शोभा भडके
भाग – 7
“अहो मामा, आपली आरू कशी आहे, ते आपल्याला माहीत आहे ना! तिच्यावर विश्वास ठेवा ना… ती म्हणतेय तर नसेल ओळखत ती त्याला… आणि हे फोटो खरंच एडिट केलेले आहेत… नीट बघितलं तर लक्षात येतंय…” पवन मामाला अर्थात भाऊंना समजावत म्हणाला.
“हो, हे आपल्याला माहिती हाय… पण लोकाना कोन सांगणार? आणि कुणाकुणाला सांगणार? हे गाव हाई…. पवन तुम्हाला कळत नाही बदनामी झाली सगळीकडं आपली! काय तोंड दाखवायचं गावाला आता!” आरूची आई रडत रडत म्हणाली.
“अगं वहिनी, असं काय बोलतेस? लोकांचा विचार करायचा का? आपल्या पोरीचं काहीच नाही का?” आत्या त्यांना समजावत होती.
“सरू तुझं किती बी बराबर असलं तरी हे गाव हाय… इथं इतभर गोष्टीचा गावबोभाटा केला जातोय. पोरगी हाय ती, कसं हूनार? लगीन होणार नाही तिचं… तुला लई हौस होती ना तिला शिकवायची… कली बराबर म्हणीत होती पोरीच्या जातीला काय करायचं एव्हढं शिकणं… लगीन करून ज्याच्या त्याच्या घरी गेल्याली बरी…” सखाराम म्हणजेच भाऊ रागारागात बोलत होते.
आत आरू तिच्या भाऊंचं बोलणं ऐकत होती. हे सगळं तिला आईकडून ऐकायची सवय होती, पण भाऊ कधी बोलत नसत… अर्थात, ते तिच्या दादामुळे! पण आज मात्र भाऊ त्याचंही ऐकून घेणार नव्हते… शेवटी प्रश्न त्यांच्या इभ्रतीचा होता!
हेही वाचा – आरूच्या ‘त्या’ फोटोंवरून रणकंदन…
भाऊ रागात बडबडत होते… राम काही बोलणार तोच दारातून कोणीतरी आत आलं. त्या व्यक्तीला पाहून सखाराम शांत झाले आणि त्यांना म्हणाले,
“पाटील, तुम्ही? या ना, बसा…” सखाराम चाचरत म्हणाले; कदाचित त्यांना माहीत होतं की, ते कशासाठी आलेत… त्यांच्या गावचे पाटील तसेच सरपंच आणि गावातील चारदोन माणसं त्यांच्यासोबत आले होते.
रामला त्या सगळ्यांना पाहून खूप राग येत होता… कारण ते सगळे लोक जे काही झालं त्याच्यावर चर्चा करायला आले होते. असंच काहीही झालं तर गावाकडे अशीच बैठक व्हायची! तशी ती गावच्या पंचायतीत व्हायची, पण असा मुलीच्या बाबतीतला नाजूक विषय आणि त्यात इज्जतीचा प्रश्न असेल तर, असे घरी जमायचे लोक. त्याच्यासमोर अशा एकदोन बैठकी झाल्याच होत्या. त्याला हे सगळं नको होतं. त्याच्या बहिणीच्या बाबतीत अशी चर्चा व्हावी त्याची अजिबात इच्छा नव्हती. पण गावातले नियम आणि भाऊंच्या रागापुढे त्याला काहीच सुचत नव्हतं.
आरूची आई आणि आत्या आत निघून गेल्या… रामने उठून त्यांना बसायला चटई हातरली. पवन तिथेच शेजारी खुर्चीवर बसला होता.
“हे बघ सखाराम, जे झालं त्यावर चर्चा करण्यात काही उपयोग नाही आणि राम, तुला तिला शिकवायचं होतं तू ते केलंस पण… असं वयात आलेल्या पोरीला बाहेर पाठवलं तर, असं होणारच! जे झालं ते झालंच, पण अजूनही वेळ गेलेली नाही… चांगलं स्थळ बघून लग्न लावून देऊ पोरीच!” सरपंच म्हणाले.
त्यांचं बोलणं ऐकून रामला खूप राग आला, त्याने हाताच्या मुठी गच्च आवळल्या आणि रागातच म्हणाला… “हे बघा, तुम्ही मोठे आहात, याचा अर्थ असा नाही की, माझ्या बहिणीबद्दल काहीही बोलाल आणि मी ऐकून घेईन.. मला माहिती आहे, तिने काहीही केलेलं नाही आणि तिच्या लग्नाचं टेन्शन तुम्ही नका घेऊ, मी समर्थ आहे.”
“रामsss .. गप्प बसं! काय चुकीचं बोलत नाहीत सरपंच… गावात तोंड दाखवायला जागा नाही राहिली,” भाऊ त्याच्यावर ओरडून म्हणाले.
“…आणि काय म्हणतोस की, तिच्या लग्नासाठी तू समर्थ आहेस? कसं करणार तू? चार गावांत ही बातमी पसरली, तर कोण करणार लग्न तिच्यासोबत? बोल ना, बोल!” पाटील पण आता आवाज चढवून बोलत होते. ती आलेली चार-दोन माणसं पण अशीच चर्चा करत होते… प्रत्येकजण आपलं मत मांडत होता…
आरू आतून हे सगळं ऐकत होती… मन तर करत होतं आत्ता बाहेर जावं आणि त्यांना ओरडून सांगावं की, ‘तुमचा काहीही अधिकार नाही माझ्याबद्दल हे सगळं बोलण्याचा…’ आणि सगळ्यांना हाकलून लावाव घरातून… पण दादाने मनाई केली ना, काही बोलायला! तिला खूप राग येत होता आणि वाईटही वाटत होतं…
पवनला पण राग येत होता… पाटलाचं बोलणं ऐकून तर त्याचा राग शिगेला पोहोचला आणि त्याने ऊठून त्यांच्यासमोर येत बोलायला तोंड उघडलंच होतं की, दारातून एक अनोळखी आवाज आला…
“मी करेन लग्न तिच्याशी!” हे शब्द ऐकून सगळेच दाराकडे पाहू लागले… पवन आणि रामने पण पाहिलं… दारात एक अनोळखी व्यक्ती! पण अतिशय देखणा तरुण उभा होता… सुटाबुटातली ती व्यक्ती कोणी साधीसुधी नाही, याची जाणीव होत होती… त्याला पाहून .त्याच्या शेजारी अजून एक व्यक्ती होती… तोही काही कमी नव्हता दिसायला! पण त्याला पाहून पवनने लगेच ओळखलं…
दारात शिव आणि आकाश उभे होते! पवनने आकाशला पाहिल्याबरोबर ओळखलं कारण पवन ज्या कंपनीमध्ये जॉबला होता, तिथे आकाश त्याचा बॉस होता! शिवने आपल्या गैरहजेरीत आकाशला एक बॉस म्हणून कंपनी लक्ष द्यायला सांगितले होते. शिव ऑफिसमधल्या कुठल्याच एम्प्लॉइजना डायरेक्ट भेटत नसे, सगळं आकाश करायचा… त्यामुळे पवनने शिवला कधीच पाहिलं नव्हतं.
“मी करेन लग्न…” हे वाक्य शिवच्या तोंडून एकून सगळे शॉक होऊन त्याच्याकडे पाहात होते… आकाश पण धक्क्यात होता! त्याला माहीत होतं तो आला होता सियाच्या लग्नाबद्दल बोलायला, पण इथे असा काही सीन असेल, असा त्याने विचारच केला नव्हता! तोही अचंबित होऊन शिवकडे पाहात होता…
हेही वाचा – शिवने दिलेली फाइल पाहून आकाश गोंधळला…
“कोण आपण? आणि हे काय बोलताय?” राम पुढे येत, पण थोडं रागातच म्हणाला. एकतर, आधीच त्या अनोळखी मुलासोबात आरूच्या फोटोवरून महाभारत सुरू आहे आणि आता ही आणखी एक अनोळखी व्यक्ती येऊन सरळ सरळ मी लग्न करतो म्हणत आहे!
रामचं डोकच सटकलं होतं. तितक्यात पवन पुढे आला आणि आकाशला म्हणाला, “स… सर, तुम्ही? म्हणजे…”
“तू ओळखतोस यांना?” रामने पवनला जरबयुक्त आवाजात विचारलं.
“आम्ही आत येऊन बोलू का?” – शिव.
“अं… हो… या की! आत बसा… ए कले पाणी आण गं…”
सखाराम यांनी त्यांचा पेहराव बघूनच मोठे लोक आहेत असा अंदाज बांधला आणि त्यांचे डोळे चमकले… रामने मात्र रागाने त्यांच्याकडे पाहिलं, पण त्यांनी दुर्लक्ष केलं.
शिव आणि आकाश आत आले. पवनने त्या दोघांना बसायला खुर्च्या दिल्या. राम अजूनही धुसफूस करत होता… आणि भाऊ काय आज त्याचं ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
शिवने आत आल्यावर घरावर नजर टाकली. घर तसं छोटसंच होतं… पण, नीटनेटक होतं. हॉल… हॉलला लागून किचन… बाजूला दोन रूम असाव्यात… त्याने येताना बाहेर पाहिलं होतं दारासमोर मोठं अंगण. त्याला समोरून कुंपण घातले होते… वेगवेगळी फुलझाडे होती. एका बाजूला गोठा होता. तिथेच दोन म्हशी, एक गाय… एक शेळी पण होती. घर शेताच्या जवळ असल्याने पिकाने बहरलेलं सगळं शेत लगेच नजरेस पडत होतं… एखादा सालगडी असावा मदतीसाठी कारण एक माणूस शेतात औत मारीत होता… एकूणच राम आणि त्याचे वडील शेतीच करतात, हे दिसून येतं होतं. थोड्यावेळासाठी शिवचं मन पण डळमळीत झाले होते… कशी राहणार आहे सिया इथे! पण त्याने तिच्या डोळ्यात रामसाठी खूप प्रेम बघितलं होतं आणि ती त्याच्यासोबतच खूश राहू शकते, हे त्याला जाणवलं होतं… आणि आपला पैसा कधी कामी येणार? मी तिला सगळ्या सोयी उपलब्ध करून देईन, असा विचार शिवने केला… शेवटी हे जग पैशावर चालतं, असा त्याचा समज!
शिवने बसल्यावर त्या जमलेल्या लोकांवर नजर टाकली… त्याच्या डोळ्यात त्या लोकांबद्दल राग दिसत होता! कारण, त्याने इथे चाललेला सगळा गोंधळ ऐकला होता!
“हे लोक घरचे मेंबर आहेत का?” – शिवने सखाराम आणि राम यांना विचारलं, “घरचे मेंबर तुम्ही पण नाही आहात…” रामने रागातच त्याला सुनावलं.
“पवन तू यांना ओळखतोस का?” – राम.
“हो दादा, हे आमच्या कंपनीचे एमडी सर आकाश महाजन आहेत आणि हे…” ओळख करून देत त्याने आकाशकडे पाहिलं… ‘हे कोण?’ या आविर्भावात…
“मिस्टर राम आपण शांतपणे बोलू शकतो का?” रामकडे पाहत आकाश म्हणाला.
“बोला की साहेब, त्यो काय म्हणणार आहे? तुम्ही बोला! काय म्हणत होते तुमी माझ्या पोरीसोबत लगीन करणार… खरंच का? नाही मंजे, लई मोठे लोक दिसता तुम्ही…” सखाराम म्हणाले.
“तेच ना! एवढे मोठे लोक दिसता तुम्ही तर, इथे येऊन माझ्या बहिणीसोबत लग्न करण्याचं कारण काय? तुमचा काय फायदा?” राम परत उसळून म्हणाला.
एक सुस्कारा सोडत शिव शांतपणे म्हणाला, “मी शिवराज सरपोतदार. पुण्याला आमची स्वतःची कंपनी आहे… आणि बरोबर ओळखलं फायद्याशिवाय मी कुठलीही डील करत नाही… माझा फायदा आहे यात, म्हणून मी तुमच्या बहिणीसोबत लग्न करायला तयार आहे… पण त्या बदल्यात राम तुम्हाला माझ्या बहिणीसोबत लग्न करावं लागेल…” शिव एका दमात रामच्या डोळ्यात डोळे घालून एकदम आत्मविश्वासाने म्हणाला!
शिवचं हे बोलणं ऐकून नक्कीच सगळे शॉक झाले होते! सखाराम हे ऐकून खूश झाले होते, आरूची एवढी बदनामी होऊनही एवढा मोठा माणूस लग्न करायचं म्हणतोय, वरून त्याच्या बहिणीसोबत रामचं लग्न लावायला तयार आहे! त्यांना फक्त एवढंच दिसत होतं. आपल्या मुलांची लग्न होत आहेत… नाही म्हटलं तरी, त्यांच्या दारूच्या व्यसनामुळे त्यांच्या लग्नात विघ्न येत होतं आणि आलंच एखादं स्थळ तर राम काहीतरी कारण सांगून नकार द्यायचा… आणि आता आरूचं हे सगळं प्रकरण! त्यात जर ही अशी संधी स्वतः चालून येत आहे, तर का नाही खुश होणार ते!
पण रामला मात्र भयंकर राग आला होता. त्याने रागाने हाताच्या मुठी आवळून धरल्या होत्या, चेहरा रागाने लालबुंद झाला होता… आत आरू पण हे सगळं बोलणं ऐकत होती. भलेही बाहेरच काही दिसत नव्हतं, पण जे बोलणं सुरू आहे, ते सगळं ऐकू येत होत तिला! तिला तर कळतच नव्हतं, हे सगळं काय चाललंय? कालपर्यंत किती खूश होती ती. तिच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकलं होतं आणि आज सगळंच संपलं होतं आणि आता हे लग्न! लग्न तर होणार, हे तिला माहीत होतं, कारण आता भाऊ, दादाचंही ऐकणार नाहीत, हे तिला माहीत होतं. तिचं स्वप्न डोळ्यातून अश्रूंच्या रूपात वाहून जात होतं…
तिने बघितलं होतं, तिच्या मैत्रीणींना लग्न झाल्यावर सगळं सासरच्या लोकांचं ऐकावं लागत होतं. तिथं आपल्याला काय हवं, याचा कोणीच विचार करीत नाही… आपल्या आई-वडिलांचं पण त्यांच्यासामोर काही चालत नाही…
तिने आता सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या!
क्रमशः


