चंद्रकांत पाटील
पांडू साधारण वय 60 आणि वजन 55 किलो… नुसता हाडाचा सापळाच, खरडून काढलं तर अंगावर चमचाभर सुद्धा मांस निघायचं नाही, अशी शरीर रचना. आत गेलेले गाल, पैलवान टाईप केसाचं कटिंग… तंबाखूच जबरदस्त व्यसन, जरा बसलं की, तंबाखू मळायची, ती तोंडात धरायची आणि पिचकार्या मारत बोलायची सवय. बोलताना गळ्यात तुळशीची माळ हालायची… पण, अस्सल शिव्यांशिवाय बोलायचा नाही. डोक्यावरचे केस ‘गोदरेज पावडर’नं डाय केलेली, गुळगुळीत दाढी आणि जाड मिशीचा कट. धुतलेला पांढरा नेहरूशर्ट, वरची दोन बटणं रिकामी आणि पांढरी विजार… कायम ‘बिझी’ एकतर मोबाइलवर असणार नाहीतर, तंबाखू मळत दिसणार! बुडाखाली जुनी होंडा स्पेलंडर…
पांडू तात्या आमच्या जुन्या वाड्यातला मेंबर, आमचा भाऊबंधच! तात्याचा पहिल्यापासून माझ्यावर ‘लई जीव’. माझं कौतुक व्हायचं कारण सुद्धा तसंच! वाड्यात आम्ही वीस-बावीस जण होतो, पण माझ्याशिवाय एकानेही कॉलेजची पायरी शिवली नाही. मग नोकरीचा विषय तर लांबच राहिला. मी इंजिनिअर झालो, नोकरीला लागलो म्हणून तात्याला माझा अभिमान वाटायचा आणि मी गावात येणार म्हटलं की, स्टॅण्डच्या चौकातच येऊन थांबायचा. उतरलो की, पहिली मिठी मारायचा, मग आपुलकीनं सगळी चौकशी करायचा.
“दाद्या, एवढा वाळलास कशानं र?” म्हणायचा.
“नाही, जरा टेंशन असतं, त्यामुळं होतंय…” अस म्हटंल की, “असली कसली नोकरी करतुया? आरं इतर नोकरीवालं कसं ‘बोक्यागत’ असत्यात आणि तुला रं काय झालंया? XXXX गेली असली नोकरी… असली नोकरी नको आपणाला! दुसरी बघ…” असं म्हणत मग शिवा पाटलाच्या ऊस घाण्यावर जायचं मग शिवाला ऑर्डर देतानाच तंबी असायची… “रसात आलं आणि लिंबू सापडलं तर बरं हाय, नाहीतर माझ्या संग गाठ हाय XXXXX.”
साधारण असे स्वागत झाल्यावर रस पिऊन तात्याला मी माझ्या गाडीने त्याच्या घरी सोडून पुढे जात असे. तात्याला माझ्या गाडीत बसल्यावर खूप आनंद होत असे. गावात असले की, आमचं जेवणखाणं एकत्र चाले. कौटुंबिक गप्पा चालत. माझ्या दोन्ही मुलांची लग्नं जमविण्यात तात्याचा पुढाकार होता.
हेही वाचा – सचिनच्या जिद्दीची कहाणी!
गड्याला लग्न जुळवायचा दांडगा नाद. त्यामुळे कधी घरात सापडायचा नाही. तात्याकडं मुला-मुलींच्या स्थळांची प्रचंड माहिती असायची. याबाबतीत तात्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. तात्याला प्रत्येक गावातील ‘कुळ्या’, पै-पावणे, नातेसबंध याची पुरेपूर माहिती असायची… नुसतं विचारायचं अवकाश… तात्या अमुक गावात कुठले पाटील आहेत? तर लगेच सांगणार, तिथं भोसले पाटीलच आहेत आणि ते आपलं भाऊबंदच आहेत… त्यामुळे व्यवहार होत नाहीत. कुणाची बहीण, कुणाची लेक कुठं दिली किंवा कुणाच्या सुना कुठल्या याची इत्थंभूत माहिती तात्याकडे असायची.
तात्याला सगळ्या भावकीतली पोरं दुवा द्यायची… “आजच्या काळात लग्नाला ‘पुरगी’ मिळायची कठीणहून बसलया… पांडूतात्या हुता म्हणून आमची लग्नं तर लागली, नाहीतर अवघड झालं असतं.”
मंगळाच्या पोरींनी तर तात्याचा फोटो देव्हार्यात नेऊन ठेवला, एवढा तात्याला मान मिळत होता. एखादा तरूण तात्याकडं यायचा आणि म्हणायचा, “मला ‘देखणी’ मुलगी पाहिजे बाकी काय अपेक्षा नाही!” अशाला तात्या कॉन्फिडन्समध्ये घ्यायचा आणि मंगळाची मुलगी दाखवायचा तात्याचं एक म्हणणं असायचं, “एक वेळ लगीन लावणं सोपं; पण ते टिकणं महाकठीण!”
म्हणून टिकण्यासाठी तात्या वाटेल ते करायचा. म्हणून, मग मुलाला चार हेलपाटे घालायला लावायचा. त्याला खरोखर मुलगी आवडली का, ते पाहायचा… घरच्यांसाठी ‘मंगळ’ नसलेली पत्रिका तयार करून द्याचा आणि मगच लगीन लावायचा.
तात्याला ‘पत्रिका’ या विषयाचा भयंकर तिटकारा होता; कारण तात्या म्हणायचा, “हे खोटं शास्त्र आहे.” कोण पत्रिकेवर जास्त बोलायला लागला तर, तात्या एखाद्या मृत व्यक्तीची पत्रिका दाखवून, “याचं लगीन कधी होणार?” असं विचाराचा.
तात्या नुसतं लगीन लावून मोकळा व्हायचा नाही तर, शेवटपर्यंत त्या मुलीची पाठराखण करायचा. अशाच एका पोरीला हुंड्यासाठी त्रास व्हायला लागल्यावर तिनं तात्याला सांगितलं. तात्या तिथं गेला आणि सासरच्या लोकानां शेवटचं सांगून आला, “जर पुरगीला काय कमी जास्त झालं तर, गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवा.” पण त्यांनी ऐकलं नाही. शेवटी, तात्यांनं पोलीस तक्रार करून सगळ्यांना आत टाकलं. सगळे सूतासारखे सरळ झाले अन् पुरगी नांदायला गेली.
बैठकीला बसल्यावर बोलताना तात्या माळेचा आधार घ्यायचा… “पावणं, मुलगा एमआयडीसीत नोकरी करतूया. नोकरी परमनंट हाय. पावणं, खोट बोलणार नाय… माझ्या गळ्यात माळ हाय! स्थळ एक नंबर हाय, सोडू नगासा…” असं पोटात शिरायची कला तात्याला होती.
कुठलीही लग्नाची बैठक फायनलला येत नाही म्हटंल की, तात्याला बोलावणं यायचं. ‘तोळ्या’साठी पावणा अडून बसल्याला असायचा अन् तात्या सुर्वणमध्य गाठायचा आणि प्रकरण मिटवायचा… मुलीच्या बाला लागलं तर पाच-दहा हजारांची मदत करायचा, पण अडलेली गाडी पुढं रेटण्यात तात्याचा हात धरणार कुणी नव्हतं!
तात्याचा ‘यादी पे शादी’ या तत्वावर जादा भरोसा होता. कारण टाइम गेला की, ‘फाटं फुटत्याती’ आणि कार्यक्रम घडत नाही… मग अशा वेळेला तात्या कधी ‘मुलीचा वडील’ व्हायचा आणि ‘कन्यादान’ करायचा… कधी मुलाचा ‘मामा’ व्हायचा आणि लिंबू धरायचा… तर कधी मुलीचा ‘भाऊ’ बनून मेव्हण्याचा कान पिळायचा. तात्याला कुठल्या गोष्टीसाठी लगीन थांबलेलं आवडायच नाही, अगदी भटजी नसला तरी सुद्धा तात्या ‘भटजी’ होऊन आंतरपाट धरायचा आणि सुरेल ‘मंगलाष्टकं’ म्हणायचा! जेवणाच्या बाबतीतही तसेच… तात्या ‘शिरा भात’ उत्तम बनवत असे. तात्याची कटाची आमटी तर एक नंबर… असा हा तात्या सर्व गोष्टीत तरबेज होता.
तात्याला एका बाजूनं कौतुकाची थाप मिळायची तर, दुसर्या बाजूनं शिव्या पण बसायच्या. शिव्याचा सीन नदीवर दिसायचा… या नवीन आलेल्या पोरी कपडे धुवायला एकत्र आल्या म्हणजे पांडू तात्याला शिव्या घालायच्या. कोण म्हणायची, “भाड्यानं आमच्या बाला सांगितलं ‘तीन एकर’ जमीन मुलग्याच्या वाटणीला येतंय आणि आता कळतंया… तिघा भावांत मिळून तीन एकर हाय…” तर, दुसरी म्हणायची, “मुलग्याला साखर कारखान्यात परमनंट नोकरी हाय म्हणून सांगितलं आणि आता कळतंय टेम्परवारी हाय! कारखाना बंद झाल्यावर जातूया पाणी पाजाया, पण जमीन मातूर बिगाबर जादाच हाय!”
असंच आम्ही एकदा गप्पा मारत होतो. त्यावेळी तात्यांना मी विचारलं, “आत्तापर्यत तुम्ही किती लग्नं लावली?” त्यावर तात्यानी सांगितलं, “गेल्या पंचवीस-तीस वर्षांत साधारणपणे साताठशे तरी लग्नं लागली असतील.”
“मग इन्कम?”
“मी त्यासाठी हे काम करत नाही, मला आवड हाय म्हणून करतुया. लगीन लागल्यावर वधू वराच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या चेहर्यावर दिसणारा आनंद किंवा समाधान हीच माझी कमाई!”
“मी मोठ्यांच्या बैठकीला शक्यतो जात नाही. गरीबाच्या, घटस्फोटीताच्या, अपंगाच्या, दलिताच्या कार्यासाठी मी पदरमोड करून जातो. माझा दरवर्षी किमान दोन-तीनशे टन ऊस जातूया गावात सगळ्यात जास्ती टनेज आपल्या मळ्यातल्या उसाला पडतंय. दोन म्हशी, दोन गाय असल्यामुळे दूधदुधतं घरात हाय, भाजीपाला शेतात पिकतुया, त्यामुळं खर्च काय नाही. माझ्याकडं कायम पाचसात लाख बॅलन्स असतुया. घरात टीव्ही हाय, फ्रीज हाय, गॅस हाय प्रत्येकाला हीरो होंडा हाय, मोबाइल हाय…. फक्त शाळा कोण शिकलं नाय! आणि पोरांच शेतात लक्ष नाय… तीच एक चिंता हाय!”
पांडूला एक भाऊ आणि दोन बहिणी. बहिणींची लग्नं फार पूर्वी झाली होती. दुसरा भाऊ आणि तात्या एकत्र राहायचे. भाऊ संघात नोकरीला होता. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाचं लगीन गुदस्ता झाल होतं. मुलगीचंबी परवा झालं. दोघास्नीबी चांगली स्थळं भेटली होती. पांडूला दोन मुलगेच होते थोरला शेती करत होता. धाकला शिकत होता, पांडूला मुलगी नव्हती. त्यामुळं बायको म्हणायची, “बघा की, दोन पोराऐवजी एकादी पुरगी असती तर किती बरं झालं असतं.”
मग पांडू म्हणायचा, “कशाला पाहिजे गं पुरगी?” तर वहिनी म्हणायची, “तसं नव्हं आपून गेल्यावर आली असती की, आरडत वरडत! लेकीशिवाय माया नाय.”
“अगं सखू, मी पंचवीस पोरीचं कन्यादान केलंय… त्या आपल्याच पोरी हायता बघ, तुला कवातर कळंल!” असं म्हणून विषय तिथंच थांबायचा.
तात्या सकाळी पाचला उठायचां सगळ आवराआवरी करून मळा गाठायचा म्हशीची धार काढून वैरणकाडी करून घरला यायचा, चहापाणी तयार असायचा. कुणाचं लगीन, कुणाचा साखरपुडा, सोसाटीची कामं सगळं संपवून जेवायला घरला याचा. जेवून पारभर पडणार आणि ऊन खाली झाल्यावर पुन्हा शेताकडं जायाचा. उसाला पाणी, लागवड बगायचा.
हेही वाचा – सुनंदा अक्का अन् पेरूचं झाड…
घरातलं आणि बाहेरच तात्या एकटाच बघायचा. आलं-गेलं पावनारावळा, गावातलं राजकारण… सगळं तात्याशिवाय कुणाला माहीत नसायचं. हल्ली तात्या या रूटिनला जरा कंटाळला होता. त्याला जरा मोकळीक पाहिजे होती. गुडघं लवकर घाईला आलं हुतं! पोरांनी पुढं येऊन शेती करावी, असं वाटत हुतं… पण तसं घडत नव्हंतं. “पोरं XXXची नुसती पबजी खेळत्याती…” असं म्हणायचा.
असंच एकदा जेवताना बायकोला तात्या म्हणाला, “सखू, आज कालवण तिकाट का लागतंय गं?
“आवं, तिकाट नाय तुमचं त्वांड आलं असंल.”
”व्हय आलं असंल…” म्हणून तात्यानं दुर्लक्ष केलं! पुन्हा चार-आठ दिवसांनी जेवायला बसल्यावर त्यांनी तक्रार केली, “माझी दाढ दुखत्या गं! काय हुतया ते कळंना झालंय.”
“आवं, मग मागं दाढ काढल्या त्या डॉक्टरला तरी दाखवा…” सखू म्हणाली.
पुढे एक दिवस तात्या पावण्याच्या गावाला गेल्यावर तिथून तसाच तालुक्याच्या गावाला वडगावला गेला आणि दाताच्या डॉक्टरना भेटला. डॉक्टरांनी बघितल्या बघितल्या सागितलं, “एक एक्सरे काढाय पाहिजे! मला जरा शंका येतीया!”
पांडू इचार करत घरला आला आणि पुतण्याला घेऊन कोल्हापूर गाठलं; रिपोर्ट घेऊन परत डॉक्टरकडं आला. रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टर पुतण्याला म्हणाले, “त्यांना जरा बाहेर बसवा.” मग त्यांनी पुतण्याला सांगितले की, “कॅन्सरची सुरुवात आहे, लगेच उपचार करणे गरजेचं आहे.” हे ऐकून पुतण्या रडायला लागला. पांडूला काही सागितलं नव्हतं; पण त्याला अंदाज आला होता की, मला काहीतरी झालंय… पण कोण सांगत नाय!
त्याला गेल्या वर्षी गेलेल्या मित्राची केस आठवू लागली होती… “गुदस्ता याच टायमाला बाळूनानाला दवाखान्यात नेहलं हुतं डॉक्टरांनी ऑपरेशन केलं… नानाच्या मेंदूला कायतरी झालं हुतं. केवढा दांडगा गडी, पण सहा महिन्यांत खलास! असचं कायतरी मला झालंया…” म्हणून गडी रातभर निजला नाही. ह्यो रडतूया म्हणून बायकूपण रडत हुती रातभर… सगळा कालवा.
दुसरे दिवशी पुतण्या आणि पोरांनी गाडी करून तात्याला कोल्हापूरला नेला डॉक्टरांनी बघितलं आणि सांगितलं, “काहीही घाबरण्याचे कारण नाही एकदम छोटं ऑपरेशन आहे आणि अशी दररोज चार-पाच ऑपरेशन्स इथे होत असतात, काळजीचं कारण नाही!”
तेव्हा जरा त्याला कॉन्फिडन्स आला. पुढे आठ दिवसानं तात्याचं ऑपरेशन झालं… मला कळल्यावर आम्ही बघायला गेलो तर, सीन असा होता. तात्याच्या घरचा सोपा बायकांनी गच्च भरला होता. कोण आलेल्या पाहुण्यास्नी चहा देतंय तर, कोण पाणी भरतंय… तिकडं स्वयपांकघरात दोघी-चौघी काय तरी करीत हुत्या… तात्या शेजारी तात्याची मालकीण बसून तात्याला चमच्याने खीर पाजित होती… नंतर मी बरोबर नेलेला उसाचा रस पाजला आणि वैनीला म्हणालो, “या एवढ्या बायका कोण?”
तर, वैनींनी तात्याकडं हसत हसत बघितलं आणि सांगितलं, “ह्या सगळ्या यांनी कन्यादान केलेल्या लेकी हायत्या… ह्यानला मी एक लेक मागत हुते तर, त्यांनी मला चांगल्या दहा-पंधरा दिल्या. तात्याचं ऑपरेशन झाल्यापास्न त्या आम्हाला आधार द्यायला थांबल्यात…” बोलताना अश्रूधारा वाहू लागल्या.
“मी आत्तापातूर ह्यास्नी शिव्या देत होती. पदरचं खाऊन लष्कराच्या भाकरी कशाला भाजता? असं म्हणत होते… पण आज कळतंय की, त्यांनी काय मिळविलंय.”
मी म्हणालो, “वैनी तात्यानी कामच असं केलय की, सारा समाज त्यांचा ऋणी आहे. तात्या देवमाणूस हाय देवमाणूस! रक्ताची नाती जन्माने मिळतात मानलेली नाती मनाने जुळतात; पण नातं नसतानाही काही बंधनं जुळतात…
मोबाइल – 9881307856


