प्रकृतीचे पाइक । वरी भोगालागीं तंव रंक । मग तेणें लोलुप्यें कौतुक । कैसे भजती ॥141॥ कवणीं तिया नियमबुद्धि । कैसिया हन उपचारसमृद्धि । कां अर्पण यथाविधि । विहित करणें ॥142॥

यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति । तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥21॥

पैं जो जिये देवतांतरीं । भजावयाची चाड करी । तयाची ते चाड पुरी । पुरविता मी ॥143॥ देवोदेवी मीचि पाहीं । हाही निश्चय त्यासि नाहीं । भाव ते ते ठायीं । वेगळाला धरी ॥144॥

स तया श्रद्धया युक्तस्तस्या राधनमीहते । लभते च ततः कामान् मयैव विहितान् हि तान् ॥22॥

मग श्रद्धायुक्त । तेथिंचें आराधन जें उचित । तें सिद्धिवरी समस्त । वर्तो लागे ॥145॥ ऐसें जेणें जें भाविजे । तें फळ तेणें पाविजे । परी तेंही सकळ निपजे । मजचिस्तव ॥146॥

अन्तवत् तु फलं तेषां तद् भवत्यल्पमेधसाम् । देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ॥23॥

परी ते भक्त मातें नेणती । जे कल्पनेबाहेरी न निघती । म्हणोनि कल्पित फळ पावती । अंतवंत ॥147॥

हेही वाचा – Dnyaneshwari : जैसा वारा कां गगनीं विरे, मग वारेपण वेगळें नुरे…

अर्थ

ज्याच्या अनुभवरूपी भांडारात स्थावर जंगमात्मक अखिल विश्वाचा समावेश होतो, हे अर्जुना, तो महात्मा दुर्लभ आहे. ॥137॥ ज्यांची भजने भोगासाठी असतात आणि ज्यांची दृष्टी आशारूपी नेत्ररोगाने मंद झालेली असते, असे इतर भक्त पुष्कळ मिळतात. ॥138॥

(जन्मांतरी मिळविलेल्या संस्कारांनी प्राप्त झालेल्या) स्वत:च्या स्वभावाने नियंत्रित झालेले आणि निरनिराळ्या (विषयांच्या) अभिलाषांनी ज्ञान नष्ट झालेले (लोक) निरनिराळ्या नियमांचा आश्रय करून (माझ्याहून) वेगळया अशा देवतांची भक्ती करतात. ॥20॥

आणि फलाविषयीच्या तीव्र इच्छेमुळे अंत:करणात कामाने प्रवेश केला आणि त्याच्या संसार्गाने ज्ञानाचा दिवा गेला. ॥139॥ (बाहेर आशारूपी नेत्ररोगाने आणि आत अविवेकाने) असे दोन्ही प्रकारांनी (अज्ञानरूपी) अंधारात ते पडले. म्हणून त्यांच्या जवळच असणारा जो मी, त्या मला ते चुकले. नंतर (इच्छित फल देणार्‍या) निरनिराळ्या देवतांना सर्व भावाने भजू लागले. ॥140॥ अगोदरच देहात्मबुद्धीचे दास, त्याशिवाय आणखी भोगाकरिता दीन झालेले, असे ते लोक मग त्या विषयसुखाच्या लालसेने इतर देवांचे कशा कौतुकाने भजन करतात (ते पाहा). ॥141॥ त्या त्या देवतेच्या आराधनेविषयी जो जो नियम प्रसिद्ध आहे, त्याचा त्याचा आश्रय करून, कोणते कोणते उपचार लागतात ते जमवून, आणि ते उपचार अर्पण कसे करावेत, ते समजून घेऊन, शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे कर्मे करतात. ॥142॥

जो जो भक्त ज्या ज्या देवतेची श्रद्धेने भक्ती करण्याची इच्छा करतो, त्या त्या भक्ताची श्रद्धा त्या त्या देवतेच्या ठिकाणी मी स्थिर करतो. ॥21॥

परंतु, जो ज्या अन्य देवतांना भजावयाची इच्छा करतो, त्याची ती इच्छा पूर्णपणे पुरविणारा मीच आहे. ॥143॥ देवतान्तरातून मीच आहे, हा निश्चय देखील त्यास नसतो; त्या त्या देवतांविषयी त्याची भिन्न भिन्न समजूत असते ॥144॥

तो भक्त त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे आराधन करतो आणि मग (त्या देवतेपासून) मीच निर्माण केलेली इच्छितफळे त्याला मिळतात. ॥22॥

मग (त्या देवतेचे) जे योग्य आराधन असेल ते (तो) श्रद्धेने आपली कार्यसिद्धी पूर्ण होईपर्यंत संपूर्ण आचरतो. ॥145॥ याप्रमाणे ज्याने ज्याची इच्छा करावी, त्याला ते फळ मिळते. पण ते देखील सर्व माझ्यामुळेच होते. ॥146॥

परंतु त्या अल्पबुद्धी मनुष्यांना ते मिळालेले फल विनाशी ठरते. देवतांची भक्ती करणारे देवतांप्रत जातात आणि माझी भक्ती करणारे मजप्रत येतात. ॥23॥

परंतु ते भक्त मला जाणत नाहीत, कारण ते कल्पनेच्या बाहेर पडत नाहीत आणि म्हणून त्यास नाशवंत असे इच्छिलेले फळ प्राप्त होते. ॥147॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : हें असो आणिक कांहीं, तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!