भाग – 5
तिचं लक्ष आता त्याच्या खांद्यावरून लटकणाऱ्या केळ्याच्या लोंगराकडे गेलं… “इतक्या सकाळी तुम्ही ही केळी आणायला गेला होता?” मग त्याच क्षणी पाठीवर असलेल्या बॅगकडे पाहून विचारलं, “…आणि ही पाठीवर बॅग कसली आहे?”
तिच्या एका पाठोपाठ एक प्रश्नांनी तो थोडा वैतागला. त्याने तिरकस कटाक्ष टाकत तिच्याकडे पाहिलं. कपाळावर सौम्यशी आठी उमटली… शिवा शांतपणे म्हणाला, “नदीवर गेलो होतो, येताना दिसली ही केळी. वाटलं, तुलाही भूक लागली असेल म्हणून घेऊन आलो.” त्याच्या स्वरात एक साधेपणाचं, नि:स्वार्थतेचं सौंदर्य होतं.
तो पाठीवरची ती मोठी बॅग काढत म्हणाला, “ही पखाल आहे. पाणी भरण्यासाठी वापरतात.”
“पखाल!” तिच्या ओठांवर नवा शब्द अलगद टेकला. नकळत तो तिच्या तोंडातून निघाला. तिच्या डोळ्यात कुतूहल होतं, उत्सुकता होती. कधी न पाहिलेली वस्तू जणू एखाद्या नव्या जगात पहिलं पाऊल टाकल्यासारखी भासत होती तिला!
“नदी इथून जवळच आहे का?” ती उत्साहात विचारते. पण त्या उत्साहामागे एक लाजरीशी सावधगिरीही होती. तिचं स्वतःकडे, आपल्या कपड्यांकडे पाहणं… त्याला क्षणात समजून आलं. ती काही विचारायला घाबरत होती… एक प्रकारची असुरक्षिततेची जाणीव. पण तो समजूतदार होता. क्षणाचाही विलंब न करता तो म्हणाला,
“चल, निघूया लगेच! आता सूर्य वर यायला लागलाय, उजेड भरपूर आहे.”
कदाचित, तो आत्ताच जंगलातून, नदीच्या वाटेवरून थकलेला परत आला असावा. पण तिच्या त्या एका साध्या इच्छेपुढे तो पुन्हा तयार झाला… काही न बोलता, न तक्रार करता! त्या निःशब्द समजूतदारपणामुळे आराध्याच्या मनात एक नवा आदर निर्माण झाला. एवढ्या विशाल जगात एक माणूस माझ्या छोट्याशा गरजेसाठी निःस्वार्थपणे उभा राहतो, हे तिला थोडंसं अविश्वसनीयच वाटत होतं.
ती त्याच्याबरोबर निघाली… आणि पावसाने झाडांना धुऊन टाकल्यासारख्या त्या जंगलाच्या वाटांवर आता एक नव्या सुरुवातीची चाहूल दिसू लागली होती. कोवळं ऊन सळसळत्या पानांतून खाली उतरत होतं, अगदी जणू सोन्याच्या लहरींनी ती छोटी झाडांनी भरलेली वाट सजली होती… आराध्या आणि शिवा त्या निसर्गरम्य वाटेने हळूहळू चालत होते. प्रत्येक पावलागणिक पक्षांच्या किलबिलाटाने वातावरण मधुर होत चाललं होतं.
काही अंतरावर एका उघड्या जागी पोहोचताच, त्या हिरव्या पानांनी वेढलेल्या वाटेच्या टोकाला एक नितळ नदी त्यांच्या दृष्टीस पडली. ती वाहणारी नदी काहीशी शांत होती, पण तिच्या पाण्याचा हळूवार खळखळाट एखाद्या गाण्यासारखा वाटत होता. वाऱ्याच्या झुळुकीने झाडं सळसळू लागली, जणू त्या संगीतात आपलंसं काही मिसळत होती.
हवा एकदम अलगद मोहरलेली आणि आत्म्याला स्पर्श करणारी होती… काहीतरी इतकं शुद्ध, जे शहराच्या गोंगाटात हरवून गेलेलं असतं… त्या क्षणाला एक निराळीच मुक्तता तिला जाणवू लागली, जणू तिने स्वतःच्या आतल्या गोंधळातून बाहेर पडत निसर्गाच्या कुशीत प्रवेश केला.
शिवा नदीच्या काठावर असलेल्या एका मोठ्या दगडावर जाऊन निवांत बसला. त्याने आराध्याला काही सूचना दिल्या…
ती मात्र डोळ्यांनी आजूबाजूचं निरीक्षण करत, त्या सौंदर्यात अगदी विरघळून गेली होती. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानी, शांत भाव उमटला होता — जणू हा निसर्ग त्याचाच भाग होता… आणि तो निसर्गाचा! आराध्या हळूहळू त्या नितळ, पारदर्शक पाण्यात उतरू लागली. तिचे पाय जिथे टेकले तिथे नदीच्या पाण्यात सौम्य लहरी उठल्या — जणू निसर्गानेच तिच्या आगमनाचं स्वागत केलं होतं…
थंडगार पाण्याचा स्पर्श तिच्या त्वचेवर झणझणीत नव्हे, तर एक आल्हाददायक भाव निर्माण करणारा होता. तिने दोन्ही हातांनी पाणी उचलून चेहऱ्यावर शिंपडलं आणि त्या पाण्याच्या थेंबांनी तिचा थकवा एकदम निघून गेला. तिने आपले लांब, मोकळे केस पाठीवर पसरले आणि सावकाश पाण्यात डुंबायला सुरुवात केली. पाण्याखाली डोकं घालून तिने डुबक्या मारल्या, ओंजळीत पाणी भरून वर उडवताना तिच्या हसण्यातून, खेळण्यातून एक मुक्तपणाचा लाघवी भाव व्यक्त होत होता… जणू ती निसर्गाशी एकरूप झाली होती. तिच्या त्या निरागस, खेळकर हालचाली, डोळ्यांतून ओसंडून वाहणारा आनंद… हे सारं पाहून शिवा अगदी स्तब्ध झाला.
त्या झुळझूळ वाहणाऱ्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर तिचं सौंदर्य जणू अधिकच खुलून आलं होतं. तिच्या चेहऱ्यावरून ओघळणारे थेंब, भिजलेले केस आणि डोळ्यांतून झळकणारा साक्षात आनंद पाहून त्याच्या मनात एक वेगळाच भाव उमटला….
त्याच्या चेहऱ्यावर नकळत एक हलकंसं हास्य उमटलं — ते आराध्याला आकर्षित करण्यासाठी नव्हतं, तर तिच्या त्या आनंददायी क्षणांमध्ये स्वतःला हरवून टाकण्यासाठी होतं! तो फक्त पाहात राहिला… कारण त्या क्षणाला शब्दांची गरज नव्हती, नजरेतूनच संवाद घडत होता.
तिच्या हातांनी उडवले गेलेले तुषार जणू पाण्याच्या निळसर कॅनव्हासवर एखाद्या चित्रकाराने ब्रशने उमटवलेल्या नाजूक, नाजूक रेषा होत्या… स्पर्श करताच पाण्यावर लहरींच्या नाजूक नक्षी उभ्या राहत होत्या… त्यामध्ये आनंदाची, मुक्ततेची आणि एक निरागसतेची झाक होती.
दूर, शांतपणे पाण्यावर तरंगणारे पांढरे बगळे जणू त्या सौंदर्याचे साक्षीदार होतं. त्यांच्या मागे शांतपणे वाऱ्यावर डुलणारी कमळं त्या क्षणात आणखीच गहिरे रंग भरत होती… जणू संपूर्ण निसर्ग तिला आशीर्वाद देत होता… “स्वत:ला पुन्हा शोध!”
शिवा त्या सौंदर्याकडे एकटक पाहात होता… तिच्या चेहऱ्यावरील हास्य, तिचा खेळकरपणा आणि त्या क्षणांमध्ये हरवलेली ती… त्याला सर्व काही भारावून टाकत होतं. पण ज्या क्षणी तिने अंगावरचा भिजलेला शर्ट काढून बाजूला ठेवला आणि तोच शर्ट हळूहळू धुवायला घेतला, त्या क्षणी शिवा गडबडला…
त्याचं मन क्षणभर सैरभैर झालं. तिच्या सौंदर्याचा तो साक्षीदार होता, पण आता त्या निरागसतेच्या सीमारेषेवर उभं राहिल्यासारखं वाटलं त्याला आणि मग त्याने तिला पाहणं थांबवलं… त्याने तिच्याकडे पाठ फिरवली.
हेही वाचा – शीख युवकाने पगडी उतरवली… अज्ञात व्यक्ती शांतच होती!
हवा हलकेच वाहत होती, सूर्यप्रकाश झाडांमधून उतरून पाण्यावर खेळत होता आणि त्या पाण्याच्या तुषारांमध्ये एक निष्पाप सौंदर्य मुक्तपणे न्हायलं होतं! शिवाच्या आसपास आणि मनाच्या आत खोलवर उमटत होता, एक अव्यक्त, पण पवित्र भाव!
शिवा मागे वळला तर, समोर आराध्या गालावरच्या मोहक खळीने हासत उभी होती. तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती… जणू तिच्या मनातले सगळे अंधार त्या निसर्गाच्या सान्निध्यात क्षणभर तरी हरवले होते. धुतलेला शर्ट तिने अंगावर चढवला होता आणि खांद्यावरील केसांमधून पाणी ठिबकत होते…
“निघायचं?” तिनं विचारलं. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि खरा आनंद शिवाच्या काळजाला भिडला. त्याने केवळ मानेने होकार दिला आणि दोघे पुन्हा झाडाझुडपांतून त्या अरूंद वाटेने चालू लागले.
रस्त्यात ती अधेमधे थांबत, कधी झाडाच्या फांदीवरून पान तोडत, तर कधी जमिनीवर उमललेली एखादी फुलं बघत होती. मधेच ती स्वतःभोवती गिरक्या घेत होती… तिचा तो निष्पापपणा, तो उत्साह शिवाला मोहवत होता… आणि कधी ती चक्क पुढे पळत जायची अन् मग मागे वळून त्याच्याकडे पाहत एक लाघवी हास्य फेकायची…
“किती सुंदर आहे ना इथलं सगळं…! हे जंगल, ही शांतता… मला वाटतं, खराखुरा आनंद इथेच मिळतो.” ती चालता चालता बोलत होती आणि शिवा तिच्या प्रत्येक शब्दाने जणू अधिकाधिक खोल गुंतत चालला होता.
पण त्याच्या मनात एक विचार वारंवार डोकावून जात होता, “इतकी निरागस, इतकी प्रेमळ मुलगी… तरीही घर सोडून आलीय? का?”
तिला थेट विचारावं का… की अजून थोडा वेळ घ्यावा… या द्विधा मन:स्थितीत तो चालत राहिला. तेवढ्यात त्यांचं आश्रयाचं ठिकाण समोर आलं. गुहेजवळ पोहोचताच दोघांनी एकमेकांकडे नजर टाकली, तिच्या डोळ्यांत अजूनही पाण्यात डुंबण्याच्या आनंदाच्या लहरी दिसत होत्या आणि तिच्या मनात खोल डोकावण्याची त्याची इच्छा…
शिवाच्या मनात एक नक्की होतं, हिच्या गोष्टीचं गूढ उलगडणं! हे नुसतं औत्सुक्य नव्हे, तर आता आपली जबाबदारी आहे.
भूक लागल्यामुळे त्याने केळी तिला दिली. पाण्यात खेळून झाल्यामुळे तिलाही भूक लागलीच होती… आराध्या शांत बसून केळी खाऊ लागली. नदीतल्या आंघोळीमुळे तिच्या चेहऱ्यावर आलेला टवटवीतपणा आणि केळीच्या गोडसर चवेमुळे ओठांवर उमटलेलं समाधान… शिवा तिच्याकडे पाहात होता, पण मनातली घालमेल आता शब्दांमध्ये उतरू लागली…
“आराध्या…” त्याचा स्वर थोडा जपून, पण थेट होता.
“तू घर सोडून इथे आलीस, ते पण एकटीने… इतक्या घनदाट जंगलात… तुला खरंच अजिबात भीती वाटली नाही?”
आराध्या एक क्षण त्याच्याकडे बघत थांबली. शिवाचं तळमळीचं बोलणं आणि डोळ्यांतला काळजीचा भाव तिला जाणवला.
शिवा पुढे बोलत राहिला, “तुझ्या घरचे तुझी चिंता करत असतील ना? तुला शोधत असतील… तुझ्या आई-बाबांनी कधी वाटलं नसेल की, त्यांची मुलगी अशी अचानक गायब होईल. आराध्या, तुला खरंच काही फरक पडत नाही का?”
हेही वाचा – आपलं नाव सांगताना शिवा का गडबडला?
शिवाचे प्रश्न, त्याची भावना आता आराध्याच्या हृदयाच्या खोल कप्प्यात पोहोचू लागल्या. तिच्या हातातली केळी थोडीशी सुटली, आणि ती जमिनीवर नजर लावून बसली. ओठ थरथरत होते… डोळे पाणावले…
शिवा शांत झाला. त्याला जाणवलं की, त्याच्या बोलण्याने तिच्या मनात खोलवर काहीतरी खळबळ झाली आहे. दोघेही शांत होते… नीरव शांतता होती, फक्त आजूबाजूचा निसर्ग आणि मनातल्या उसळणाऱ्या भावना…
आराध्याने अलगद श्वास घेतला आणि नजर न उचलता फक्त एवढंच पुटपुटली — “शिवा, काही वेळ शांत बसू शकतोस का… मी सांगेन… पण थोडा वेळ लागेल…”
शिवाने फक्त मान हलवून होकार दिला.
आता त्या गुहेबाहेर, त्या शांत निसर्गात, एक हळवं… पण थरारक सत्य उलगडण्याच्या उंबरठ्यावर होतं…
काय असेल ते सत्य?
क्रमश:


