खरं म्हणजे, कितीतरी दिवसांपासून सखूबाईंना भेटायला जाईन जाईन म्हणून ठरवलं होतं, पण योग काही जुळून आलाच नाही. काल रात्री माईचा फोन आला त्या गेल्याचा आणि रात्रभर झोपूच नाही शकलो मी. ड्रायव्हरला फोन करून पहाटे लवकर यायला सांगितले. माझ्या भावंडांना म्हणजे, मधू आणि सुवर्णाचा फोन करून ही दुःखद बातमी कळवली. मधू माझ्यासोबत कोकणात यायला तयार झाला. सुवर्णाला मात्र निघता येणार नव्हते. पहाटे 4:30 वाजता आमचा प्रवास सुरू झाला आणि मन बालपणात जाऊन बसलं.
मधू, मी आणि सुवर्णा… अण्णा आणि माईची आम्ही तीन मुलं. आमच्या जन्मानंतर तेलमालिश आणि शेक द्यायचं काम सखूबाईंनी केलेलं. या कामाव्यतिरिक्त माईच्या हाताखाली मदतीला कायम असायच्या सखूबाई. त्यांनी आजीच्या मायेने आम्हाला वाढवलं होतं. अशिक्षित सखूबाई मात्र आम्ही शिकून मोठं होऊन घराण्याचं नाव काढण्याचं स्वप्न बघायच्या.
हेही वाचा – सागरगोटे… आयुष्यातील चढ-उताराचे अन् सुख-दुःखाचे!
बघावं तेव्हा कामात व्यग्र असणारी सखूबाई विश्रांती कधी घेत असेल? हा प्रश्न लहानपणी खूपदा सतावायचा. पण, “तुम्ही माझी आंब्याची कलमं आहात. तुमच्या तिघांचं सगळं करताना वेगळीच ताकद मिळते,” असं सांगत त्या आमची समजूत काढायच्या. खरंच, निरपेक्ष प्रेम म्हणजे काय ते आम्हाला सखूबाईंनी शिकवले. तिच्या अवतीभवती आमचं बालपण बागडलं…
शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि मोठा मधू अन् मी पुढील शिक्षणासाठी मुंबईला जायला निघालो, तेव्हा डोळ्यांत टिपं गाळणारी… गावातील गणपतीला आमच्या खुशालीसाठी नवस बोलणारी… आणि मोठी बहीण या नात्याने माईला मानसिक आधार देणारी सखूबाई खरंच कोण होती आमची? पण परमेश्वराने अशा काही गाठी स्वर्गातच मारलेल्या असतात की, त्या सुटता सुटत नाहीत. सखूबाई नावाची एक निरगाठ आमच्या आयुष्याशी अशीच बांधली गेली होती.
आमची शिक्षणं संपवून आम्ही मुंबईला राहायचं ठरवलं. मे महिन्यात आणि गणपतीला जमेल तसं आम्ही कोकणात जायचो. आमच्या येण्याची वाट पहात बसायची ती! घरी पोहोचलो की, मीठ मोहरीने आमची दृष्ट काढायचा मान सखूबाईंचा होता. आम्ही आमच्या क्षेत्रात कितीही उच्चपदावर कार्यरत असलो तरी सखूबाईंच्या लेखी आम्ही आंब्याची कलमंच राहिलो. तिने आमच्या डोक्यावरून मायेने फिरवलेला हात नाही विसरू शकत आम्ही कोणीच… तिच्या स्पर्शात विलक्षण जादू होती काहीतरी. गावाकडून प्रत्येक वेळी निघताना माजघराच्या कोपऱ्यात डोळे टिपणारी सखूबाई आजही आठवते.
अधूनमधून माईच्या तोंडून तिच्या तब्येतीच्या कुरबुरी कानांवर येत होत्या. एक-दोनदा तिच्या ओढीने मी कोकणात जाऊन देखील आलो होतो. गेल्या महिन्यात मात्र माईचा आवाज कापरा झाल्याचा भास झाला मला… सखूबाईंची चौकशी करताना! आणि त्यामुळे नकळत काळजात धडकी भरली होती. मीटिंग्ज, प्रोजेक्ट्स, कॉन्फरन्स, डेडलाइन्स यामध्ये मी इतका बुडालो होतो की, नंतर कित्येकदा ठरवून देखील मला कोकणात जायची संधी मिळाली नाही.
हेही वाचा – बॅक स्टेज… हाच योग्य निर्णय!
…आणि काल रात्री ती दुःखद बातमी कळली. घरी सगळे आमच्या येण्याचीच वाट बघत होते. जड अंतःकरणाने आम्ही सखूबाईंना निरोप दिला.
रात्री चार घास खाऊन झाल्यावर माई म्हणाली आम्हा दोघांना, “दोन दिवसांपासून तुमची तिला सारखी आठवण येत होती. तसं तिने बोलूनही दाखवलं मला. म्हणाली आंब्याची कलमं छान वाढली, मोठी झाली. इतरांना मायेची सावली देतात, हे बघून खूप बरं वाटतं. त्यांना म्हणावं, मी जसं तुम्हाला मायेनं वाढवलं तसंच तुम्ही तुमच्या लेकरांना वाढवा. झाड उंच झालं की, त्याला मोकळा श्वास घेऊ दे आणि त्याच्या मार्गानं जाऊ दे. चांगल्या शिकवणीचे आणि संस्कारांचे खतपाणी मात्र न चुकता घाला. शेवटी, जो तो आपला रस्ता घेऊन आलेला असतो देवाकडून येताना… त्याला अडवायचं नाही. तरच, त्यांच्या सोबतची आणि आधाराची गोड फळं तुम्हाला चाखायला मिळतील. तुमच्या उतार वयात जेव्हा तुमच्या आयुष्याची पाळंमुळं भुसभुशीत झालेली असतील.”
जाता जाता सुद्धा जेमतेम चार इयत्ता शिकलेल्या सखूबाईंनी सुखाने जगण्याचं गुपित सांगून टाकले आणि ते ऐकून ओक्साबोक्शी रडणाऱ्या आम्हा दोघांना माईंने तिच्या कुशीत घेतले.
अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, सागरगोटे, मायाळू सखूबाई, सखूबाईंचे वात्सल्य, प्रेमळ सखूबाई, सखूबाईंचे तत्वज्ञान, सूखबाईंचे निधन


