नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
पुनर्विवाह किंवा विधवा विवाह हा तसा आता तेवढा ज्वलंत विषय राहिलेला नाही. खरंतर, आजकाल पुनर्विवाह किंवा विधवा विवाह फार सर्रास होतात. त्यात काही गैर वाटत नाही, म्हणजे नसतंच त्यात काही गैर! पण समाजात जरा डोकावून पाहिलं तर असं दिसतं की, आजची पिढी फार पटापट लग्न करतात आणि झटपट घटस्फोटही घेतात. बरेचदा कारण फारच क्षुल्लक असतं. माहीत नाही, मुलं त्यांच्या पालकांचं याबाबतीत काही ऐकत असतील? की, आजचे पालकच मुलांना समजवायचं टाळतात! काही जण तर फार कमी वेळात दुसरं लग्न करतात. ते टिकतं किंवा टिकत नाही…
तर, आज अजून एक सत्य कहाणी, पुनर्विवाहाची! माझी एक छोटी मैत्रीण, तिची – अहं, तिच्या आईची सत्यकथा. ‘सविता’ म्हणूया का आपण त्यांना? तर, त्या सविता ताईंना दोन मुली. दोघींमध्ये जवळ जवळ 14 ते 15 वर्षांचं अंतर. मोठी ताई आणि धाकटी माझी मैत्रीण माई. तर, माई साधारण 3-4 वर्षांची असताना त्यांचे बाबा गेले. नातेवाईक अशा वेळी जरा लांबच होतात. आपल्यावर त्यांची जबाबदारी येऊ नये, बहुतांशी हेच कारण! पण आईच ती… ती काय आपल्या लेकरांची जबाबदारी झटकणार होती? ताई मोठी होती, त्यामुळे ती घर, माई आणि अभ्यास सगळं कसं निगुतीने सांभाळायला लागली. आईने गावातच नोकरी धरली. शिवाय, घरातच शिकवण्या सुरू केल्या. थोड्याच वर्षांत ताईच लग्न झालं. चांगलं घर मिळालं. आता आईवर फक्त माईची जबाबदारी होती. दोन्ही मुली हुशार आणि सुंदर. ताईचं सासरही खूप छान. तिचं रूप आणि गुण हेरूनच मागणी आली होती.
हेही वाचा – वाढदिवसाच्या शुभेच्छा… दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हा!
सासरी राहून देखील ताई माहेरी थोडीफार मदत करत होती. ताईला दोन मुलं झाली. माईचं पदवी शिक्षण पूर्ण झालं. ती अधूनमधून नाटकात, सीरियल, सिनेमात छोटेमोठे रोल करायला लागली. माईचं सुद्धा लग्न झालं. तिला एक मुलगा झाला. सविता ताई जबाबदारीतून मोकळ्या झाल्या. आता जबाबदारी ताई, माईची आणि दोन्ही जावयांची होती. सविता ताईंचा एकटेपणा दूर करायचा होता. त्या चौघांनी मिळून सविता ताईशी चर्चा केली… त्यांना गळ घातली… समजावलं… आणि त्यांचं नाव चक्क विवाह मंडळात नोंदवलं. दूर गेलेल्या नातेवाईकांनी आणि शेजारपाजारच्या लोकांनी नाकं मुरडली. बरीच स्थळं आली. त्यातलं एक स्थळ सगळ्यांच्या मते अनुरूप होतं. दादासाहेब विधूर होते… सधन होते… सविता ताईंना पुन्हा नोकरी करायची गरज लागणार नव्हती. ती तीनही कुटुंब आनंदात होती. पण दादासाहेबांच्या मुलांचा गैरसमज झाला की, या बाईने प्रॉपर्टीसाठी आपल्या वडिलांशी लग्न केलंय आणि आपल्या प्रॉपर्टीमध्ये अजून दोन भागीदारीणी आल्यायत. घरात खूप भांडणं व्हायला लागली.
काही गोष्टी काळावर सोडायच्या असतात. तसंच झालं दादासाहेबांच्या घरातलं वातावरण निवळायला लागलं होतं. सरतेशेवटी, सगळी कुटुंबं एकत्र आली, अगदी happy ending! मुलींनी स्वतःच्या लग्नानंतर नव्हे तर, मुलं झाल्यावर का होईना, आईचा, तिच्या सुखाचा अन् गरजांचा विचार केला. त्यांच्या फक्त नवऱ्यांनीच नाही तर त्यांच्या सासरच्या लोकांनी सुद्धा या गोष्टीला पाठिंबा दिला.
हेही वाचा – ‘त्या’ राजस्थानी महिलांची ‘पॉवर बँक’!
खरंतर, स्त्री किंवा पुरुष यांना वयाच्या एका वळणावर जोडीदाराची जास्त गरज लागते. तरीही, सगळं समजून-उमजून सुद्धा लोक आजही पुनर्विवाहाच्या विरोधात जातातच. ‘म्हातारपणात कसली लग्नाची थेरं सुचतात यांना’, असेही बोलून नाकं मुरडतात. मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला जर अशा घटना घडत असतील तर जरा लक्ष ठेवा… शेवटी काय हो आयुष्यात आनंद महत्त्वाचा!


