डॉ. विवेक वैद्य
सकाळी आवरून दवाखान्यात जायला निघालो तर, माझा जवळचा मित्र अजितचा फोन… “वैद्य… जरा ताबडतोब घरी ये. अमितला बरं नाही.” त्याचा आवाज घाबरलेला… काय झाले असावे? कालपर्यंत तर ठीक होता अमित. पण वेळ काही विचारण्याची नव्हती, मी म्हणालो “लगेच येतो.”
घरी पोहाचलो तर, वहिनी अमितला धरून बसलेल्या. अमितच्या मनगटाला रक्ताळलेला रुमाल बांधलेला. काय झालं असावं, याचा मला अंदाज आला. मी भराभर रूमाल सोडला. सुदैवाने, जखम खोल नव्हती. मी जखम साफ करून पट्टी बांधली. धनुर्वाताचे इंजेक्शन दिले. या सर्व उपचारादरम्यान अमित काहीसा बधीर वाटला. वहिनी मात्र त्याला एखाद्या लहान मुलासारखे धरून अधूनमधून डोळ्याचे पाणी पुसत होत्या. अशाप्रसंगी काही बोलायचे नसते, हे मला माहीत होते. कारण बोलालो असतो तर, वहिनींचा बांध फुटला असता…
मी बेसिनवर स्वच्छ हात धुतले आणि बाहेर आलो. बाहेर अजित एखाद्या चोरासारखा बसला होता. त्याच्या खांद्यावर थोपटून म्हणालो, “काळजीचे कारण नाही. दुपारी दवाखान्यात ये. मित्र म्हणून सर्व मोकळेपणानं सांग. अमितसारख्या हुशार मुलाने मनगटावरची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला?”
अमित लहानपणापासून हुशार अभ्यासू. बारावीत पीसीएममध्ये त्याला 87 टक्के मिळाले होते. सीईटीमध्येही चांगले गुण मिळाल्याने त्याला मोठ्या शहरातल्या नामांकित कॉलेजात इंजिनीअरिंगला प्रवेश मिळाला. पहिली दोन वर्षे चांगली गेली, मार्क्सही उत्तम मिळाले. तिसऱ्या वर्षी अमितला फक्त 52 टक्के पडले. यावर्षी जरा विषय कठीण होते असे जरी त्याने घरी सांगितले तरी, अजितचा विश्वास बसेना! त्यात तीन महिन्यांनंतर कॉलेजकडूनही आपला पाल्य वारंवार गैरहजर राहात असल्याचा मेसेज आला. हादरलेल्या अजितने ताबडतोब गाडी पकडून अमितचे कॉलेज गाठले.
हेही वाचा – गोष्ट कैकेयी आणि मंथराची… अमोल आणि सुशीलाची सुद्धा!
ऑफिसमध्येच अमित वारंवार गैरहजर राहातो आणि 75 टक्के प्रेझेन्टी नसेल तर त्याला पुढच्या सेमिस्टरमध्ये बसू दिले जाणार नाही, हे कॉलेजतर्फे स्पष्ट केले गेले. पण ही तर फक्त सुरुवात होती. अमितने कॉलेजच्या मेसचे दोन महिन्यांचे पैसेच दिलेले नव्हते! या व्यतिरिक्त अनेक मित्रांकडून उधार पैसे घेतल्याचेही त्याला कळले. आपण दर महिन्याला जरूरीपेक्षा जास्त पैसे देऊनही इतके पैसे का लागावे? हे अजितला समजेना… पण लोकांसमोर तमाशा नको म्हणून अजितने सर्वांचे पैसे चुकते केले आणि त्याला घरी घेऊन आला. त्यानंतर दिवसभरचा अजितचा संताप आणि वहिनींच्या रडारडीनंतर हे स्पष्ट झाले की, अमितला कशामुळे कोण जाणे ऑनलाइन गेम खेळायचा नाद लागला होता. त्यामुळे कॉलेजला दांड्या, अभ्यासाचा खेळखंडोबा, पैशांची चणचण सर्वच सुरू झाले. हा अजितसाठी फार मोठा धक्का होता. आपल्या सुसंस्कृत, प्रेमळ कुटुंबात असे काही घडेल, असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. पण तरीही तो सावरला. त्याने अमितला समजावले. भविष्यात काय त्रास होईल, हेही सांगितले. अमितलाही ते पटले. त्यानेही परत असे काही करणार नाही, असे वचन दिले आणि पुन्हा कॉलेजला गेला.
धास्तावलेल्या अजितने त्याच्या रूममेटपासून प्राचार्यांपर्यंत लक्ष ठेवायला सांगितले. नंतर वरवर तर सर्व ठिकठाक होते. पुन्हा काही अमित गेमच्या दुकानाकडे फिरकला नाही. कॉलेजातली उपस्थिती समाधानकारक होती. पण मार्क मात्र वाढत नव्हते. पण गेम खेळण्यामुळे जे अभ्यासाचे नुकसान झाले ते भरून निघायला थोडा वेळ लागेल, हे जाणून अजित काही बोलला नाही.
शेवटची सेमिस्टर झाली आणि अमित घरी परतला. परतला ते निराळे रूप घेऊन! एकदम घुमा… कोणाशीही फारसे न बोलणारा… त्याच्याच रूममध्ये तासन् तास बसून राहणारा!!
अजितने पुन्हा फोनाफोनी केली… माहिती काढली… त्यावरून एवढे समजले की, अमितने पैसे लाऊन ऑनलाइन गेम खेळणे बंद केले असले तरी, मोबाइलमध्ये गेम खेळणे सुरूच ठेवले होते. अजितला काय करावे समजेना! त्याने एक-दोनदा अमितला त्याविषयी छेडले. पण “बाबा. आता सुट्टी आहे. मग मी काय करू?” असा प्रतिप्रश्न करून त्याने तो विषय उडवून लावला.
सुट्टी आहे तर, जिमला जा, बाहेर फिरायला जात जा, संध्याकाळी बागेत जात जा, सुंदर मुलींकडे पाहात जा… अगदी एखादी छान मैत्रीण गटवली तरी चालेल… असे त्याला सांगावे असे अजितला वाटे. पण तो बोलू मात्र शकायचा नाही.
पण शेवटी एकेदिवशी याचा स्फोट झालाच. बी.ई. फायनलचा रिझल्ट डीक्लेअर झाला आणि अमित दोन विषयांत चक्क नापास झाला. एरवी संयंमाने वागणाऱ्या अजितचा तोल सुटला. आम्ही तुझ्यासाठी काय-काय केले आणि किती त्याग केला, हे ऐकवत ऐकवतच त्याने अमितवर हातही उचलला. त्यानंतर पुढचे रामायण झाले…
सर्व सांगून झाल्यावर अजितच्याही डोळ्यांत पाणी आले. आपला एकुलता एक मुलगा वाया जातो की काय, ही भीतीही होतीच! मलाही काय करावे, समजत नव्हते. “ठीक आहे. तूर्तास या विषयावर घरी काही बोलू नको. त्याला रागावू नको,” एवढेच त्याला सांगितले.
हेही वाचा – होप फॉर द बेस्ट!
दुसऱ्या दिवशी ड्रेसिंगसाठी अमित आला तेव्हा, मी अजितला बाहेर बसायला सांगितले. अमितशी मी जनरल बोललो. म्हणजे, जखम दुखते का? दुसरा काही त्रास होतोय का? वगैरे वगैरे. कालच्या प्रसंगाचा उल्लेखही केला नाही. कदाचित, त्यामुळे अमित काहीसा मोकळा झाला. रोज ड्रेसिंग करताना मी त्याच्याशी बोलत गेलो. तो मोकळा होत गेला. त्याच्या बोलण्यातून त्याने स्पष्ट केले की, मोबाइल गेमचे त्याला अक्षरशः ॲडिक्शन आहे! ते चूक आहे, हे त्याला कळत होतं, पण वळत नव्हतं. वडिलांनी त्याला समजून घेतले नाही, असेही त्याला वाटत होते. मी त्याला रविवारी संध्याकाळी माझ्या घरी बोलावले. तो येईल की, नाही… जरा साशंक होतो; पण तो ‘हो’ म्हणाला.
काही गोष्टी या चमत्कार असतात. केवळ आठ दिवसांत अमित माझ्याशी एवढा मोकळा होईल, असे मला स्वप्नातही वाटले नसेल. पण रविवारी तो येतोय तर, त्याला काही गोष्टींची जाणीव करून देणे मला जरूरी होते.
रविवारी गप्पा मारता मारता मी त्याला माझ्या आणि अजितच्या लहानपणीच्या अनेक गोष्टी सांगितल्या. एका प्राथमिक शिक्षकाच्या सामान्य परिस्थितीतल्या मुलाने अत्यंत कष्ट आणि अभ्यास करून आज उच्चपदस्थ नोकरी पटकावली. मी त्याला म्हणालो, “अजितने तुझ्यासाठी काय काय केले, हे मी तुला अजिबात सांगणार नाही. ते त्याचे कर्तव्य होते. कदाचित, तू आयुष्यभर बसून खाशील एवढी त्याची संपत्ती असेलही. प्रश्न हा आहे की, तुला तुझी आयडेन्टिटी दाखवायचीय की नाही? तू वाईट आहे, असे मी अजिबात म्हणणार नाही. पण काही गोष्टींचे ॲडिक्शन वेळीच नाही सुटले तर, त्याचा भविष्यावर मोठा परिणाम दिसून येईल…”
त्याला माझे म्हणणे पटले.
या गोष्टीला दोन महिने होत आले. मोबाइलगेम खेळण्याची सवय अमितने प्रयत्नपूर्वक कमी केली. ज्या विषयांत तो नापास झाला, त्याचा अभ्यास त्याने नव्या जोमाने सुरू केला. त्याचा वडिलांबद्दल असलेला गैरसमजही दूर झाला आहे.
ही सत्यकथा आहे… त्यामुळे चित्रपट किंवा कथा कादंबरीत असतं तसे तो झटपट सुधरून लगेच हॅप्पी एन्डिंग होईल, असे नाही. पण तसा छान शेवट होईल, अशी पावले अमितने उचलली आहेत, हे निश्चित!
मुलगा तरूण होत असताना त्याच्यात आणि बापात काहीस अंतर पडत जातं. ते वेळीच भरलं गेलं नाही तर, त्याचे दीर्घकालीन वाईट परिणाम, खासकरून मुलांच्या जीवनावर, होतात. अजित आणि अमितमध्ये ते वाचवता आले. पण बाकीच्या मुलांबाबत काय सांगू शकतो!
दारू, तंबाखू, जुगार याबरोबरच आता मोबइलचीही नशा सर्वदूर पसरू लागली आहे. चॅटिंग, मोबाइलगेम, सोशल ॲपवर तासन् तास घालवणारी तरुणांची संख्या खूप मोठी आहे. अभ्यास – करिअरचे नुकसान, शारीरिक आरोग्याची हेळसांड, संवादाचा अभाव, आभासी दुनियेत वावरल्याने वास्तवापासून दूर राहाणे, अशा अनेक त्रासदायक गोष्टी त्यामुळे होतात. या ॲडिक्शनपासून वेळीच सावध होण्याची गरज आहे.


