Thursday, January 15, 2026

banner 468x60

Homeललितसागरगोटे… आयुष्यातील चढ-उताराचे अन् सुख-दुःखाचे!

सागरगोटे… आयुष्यातील चढ-उताराचे अन् सुख-दुःखाचे!

मी बंगलोरला जायला विमानात बसलो आणि दोन आठवड्यांपूर्वी आईशी झालेला संवाद आठवला… त्या दिवशी मी नुकताच ऑफिसमधून घरी आलो होतो. चहा पीत असताना आईने एक लग्नपत्रिका हातात दिली आणि म्हणाली, “तुझ्या सुषमामावशीच्या नातवाचं लग्न आहे बंगलोरला. माझी खूप इच्छा आहे, जायची कारण जवळपास पन्नास वर्षांनी सुषमाला भेटायचा योग आहे.”

सुषमामावशीबद्दल आईकडून खूप काही ऐकून होतो मी. पुण्यातील सदाशिव पेठेतील त्यांचं बालपण… दोघीही जीवश्चकंठश्च मैत्रिणी… सुषमाच्या आजोबांच्या वाड्यात माझ्या आजोबांचे बिऱ्हाड होतं. पण ती परिस्थिती त्या दोघींच्या मैत्रीच्या आड आली नाही कधीच! पुढे लग्न होऊन आई मुंबईत आली आणि सुषमामावशी बंगलोरला सासरी गेली. सुरुवातीला संपर्क होत होता वरचेवर, पण नंतर संसारात गुरफटून गेल्यावर तोही संपल्यात जमा होता.

आईच्या डोळ्यांत, मी काय उत्तर देणार याची भावूक उत्सुकता दिसली आणि ती साहाजिकच होती. चहाचा रिकामा कप तिच्या हातात देताना मी तिला सांगितले की, “तुला जायचं असलं तर मी सुषमामावशीशी बोलून घेतो आणि चांगलं आठवडाभर आधी तुला बंगलोरला विमानाने तिच्या घरी सोडतो. तू खरंच जा आई! इतक्या वर्षांत तुझ्या मनात साठलेले सगळं बोलून ये. मावशीला देखील खूप आनंद होईल तुला भेटून…”

हेही वाचा – बॅक स्टेज… हाच योग्य निर्णय!

“मला वाटलं होतं तसंच तू बोललास सोन्या…” माझ्या डोक्यावरून हात फिरवत आईने तिच्या नकळत कितीतरी वर्षांनी आज माझं लहानपणीचे टोपणनांव उच्चारले, ‘सोन्या’!

पुढच्या दोन-तीन दिवसांत सुट्टी घेऊन मी आईला सुषमामावशीच्या घरी सोडून आलो. मावशीच्या नातवाचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. आज रात्रीच्या विमानाने मी आणि आई मुंबईला परत येणार आहोत. विमानतळाजवळच ऑफिस असल्याने थोडावेळ काम करून मी निघालो. मावशीकडे पोहोचायला दुपारचे दोन वाजले. आई आणि मावशी वाटच बघत होत्या माझी. हातपाय धुऊन आधी जेवलो. आईला भेटून झालेला आनंद मावशीच्या चेहऱ्यावर अथांग पसरलेल्या सागरासारखा दिसत होता. जेवण झाल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मावशी एकदम भावूक झाली… मी आईला खुणेनेच तिला सावरायला सांगितले.

मावशीला किती बोलू आणि किती नको असं झालं होतं, “शेखर, तू आईला आठवडाभर आधी सोडून गेलास ते खूप बरं केलंस. लग्न आणि पूजा उरकल्यावर नंतरचे दोन-तीन दिवस आम्ही फक्त जुन्या आठवणींना उजाळा दिला. मी जात्याच गरम डोक्याची आणि उथळ विचारांची! पण तुझ्या आईने मात्र आयुष्य जगताना एक मुलगी म्हणून काय काय गोष्टींची काळजी आणि खबरदारी घ्यावी, ते मला वयाच्या प्रत्येक टप्प्यावर समजावून सांगितले. त्या सगळ्याच्या जोरावर मी इथवरचा प्रवास सुखरूप पार पाडला. यांची वकिली सुरुवातीपासूनच जोरदार सुरू होती. घरी सतत पक्षकारांचे येणं जाणं असायचं. त्यांच्यासोबतच्या व्यवहारात मी यांना आजवर मदत करत आले. माझी दोन्ही मुलं देखील वकील झाली. मोठ्या नातवाचं लग्न ठरलं आणि मी आठवणीने पत्रिका पाठवली तुझ्या आईला!”

“आमची दोघींचीही वयं झाली आता. परिस्थितीच्या अंगणात चढ-उताराचे आणि सुख-दुःखाचे सागरगोटे उंच उडवत एका हातात झेलता झेलता वाढत्या वयाचा अंधार कधी पडला, ते कळलं देखील नाही. आता मात्र जबरदस्तीने उडवलेले सागरगोटे हातात पकडण्याची ताकद हळूहळू निसटून चालली आहे, याची जाणीव भीतीचे वातावरण माझ्या अवतीभवती जमा करते. पण तुझ्या आईला आज इतक्या वर्षांनी भेटले आणि मी खरोखरच निवांत झाले… मनातून शांत! अंगात एकदम हत्तीचे बळ आले आहे आणि आयुष्याच्या या संधीप्रकाशात आठवणींच्या चांदण्या अधिकाधिक तेजस्वी दिसत आहेत मला. आता माझ्या मनाची तयारी झाली आहे, देवाने डाव थांबवण्याचे ठरवलं तरीही.”

मावशीसोबत आईला देखील अश्रू अनावर झाले. मला तर काहीच सुचत नव्हतं पुढे बोलण्याचं… पण काही करून पुढे उसळी घेणारा भावनांचा महासागर थोपवून धरण्यासाठी मीच मावशीच्या जवळ जाऊन तिचे हात हातात घेऊन म्हणालो, “मावशी कदाचित लहान तोंडी मोठा घास होईल हा, पण तरीही विनंती करतो की, सावर स्वतःला. तुमच्या दोघींची भेट हे माझ्या हातून घडलेलं सर्वात पुण्यकाम आहे, असं मी समजतो. आईने देखील खूप कष्ट करून आम्हा भावंडांना मोठं करून आमच्या आवडीचे शिक्षण घेण्यासाठी पुढाकार घेतला. ती आयुष्यभर आमच्यासाठी झिजली. आज आम्ही जे काही आहोत, याचे सगळं श्रेय तिचं आहे. तिने सुद्धा तुझ्यासारखेच सागरगोटे झेलले. प्रसंगी ती धडपडली देखील पण सागरगोटे जमिनीवर पडून दिले नाहीत. आता थोड्या वेळाने आमची परत जाण्याची वेळ येईल. तेव्हा हसतमुखाने आम्हाला निरोप दे.”

हेही वाचा – दुसऱ्यांना जगण्याची ताकद देणारा ‘अन्नसोहळा’

मावशी एव्हाना सावरली होती. तिच्या मनातील भावनांचा कोसळणारा धबधबा आता रौद्ररूप विसरून शांतपणे वाहू लागला हे बघून मी आणि आई दोघांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

विमानतळावर जाण्यासाठी मी बुक केलेली कॅब यायच्या बेतात होती. मावशीने हातावर चिमुटभर दही ठेवलं… ते खाऊन मी तिला वाकून नमस्कार केला. आईने आतून आणलेली तिची बॅग मी हातात घेतली आणि आम्ही दोघेही तिच्या बंगल्याच्या पायऱ्या उतरून मुख्य दरवाज्यापाशी येऊन उभे राहिलो…

सतीश बर्वे
सतीश बर्वे
वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!