डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
- रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन…
- आज मदहोश हुआ जाए रे, मेरा मन…
- तुझे देख के कहता हैं, मेरा मन…
- तोरा मन दर्पन कहलाए…
- मन का विश्वास कमजोर हो ना…
- हम को मन की शक्ती दे ना…
- नित घन बरसे नित मन प्यासा…
- मेरे मन बता दे तू…
- कई बार यूं देखा हैं, ये मन की सीमारेखा हैं…
- तू जो मेरे मन में, घर बसा ले…
- बेदर्दी बालमा तुझ को मेरा मन याद करता हैं…
- कोरा कागज था ये मन मेरा…
- फिर भी मेरा मन प्यासा…
- मेरा मन क्यों तुम्हे चाहे…
काय हे मन… मन… ‘मन म्हणजे फक्त डोक्यातील गुंतागुंतीचा गोंधळ आहे. खरं विज्ञान हे फक्त दिसणारं आणि मोजता येणारं असावं… आणि माणसात जे दिसतं-अनुभवता येतं ते म्हणजे वर्तन!’
तो येता-जाता नेहमी हे वाक्य बोलत असे…
तो म्हणजे एकेकाळी अमेरिकेत एक प्रचंड हुशार, पण तितकाच हट्टी असलेला एक मानसशास्त्रज्ञ! याचं गुपित कदाचित त्याच्या बालपणात दडलं होतं; फक्त 13 वर्षांचा असताना त्याच्या बाबानं कुटुंब सोडून दिलं, यामुळं तो आयुष्यभर नात्यांबद्दल थोडासा कठोर आणि थंड राहिला… बहुदा म्हणूनच त्याच्या मानसशास्त्रात, मनोविश्लेषणात भावभावनांना फारसं स्थान नाही; महत्त्वाचं आहे ते फक्त वर्तन!
त्याची आई अतिशय ‘धार्मिक’ होती आणि आपल्या मुलानं पाद्री बनून धर्माची सेवा करावी, अशी तिची मनोमन इच्छा होती. याउलट, त्याच्या डोक्यात ‘धर्म’ या संकल्पनेविषयीच गोंधळ होता… नंतर तर त्यानं थेट स्वतःला जवळपास ‘नास्तिक’ घोषित केलं.
त्याच्या विचारांमध्ये दिसणारी स्पष्टता, तर्कशुद्धता आणि अंधश्रद्धाविरोध… यामागची ही पार्श्वभूमी महत्त्वाची होती!
एकदा या पठ्ठ्यानं आपली एक विद्यार्थिनी रोझालीसोबत मिळून एक भन्नाट प्रयोग केला. त्यांना शेजारचं एक लहानसं गोंडस बाळ मिळालं, त्याचं नाव होतं अल्बर्ट… लहान असल्यानं आपण त्याला लिटल अल्बर्ट म्हणूया! या दोघांनी पहिल्यांदा बाळाला एक मस्त गोंडस पांढरा उंदीर दाखवला. बाळ हसत होतं, उंदराला स्पर्श करत होतं, त्याच्याशी खेळत होतं…
मग हा उंदीर दाखवतानाच तो थाळी बडवायचा आणि एक भयानक मोठ्ठा आवाज करायला लागला… बाळ बिचारं दचकलं, घाबरलं, रडायला लागलं… काही वेळा असं केल्यानंतर बाळानं उंदराला पाहिलं की, आवाज न होताही ते लागलीच रडायला लागलं!
हेही वाचा – विलोजब्रुकमधील वेदनांचे हुंकार
गंमत म्हणजे, आता बाळाला पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचीच भीती वाटू लागली! ससा, कुत्रा काय अगदी पांढरा कोट घातलेला माणूस बघूनही ते कावरंबावरं होऊ लागलं.
“भीती ही जन्मजात नसते, ती शिकवली जाते!” हा या प्रयोगाचा निष्कर्ष आला..
या प्रयोगाबाबत जगभर चर्चा झाली, पण या ‘लिट्ल अल्बर्ट’चं पुढं काय झालं? हा प्रश्न मात्र वर्षानुवर्षे अनुत्तरित होता… काही संशोधकांनी सांगितलं की, ते बाळ कदाचित ‘अल्बर्ट बाऊर’ नावाचं मुल होतं आणि दोन वर्षांनी आजारामुळं त्याचा मृत्यू झाला!
आपण आज सांगत असलेली “भीती शिकवलेलं बाळ” ही कथा कदाचित अपूर्णच राहिली…
प्रयोग झाला, चर्चा झाली, करिअर अगदी शिखरावर पोहोचलं… पण प्रयोगांच्या नादात हा बहाद्दर विद्यार्थिनी रोझाली रेयनरच्या प्रेमात पडला. समाजानं आणि विद्यापीठानं त्याला लगेच राजीनामा द्यायला भाग पाडलं!
गडी विद्यापीठातून बाहेर पडला आणि थेट जाहिरात क्षेत्रात जाऊन पोहोचला… इथं त्यानं मानसशास्त्राचा पुरेपूर वापर करून लोकांच्या खरेदीच्या सवयी बदलायला सुरुवात केली!! उदाहरणार्थ, साबणाच्या जाहिरातींमध्ये सुंदर मुलींचे हसरे ताजेतवाने चेहरे… सिगारेट म्हणजे ‘मर्दाना स्टाईल’ आणि ‘स्वातंत्र्याचं प्रतिक’…
पठ्ठ्यानं इथं एवढा धुमाकूळ घातला की, अगदी थोड्या कालावधीतच त्याला नवीन ओळख मिळाली, ‘जाहिरात क्षेत्रातील जादूगार’!
आज त्याच्या पद्धतीवर नैतिक प्रश्न विचारले जातीलही… असं लोकांच्या भावनांशी खेळणं बरोबर होतं का? एवढ्याशा बाळाला घाबरवणं योग्य होतं का? पण एक गोष्ट नक्की ती म्हणजे, त्यानं मानसशास्त्राला ‘मन वाचण्याचा खेळ’ या पातळीवरून ‘वर्तनाचं विज्ञान’ या पातळीवर नेलं…
त्यानं माणसाला शिकवलं, ”तुझी भीती, तुझं वर्तन, तुझ्या सवयी या सगळ्या शिकलेल्या आहेत आणि ज्या शिकल्या आहेत त्या बदलताही येतात.” त्याला भीती कशी शिकवता येते, हे माहीत होतं; पण तो म्हणायचा, ”भीती तशीच विसरवता पण येते. जर एखाद्या मुलाला सापाची भीती असेल तर, त्याला हळूहळू, खेळकर पद्धतीनं साप दाखवल्यास भीती निघून जाईल…”
तो नेहमी म्हणायचा, ”मुलांवर अतिरेकी प्रेम करू नका, त्यांना घट्ट मिठ्या मारू नका, चुंबनं घेऊ नका. उलट, त्यांना अधूनमधून थोडं धोपटा आणि थोपटत फक्त ‘गुड नाइट’ म्हणा… बस्स.” त्याच्या मते जितके जास्त फालतूचे लाड तितकं कमजोर व्यक्तिमत्व…!
हेही वाचा – विषाची परीक्षा…
एकदा या बहाद्दरानं थेट जाहीर केलं, ”मला निरोगी बाळांचा एक गट द्या आणि त्यांना मी ज्या वातावरणात ठेवेन त्याप्रमाणे त्यांचं भविष्य ठरवेन… डॉक्टर, वकील, कलाकार, चोर की, भिकारी… मी यातल्या कुणालाही काहीही बनवू शकतो.”
लोक थक्क झाले… इतकाऽऽ आत्मविश्वास?!
यामागं त्याचा मुख्य विचार होता, माणूस म्हणजे जन्मतः कोरी पाटी किंवा मातीचा गोळा… हा विचार आजच्या ‘Behavior Therapy’ च्या मुळाशी आहे…
बेधडक मांडणी, बेफाम जगणं, इतरांची पर्वा न करणं यामुळं आयुष्याच्या संध्याकाळी तो एकाकी पडला होता… त्याला मानसशास्त्रातलं ‘सर्वात मोठी पारितोषिक’ देण्यासाठी सन्मानित करायचं ठरलं, तेव्हा तो एवढा घाबरला की, चक्क स्टेजवर गेलाच नाही!
हा अजबगजब मनुष्य म्हणजे ‘जॉन बी. वॅटसन’… यांना आपण ‘वर्तनवादी मानसशास्त्राचे जनक’ म्हणून ओळखतो! हल्ली तर ॲमॅझॉन, मिंत्रा या ॲानलाइन पोर्टलपासून डी मार्ट, ब्लिंकइट, झेप्टो असो किंवा ओटीटी असो वा गेमिंग… माणसाच्या वर्तनावर आधारित अभ्यासावर हे सगळं अगदी जोमात चाललंय, अगदी राजकारण सुद्धा!


