रात्री अचानक गलका ऐकू आला म्हणून मी खिडकीतून खाली बघितले. सुरक्षा रक्षकाला कोणी तरी विनवणी करत होतं… बंगल्यात प्रवेश देण्याबद्दल. मी फोनवरून सुरक्षा रक्षकाशी संपर्क साधून विचारणा केली असता त्याने त्या व्यक्तीचे नाव सांगताच माझ्या छातीत धस्स झाले! मग मीच घाईघाईने खाली गेलो. तिथल्या प्रकाशात मी त्याला ओळखू शकलो नाही. माझा उडालेला गोंधळ बघून ती व्यक्ती मला म्हणाली,
“अरे केशवा, ओळखले नाहीस मला? मी तुझा शाळा सोबती वामन्या. वामन जोशी.”
“वामन्या तू! अरे पण, काय ही अवस्था करून घेतली आहेस तू?” मी त्याचा हात धरत सावकाश चालत त्याला खालच्या दिवाणखान्यात आणून बसवलं. आमच्या आवाजाने घरातील माणसे आपापल्या खोल्यातून बाहेर येत आम्हा दोघांना आश्चर्याने पाहात राहिली.
वामन एव्हाना बऱ्यापैकी शांत झाला होता. मी घरच्या मंडळींना वामनची ओळख करून दिली.
“केशवा, अरे माझ्यापाशी वेळ नाही जास्त. एकदा तुझं काम झालं की, मी निघेन लगेच,” असं म्हणून वामन्याने त्याच्या जवळच्या पिशवीतून एक वर्तमानपत्रात बांधून आणलेली वस्तू माझ्या हाती सोपवली आणि म्हणाला, “केशवा, आता माझा जीव खऱ्या अर्थाने शांत झाला. आता कधीही वरून बोलावणं आलं तरी मी जायला मोकळा झालो. तुझं ऋण डोक्यावर घेऊन जगत आलो आजवर. पण आज त्यातूनही मुक्त झालो.”
हेही वाचा – दुसऱ्यांना जगण्याची ताकद देणारा ‘अन्नसोहळा’
वामन्याचं बोलणं बुचकळ्यात टाकणारे होते. मी त्याला कागदात गुंडाळून काय आणलं आहे ते विचारले.
“तूच उघडून बघ केशवा…” वामन हात जोडून म्हणाला.
मी कागदाचा दोरा सोडला आणि त्याक्षणी त्यातून पैशाची बंडलं खाली पडली. मोठी रक्कम होती ती! वामन्याने पुढे होऊन माझे हात पकडले… “केशवा 20 वर्षांपूर्वी माझ्या पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी योग्य वेळी तू केलेल्या आर्थिक मदतीची मी व्याजासह आज परतफेड केली आहे. माझी पत्नी आता हयात नाही. पण तिच्या अखेरच्या दिवसांत मी तिला या परतफेडीचे वचन दिले होते. त्या वचनातून मी आज उशिराने का होईना, पण मुक्त झालो आहे.”
मी नि:शब्द झालो ते ऐकून! आजकाल पैशासाठी इमान विकणाऱ्या, नाती तोडणाऱ्या आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या कलियुगात वामन्यासारखी माणसं हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी तरी उरली आहेत, हे बघून मन सुखावले आणि थेट कोकणातल्या माझ्या शाळेच्या दिवसांत गेले.
माझे वडील भिक्षुकी करायचे, त्यामुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. वामन्याच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते. बालपणी केलेल्या सगळ्या मजा वामन्याने खर्च केलेल्या पैशांतून होत्या. आमच्यासाठी तो आनंदाने पैसे खर्च करायचा. पुढे शिक्षणासाठी मी मुंबईला मामांकडे आलो आणि तल्लख बुद्धीच्या जोरावर शहरातील एक निष्णात वकील म्हणून नाव कमावले. आज सगळी सुखं आणि लक्ष्मी माझ्या घरी भरभरून आहेत. पण वामन्याची आजची परिस्थिती बघून वाईट वाटले…
बोलता बोलता वामन्या बोलून गेला की, त्याचे अण्णा गेल्यावर हळूहळू किराणा व्यवसायाला उतरती कळा लागली. गावात मारवाड्यांनी तशीच दुकाने सुरू केली आणि गिऱ्हाईक आपोआप तुटत गेले. मी एव्हाना भानावर आलो.
“तू आधी जेवून घे, मग आपण बोलू निवांत.” मी म्हणालो.
पण वामन्याने त्याला नकार दिला.
“अरे, पण एवढी रक्कम तू उभी कशी केलीस?”
वामन्याचे उत्तर ऐकून मघाशी मी जमिनीवरून उचललेली पैशाची बंडलं पुन्हा एकदा माझ्या हातून निसटून खाली पडली.
वामन्या शांतपणे म्हणाला, “मी माझी एक किडनी दान केली. त्यातूनच मिळालेले हे पैसे आहेत. अरे, गेले काही वर्षे मी बैचेन होतो. पत्नीला दिलेलं वचन मला झोपू देत नव्हते. एक दिवस मुंबईतील एका रुग्णालयात एका रुग्णाला किडनीची आवश्यकता असल्याची जाहिरात वर्तमानपत्रात छापून आली होती. ती वाचून तडक इथे आलो. डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या करून मला परत काही दिवसांनी इथे बोलावून घेतलं. परमेश्वराच्या कृपेने पुढचं सर्व सुरळीत झाले… मी निघतो आता. मिळेल ती एसटी पकडून घरी जातो परत.”
हेही वाचा – लढाई… व्यवहार की भावना?
मी खूप गयावया करून देखील वामन्या थांबला नाही. मी बळेबळेच त्याला जेवायला लावले. वामन्याच्या मनाची श्रीमंती आमच्या सगळ्यांचेच डोळे दिपवून आणि पाणावून गेली!
ड्रायव्हरला गाडी काढायला सांगून मी त्याला मुंबई सेंट्रल डेपोमध्ये कोकणातील एसटीमध्ये बसवून दिले. बस सुटायच्या आधी वामन्याला घट्ट मिठी मारत मी म्हणालो, “वामन्या, मी आजवर मिळवलेली अफाट श्रीमंती तुझ्या मनाच्या श्रीमंतीसमोर खुजी ठरली आहे.”
उसनं अवसान आणून वामन्या माझ्या खांद्यावर थोपटत म्हणाला, “केशवा, जोपर्यंत मैत्री आणि माणुसकी जपणारी आणि तुझ्यासारखी वेळेला धावून येणारी माणसं या जगात आहेत, तोपर्यंत परतफेडीची दिवाळी साजरी करण्याचे भाग्य प्रत्येक याचकाला मिळत रहाणार.”
नुसतं विश्रांतीसाठी माझ्या घरी येण्याचे वचन मात्र मी वामन्याकडून घेतले आणि नंतरच्या काही क्षणांतच वामन्याची एसटी सुटली.
(टीप : माझ्या वकील मित्राकडून समजलेल्या सत्य घटनेवर आधारीत ही कथा आहे.)


