भाग – 4
त्या अज्ञात व्यक्तीने मग एकदा तिच्याकडे नजर टाकली, एक गूढ शांतता तिच्या चेहऱ्यावर पाहिली… आणि मग सावधपणे गुहेच्या झडपेकडे वळला. त्याने ती झडप नीट बंद केली, बाहेरच्या कोणत्याही आवाजांच्या कर्कशपणाचा थेट आत प्रवेश होऊ नये याची खात्री करून घेतली. गुहेच्या आत एक गूढ आणि सुरक्षित रात्र उतरू लागली होती… आणि त्या दोघांच्या अनोख्या भेटीची पहिली रात्र होती ती…
मध्यरात्रीच्या त्या भयगर्भ शांततेत गुहेबाहेरून येणाऱ्या श्वापदांच्या घरघराटांनी, गुरगुराटांनी आणि अधूनमधून येणाऱ्या सादांनी ‘आराध्या’ची झोप चक्क मोडली. झोपेतून जागी होताच क्षणभर तिला आपण कुठे आहोत, हेच लक्षात आलं नाही. भोवती अंधाराचा भस्मासूर… नीरव शांतता आणि त्यामध्ये धडधडतं मन…
पण जेव्हा तिची जाणीव पुन्हा स्थिरावली, तेव्हा लक्षात आलं… आपण जंगलात, एका गुहेत आहोत… आणि त्या विचाराने तिचं धाबंच दणाणलं! क्षणभर वाटलं, आपण एकटे आहोत का? तो माणूस… ती व्यक्ती कुठे आहे?
भीतीने ओलसर गुहेत, हातानं चाचपडत तिनं त्याला शोधायला सुरुवात केली आणि मग त्या थरथरत्या बोटांना जेव्हा एक गरम, स्थिर हात लागला… तेव्हा तिनं जणू सुटकेचा निश्वास सोडला… तो तिथेच होता… शांत, सावध आणि तिच्या भीतीला ओळखून तयार!
“शूSSS अजिबात घाबरू नकोस,” तो हलक्या पण ठाम स्वरात म्हणाला, “कोणीही इथे येणार नाही. शांत हो आणि ऐक ते आवाज… तुमच्या शहरांत ऐकू येतात का असे?”
त्याच्या शब्दांत एक हळूवार शांतता होती. जणू त्यानं तिच्या मनातील वादळाला मिठीत घेतलं होतं. त्याच्या त्या धीरगंभीर आवाजाने तिच्या मनाची धडधड थोडी निवळली. ती गप्प झाली… आणि कान दिले त्या आवाजांकडे… बाहेरून येणारे ते आवाज आता तिला घाबरवणारे वाटत नव्हते… जणू ही जंगली जिवांची स्वतःची भाषा आहे, असं वाटत होतं. प्रत्येक आवाज, प्रत्येक डरकाळी, गुरगुर, चिवचिव म्हणजे जणू — “मी इथे आहे, तू कुठे आहेस?”, “मी जागा आहे”, “रात्र सुरक्षित आहे”… असा एक संवाद… एक निसर्गनिर्मित सूर!
“खरंच, शहरांमध्ये काय ऐकू येतं?” ती मनात बोलत होती, “गाड्यांचे हॉर्न, डीजेच्या कानठळ्या, गोंगाट… पण सगळं कृत्रिम! इथे मात्र ही शांतता… हे जंगल, ही साद… किती खरं वाटतं.”
त्या विचारांमध्ये ती पुन्हा शांत झाली… हळूहळू तिच्या श्वासाची गती निवळली… डोळ्यांवर झोपेची झूल उतरू लागली… आणि अखेर ती पुन्हा त्या गुहेतील निसर्गाच्या कुशीत शांत झोपली.
तो तिच्याकडे एक क्षण पाहात राहिला. त्या मुलीच्या मनातला वादळ हळूहळू निवळत होतं — आणि जंगलाची भाषा आणि तिच्या अंतरात्मा यांच्यात एक नवा संवाद सुरू झाला होता.
कानावर पक्ष्यांच्या किलबिलाट ऐकू येऊ लागला… मऊसूत सकाळची झुळूक गुहेच्या आत येत होती आणि तिच्या केसांशी खेळत होती. त्या नाजूक स्पर्शांनी आणि आवाजांनी तिची झोप चाळवली गेली. कित्येक दिवसांनी, कित्येक भयगंडाच्या रात्रींनंतर ती इतकी गाढ झोपली होती… जणू निसर्गानेच तिच्या थकलेल्या मनावर फुंकर घातली होती!
डोळे उघडले… तिनं आळसाच्या भारात आजूबाजूला नजर फिरवली…
“तो कुठे गेला?” या विचारानं ती थोडी घाबरली, पण लगेच लक्षात आलं — गुहेवरची झडप उघडी आहे. गुहेबाहेरून आत येणारे कोवळे किरण, झाडांच्या फांद्या-फांद्यांतून वाकत गुहेच्या भिंतीवर प्रकाशचित्रांसारखे पडले होते… त्या प्रकाशात धुळीचे कणही नाजूक सोनसळी वलयात नाचत होते.
एक क्षण ती तशीच त्या दृश्यात हरवून गेली. पण मग नकळत ताडकन उठली आणि बाहेर पडली. गुहेबाहेर पाऊल ठेवलं… आणि तिच्या डोळ्यांसमोरचं दृश्य पाहून ती स्तब्ध झाली. संपूर्ण जंगल एक नाजूक, धवल सोन्याच्या अंघोळीत न्हालं होतं! पानांवरून ओघळणाऱ्या दवबिंदूंवर सूर्यकिरण चमकत होते… प्रत्येक झाड, प्रत्येक वेल, प्रत्येक वाऱ्याची झुळूक — सजीव वाटत होती. पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट, दूरवरून ऐकू येणाऱ्या एखाद्या हरणाच्या टपटप धावांचा आवाज — सगळं काही इतकं शांत, तरीही भरलेलं… जणू जंगल स्वतः श्वास घेतंय!
तिच्या चेहऱ्यावर एक आश्चर्याची, पण प्रसन्नतेची लहर उमटली. “इतकं सुंदर… ह्याआधी कधीच पाहिलं नव्हतं…” ती स्वतःशीच पुटपुटली. शहरातली ती धावपळ, झगडणं, चेहऱ्यांवरचं बनावटपणा… इथे काहीच नव्हतं. इथे होतं — केवळ खरं सौंदर्य… निर्मळ, अपरिमित आणि पूर्णपणे मुक्त.
ती एका वेगळ्याच जगात होती. जिथे तिच्या आतल्या भीतीला, तिच्या अश्रूंना आणि तिच्या हरवलेल्या अस्तित्वाला — निसर्गाने एक नवा आश्रय दिला होता. त्या वातावरणात एक विलक्षण ऊर्जा भरून राहिली होती — जी केवळ निसर्गात, पूर्ण शांततेतच अनुभवता येते. तिनं डोळे मिटले आणि अगदी खोलवर, मनापासून श्वास घेतला. त्या श्वासात केवळ प्राणवायू नव्हता… त्यात होती स्वातंत्र्याची चव, नात्यांपासून मोकळेपणाची भावना आणि जिवंत असल्याचं एक गहिरं भान!
हेही वाचा – अज्ञात व्यक्तीच्या स्मितहास्याने तरुणाच्या मनातील वादळे शमली!
तिच्या ओठांवर नकळत हसू आलं… किती दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर असं स्वतःसाठी उमटलेलं हसू होतं. तिने दोन्ही हात पसरले, आकाशाकडे मान उंचावली आणि थोड्याशा पावसासारख्या नजाकतीने, पूर्ण आनंदात गिरक्या घेऊ लागली. फुलांच्या मंद वासात, वाऱ्याच्या तालावर तिचं मन हरखून गेलं. किती सहज, किती निरागस होती ती क्षणभर… जणू एखाद्या लहानशा मुलीसारखी, जी पहिल्यांदाच मनमोकळं आकाश अनुभवतेय.
“घर…?” तिच्या मनात चटकन एक विचार डोकावला.
पण त्याला क्षणातच झटकून टाकलं… कारण आता ती जिथे होती, तिथे दुःख नव्हतं, तिरस्कार नव्हता, भीती नव्हती… इथे कुणी तिच्यावर ‘जपून वाग’, ‘नीट राहा’, ‘असं करू नकोस’ असं ओरडणार नव्हतं.
ती नाचत होती… त्या कोवळ्या सूर्यप्रकाशात, पानांच्या सळसळीत, झाडांवर बसलेल्या पक्ष्यांच्या साक्षीने… तिच्या पावलांची ताल, आणि पक्ष्यांच्या गाण्यांचा सूर यांचं एक सुंदर संगम होता.
अचानक, तिला जाणवलं — समोरून कुणीतरी येतंय. त्या पावलांचा आवाज अगदी हलकासा, पण त्यातही एक ठामपणा होता. ती एक क्षण थबकली… लगेच तिची नजर त्या दिशेने वळली. सूर्य पूर्वेकडून हळूहळू वर यायला लागला होता. त्या दिशेने पाहिलं, तसं त्याच्या कोवळ्या प्रकाशात एक आकृती झाडांआडून पुढे येताना दिसली…
कदाचित तोच होता — ज्यानं तिला वाचवलं, ज्यानं आश्रय दिला!
पण आता तिच्या डोळ्यांत भीती नव्हती, होते केवळ कुतूहल… आणि एक नव्या सुरुवातीची भावना. त्या सोनेरी किरणांतून येणारा तो, तिच्यासाठी केवळ एक माणूस नव्हता, तो एखादा देवदूतच होता!
खांद्यावर झुलणारे केस, छातीपर्यंत आलेली दाट दाढी, पिळदार शरीरयष्टी… त्याच्या रूपात सामर्थ्य आणि सौम्यतेचा अनोखा संगम होता. खांद्यावरून आडव्या झोल्यातून डोकावणारा केळ्यांचा डोंगर आणि त्याच्या पाठीवर लटकलेला एक पट्टा… एक आधुनिक ऋषीच जाणवत होता तो. त्याने डोक्यावर बांधलेल उपरणं, कमरेला गाठ मारून पुढे आलेला पट्टा… त्या साऱ्या तपशिलांनी तिच्या मनात एक अनामिक श्रद्धा जागवली.
त्याच्या चालण्यात काहीसं शांत, काहीसं ठामपणा होता. त्या सकाळच्या प्रकाशात, तो निसर्गात इतका मिसळून गेला होता की, जणू ती स्वतः एखाद्या प्राचीन कथेचा भाग बनली होती. तिने हळूच स्वतःच्या बाहूला चिमटा काढला… “हे खरंच घडतंय का?” असा नखशिखांत थक्क करणारा क्षण… नाही, हे स्वप्न नव्हतं.
हा तोच होता, ज्याच्या उपस्थितीत तिला पहिल्यांदा सुरक्षित वाटलं आणि ज्याच्या डोळ्यांत तिला आश्रय सापडला… त्या एका क्षणात तिला समजलं, जंगलातही काहीतरी पवित्र असतं… आणि माणुसकीची जपणूक करणारा एखादा ऋषीसारखा देवदूत अजूनही या पृथ्वीवर वावरत आहे.
हेही वाचा – शीख युवकाने पगडी उतरवली… अज्ञात व्यक्ती शांतच होती!
आरुच्या चिमट्याचा जोर इतका होता की, ती स्वतःच विव्हळली, “आई गं! आरू…” तिच्या चेहऱ्यावर एकदम गोंधळलेलं हास्य पसरलं आणि त्याच क्षणी झाडांच्या आडून आलेल्या पुरुषी आवाजाने तिने चमकून वर पाहिलं.
“आरू…? आरू आहे तुझं नाव तर?” तो क्षणभर शांत, मग हळूच म्हणाला.
“आराध्या राजे… माझं नाव. आजी, आई-बाबा आणि मैत्रिणी मला आरूच म्हणतात.”
तिच्या चेहऱ्यावर त्याच्या त्या उत्तरावर गोडसं हास्य उमटलं. क्षणाचाही वेळ न दवडता तिने पुढचा प्रश्न विचारला “तुमचं नाव काय आहे?”
तो थोडा गडबडला… नजर खाली घालून त्याने उत्तर दिलं, “श… श.. शिवा…”
ती पटकन म्हणाली, “शिवा, आपलं नाव सांगताना कोणी असं गडबडतं का?”
त्याने एकवार तिच्याकडे पाहिलं आणि नकळत आपली नजर चोरली. काहीतरी लपवत आहे का, असा विचार आराध्याच्या मनात डोकावून गेला.
तिचं लक्ष आता त्याच्या खांद्यावरून लटकणाऱ्या केळ्याच्या लोंगराकडे गेलं. “इतक्या सकाळी तुम्ही ही केळी आणायला गेला होता?” मग त्याच क्षणी पाठीवर असलेल्या बॅगकडे पाहून विचारलं, “आणि ही पाठीवर बॅग काय आहे?”
तिच्या एका पाठोपाठ एक प्रश्नांनी तो थोडा वैतागला. त्याने तिरकस कटाक्ष टाकत तिच्याकडे पाहिलं. कपाळावर सौम्यशी आठी उमटली… ‘तर ही आहे आराध्या राजे. भीती जाताच तिच्या तोंडाचा पट्टा मात्र सुरू झाला…!’
पण तिच्या मनात मात्र, हाच प्रश्न होता की, आपलं नाव सांगताना शिवा का गडबडला?
क्रमश:


