Sunday, March 1, 2026

banner 468x60

Homeफिल्मीNostalgia : निगाहें मिलाने को जी चाहता हैं…

Nostalgia : निगाहें मिलाने को जी चाहता हैं…

सध्या चर्चा आहे ती, रणबीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त अभिनीत ‘धुरंधर’ चित्रपटाची! अगदी कंदहार विमान अपहरण ते मुंबईवरील 26/11चा दहशतवादी हल्ला या सर्वांचा पाकिस्तानशी असलेला संबंध दाखवला आहे. या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे, पूर्वीच्या एव्हरग्रीन गाण्यांची आठवण हा चित्रपट करून देतो. ‘ना तो कारवाँ की तलाश हैं…’ या ओळीचा अतिशय चपखलपणे वापर केला आहे. वास्तवात जवळपास 65 वर्षांपूर्वी झळकलेल्या भारत भूषण आणि मधुबाला अभिनीत ‘बरसात की रात’ (1960) या चित्रपटातील ही कव्वाली आहे. ही कव्वाली तुफान गाजली… तिची जादू आजही कायम आहे. संगीतकार रोशन यांनी या चित्रपटातील कव्वाली संगीतबद्ध केल्या होत्या.

त्यानंतर आलेल्या ‘दिल ही तो हैं’ या सिनेमाच्या निर्मात्याने आपल्या सिनेमात रोशन यांनी अशीच कव्वाली संगीतबद्ध करावी, असा आग्रह धरला होता आणि त्यातूनच मग ‘निगाहें मिलाने को जी चाहता हैं…’ ही नितांत सुंदर, थोडी ठसकेबाज, नखरेवाली, अल्लडशी अशी कव्वाली तयार झाली. संगीतकार रोशन यांनी संगीतबद्ध केलेली, साहिर लुधियानवी लिखित आणि आशा भोसले यांनी गायलेली  ही कव्वाली म्हणजे कव्वालीचा माइल स्टोन ठरेल इतकी जबरदस्त आहे. ती नूतन या गुणी अभिनेत्रीवर चित्रित केलेली आहे. वास्तविक, पाहता नूतन कव्वाली किंवा मुजरा अशा गाण्यांकरिता तरबेज नव्हती, तरीपण तिने आपल्या मोहक आणि सुंदर चेहऱ्यावरील हावभावाने या कव्वालीला योग्य न्याय दिला आहे. ‘दिल ही तो हैं’ या सिनेमात रोशन यांनी ही कव्वाली आशा भोसलेंकडून अशी काही जबरदस्त गाऊन घेतली की, बस्स! असं ऐकिवात आहे की, प्रत्यक्ष लतादिदींना आशाताईंनी गायलेली ही कव्वाली खूप आवडायची.

याच सिनेमातील मन्ना डे यांनी गायलेली ‘लागा चुनरी में दाग…’ ही कव्वाली देखील खूप गाजली. आजच्या काळातील गायकांना देखील एकदा तरी ही कव्वाली गाण्याचा मोह होतो. फिल्मी कव्वाल्या प्रशंसनीय आणि लोकप्रिय करण्यात संगीतकार रोशन यांचे खूप मोठे योगदान आहे. रोशन यांच्या आधी पण हिंदी सिनेमांमध्ये कव्वाली होत्या, परंतु त्यामध्ये फिल्मी अंदाज रोशन यांनी आणला आणि त्यांनी वर्षानुवर्षे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आजही संगीतकार रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या कव्वाल्या लोक तितक्याच तन्मयतेने ऐकतात. रोशन यांच्या फिल्मी कव्वालींमधील सुरेल संगीताच्या जादूने दुनिया भारावून गेली आहे. लोकांच्या मनातून त्या जादूई संगीताचा नशा आजही उतरत नाहीत.

हेही वाचा – गोष्ट एका ‘व्हेज अंडाकरी’ची!

त्या काळात साहिर लुधियानवी या गुणी गीतकाराने खूप अजरामर गाणी लिहून भारतीय सिनेसंगीताला बहर आणला. साहिरसारख्या मनस्वी कवीला संगीतकारही तसेच तोडीस तोड मिळाले आणि तसेच दिग्गज गायक आणि गायिकाही! साहिर लुधियानवीचे बोल, संगीतकार रोशन यांचे संगीत आणि गानसम्राज्ञी आशा भोसले या त्रिकुटाने ‘निगाहें मिलाने को जी चाहता है…’ या कव्वालीला चार चांद लावून ही कव्वाली पार उंचीवर नेऊन ठेवली.

ही कव्वाली मूळ यमन रागावर आधारित आहे. यात सुरुवातीचा जो आलाप आहे, त्यातील पहिल्या ओळीतील स्वर काहीसे राग शंकराशी साधर्म्य साधतात खरे, परंतु नंतरच्या यमन रागातील स्वर्गीय सुरांनी ही कव्वाली पूर्णपणे काबीज केली. त्यातही आशा भोसले यांनी या कव्वालीची सुरुवात करतानाच ‘महफिल में कहे या ना कहे…’ हे गीताचे बोल काही जबरदस्त खटके आणि हलक्या हरकती घेऊन असे काही गायले आहेत की, ही कव्वाली प्रेक्षकांची मने जिंकुन घेते. त्या सुरुवातीच्या बोलांनीच नायिकेच्या मनातील संभ्रमीत भाव प्रगट होतात. इतकी सुंदर सुरुवात करुन शेवटापर्यंत आशाताईंनी आपल्या दिव्य स्वरांचा जो समा बांधला आहे, त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.

साहिर लुधियानवींच्या गीतांबद्दल काय बोलावे? आपल्या कवितांमधून, गीतांमधून, मनाला भुरळ पाडणाऱ्या शब्दांमधून लोकांच्या हृदयापर्यंत तरल प्रेमभाव पोहोचवण्यात या पठ्ठ्याचा हातखंडा! शायर असावा तर साहिर सारख ! ‘निगाहें मिलानें को…’ या कव्वालीतील एकेक शब्द कान देऊन नीट ऐकला की नवयौवनांच्या मनातील भावनांचे संमिश्रण कसे असू शकेल हे समजते. या कव्वालीची जादू अशी काही पसरली आहे की, आजही ती ऐकताना त्यामध्ये इतके हरवून जातो की, ती संपली तरी आपण बेधुंद असतो… शेवटच्या कडव्यातील,

जब कभी मैंने तेरा चाँद सा चेहरा देखा

ईद हो या कि न हो, मेरे लिए ईद हुई…

या ओळींनंतर आशाताईंनी जी सरगम घेतली आहे, ती अफलातून आहे. तो या कव्वालीच्या उच्च पातळीवरील स्वर्गीय सुरांचा परमोच्च बिंदू आहे. सुरुवातीच्या आलापापासून ही कव्वाली आपल्या मनाची पकड घेत शेवटी द्रुतलयीत येते, तेव्हा आपण त्यामध्ये इतके तल्लीन होऊन गेलेलो असतो की, शेवटची सरगम गायल्यानंतर जेव्हा आशाताई परत एकदा संथ लयीमधे येत याचा कधी शेवट करतात, ते समजतच नाही… असे भान हरपायला फक्त हीच कव्वाली भाग पाडते, असे माझे मत आहे. आशाताईंनी आपल्या सुरेल सुरांनी ही कव्वाली गाऊन भारतीय शास्त्रीय संगीत काय असते, ते सहजपणे उलगडून दाखवले आहे. ही कव्वाली म्हणजे एक रसरशीत सांगितिक अनुभव आहे!

हेही वाचा – सर्दीयों में हूं मसीहा, तो बारिशों में गालिब-ए-शेर हूं मैं…

या कव्वालीने स्वतःचे एक विशिष्ट अढळ स्थान भारतीय सिनेजगतामध्ये निर्माण करून ठेवले आहे आणि याचे श्रेय निश्चितच आशाताईंना द्यायला हवे. संगीतकार रोशन, गीतकार साहिर लुधियानवी आणि गायिका आशा भोसले या तिघांनाही मानाचा मुजरा!

माधवी जोशी माहुलकर
माधवी जोशी माहुलकर
एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!