Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari :  तेथ मनाचें मेहुडें विरे, पवनाचें पवनपण सरे...

Dnyaneshwari :  तेथ मनाचें मेहुडें विरे, पवनाचें पवनपण सरे…

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.

अध्याय सहावा

जाणिजे योगपीठीचा भैरवु । काय हा आरंभरंभेचा गौरवु । कीं वैराग्यसिद्धीचा अनुभवु । रूपा आला ॥462॥ हा संसार उमाणितें माप । कां अष्टांगसामग्रीचे दीप । जैसे परिमळेंचि धरिजे रूप । चंदनाचें ॥463॥ तैसा संतोषाचा काय घडिला । कीं सिद्धभांडारींहूनि काढिला । दिसे तेणें मानें रूढला । साधकदशे ॥464॥

प्रयत्नाद् यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः । अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥45॥

जे वर्षशतांचिया कोडी । जन्मसहस्त्रांचिया आडी । लंघितां पातला थडी । आत्मसिद्धीची ॥465॥ म्हणोनि साधनजात आघवें । अनुसरे तया स्वभावें । मग आयतिये बैसे राणिवे । विवेकाचिये ॥466॥ पाठीं विचारितया वेगा । तो विवेकुही ठाके मागां । मग अविचारणीय तें आंगा । घडोनि जाय ॥467॥ तेथ मनाचें मेहुडें विरे । पवनाचें पवनपण सरे । आपणपां आपण मुरे । आकाशही ॥468॥ प्रणवाचा माथा बुडे । येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे । म्हणोनि आधींचि बोलु बहुडे । तयालागीं ॥469॥ ऐसी ब्रह्माची स्थिती । जे सकळां गतींसी गती । तया अमूर्ताची मूर्ती । होऊनि ठाके ॥470॥ तेणें बहुतीं जन्मी मागिलीं । विक्षेपांची पाणिवळें झाडिलीं । म्हणोनि उपजतखेंवो बुडाली । लग्नघटिका ॥471॥ आणि तद्रूपतेसीं लग्न । लागोनि ठेलें अभिन्न । जैसे लोपलें अभ्र गगन । होऊनि ठाके ॥472॥ तैसें विश्व जेथ होये । मागौतें जेथ लया जाये । तें विद्यमानेंचि देहें । जाहला तो गा ॥473॥

हेही वाचा – Dnyaneshwari : जे सिद्धांताचां सिंहासनीं, राज्य करिती त्रिभुवनीं…

अर्थ

हा योगभ्रष्ट पुरुष योगरूपी आसनावरील जणू काय भैरवदेवच अथवा योगारंभरूपी केळीची शोभाच किंवा जणू काय वैराग्याच्या पूर्णतेचा मूर्तिमंत अनुभवच आकाराला आलेला आहे! ॥462॥ हा पुरुष म्हणजे संसार मोजण्याचे मापच किंवा अष्टांग योगाची सामग्री दाखवणारा जणू दिवाच होय! ज्याप्रमाणे सुवासाने चंदनाचे रूप धरावे, ॥463॥ त्याप्रमाणे हा पुरुष जसा काही संतोषाचाच बनवलेला अथवा सिद्धांच्या समुदायातून काढलेला असावा, इतक्या योग्यतेचा साधकदशेतच तयार झालेला दिसतो. ॥464॥

आणि नंतर योगमार्गाचे प्रयत्नपूर्वक आचरण करणारा तो योगी पापापासून शुद्ध होऊन अनेक जन्मांनी योगसिद्धी मिळवितो, नंतर अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला म्हणजे मोक्षाला जातो. ॥45॥

कारण की, कोट्यवधी शतवर्षात हजारो जन्मांचे प्रतिबंध उल्लंघन करून तो आत्मसिद्धीच्या किनार्‍याला येऊन पोहोचला. ॥465॥ म्हणून जेवढी साधने आहेत, तेवढी सर्व साधने आपोआप त्याच्यामागे येतात. नंतर तो आयताच विवेकाच्या राज्यावर बसतो. ॥466॥ नंतर विचाराच्या वेगामुळे तो विवेकही मागे रहातो आणि मग विचारांच्या पलीकडचे जे स्वरूप ते तो स्वत: बनतो. ॥467॥ त्या ठिकाणी मनरूपी मेघ नाहीसा होतो आणि वार्‍याचा चंचलपणा संपतो आणि त्याचप्रमाणे आकाशदेखील आपण आपल्यातच मुरते. ॥468॥ तो ॐकाराच्या अर्धमात्रेत लीन व्हावा, इतके त्याला शब्दातीत सुख मिळते. म्हणून त्याच्याविषयी शब्द अगोदरच परत फिरतो. ॥469॥ अशी जी ब्रह्माची स्थिती, जी सगळ्या गतींची गती आहे, त्या निराकार ब्रह्मस्थितीची हा मूर्ती होऊन राहतो. ॥470॥ त्याने मागील अनेक जन्मात विक्षेपरूपी केरकचरा काढून टाकला म्हणून या जन्मी उपजताक्षणीच लग्नघटका बुडाली. (त्याचा कर्मक्षय होऊन ब्रह्माशी ऐक्य होण्याची वेळ प्राप्त झाली). ॥471॥ आणि ज्याप्रमाणे ढग नाहीसा झाला म्हणजे तो आकाशाशी एकरूप होतो, त्याप्रमाणे ब्रह्मरूपाशी त्याचे अभिन्नतेने लग्न लागते. ॥472॥ ज्याप्रमाणे अर्जुना, ज्या स्वरूपापासून विश्व उत्पन्न होते आणि फिरून ज्या स्वरुपी ते विश्व लीन होते, ते स्वरूप तो याच देहाने होतो. ॥473॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari :  ऐसें जें जन्म, जयालागीं देव सकाम…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!