मयुरेश गोखले
आज सकाळपासून तिने श्रीरंगचं जाम डोकं खाल्लं होतं. फोनवर तिचा सारखा एकच विषय चालू होता, “श्री सांग ना रे… आपलं काही चुकत तर नाहीये ना? तुझं ठीक आहे रे, पण माझ्यासारखी मुलगी अशी कशी तुझ्यात गुंतत चालली आहे! का आणि कसं होतंय हे सगळं, काही कळत नाहीये! तुझी आठवण खेचतेय मला तुझ्याजवळ… श्री मी वाट तर चुकत नाहीये ना?”
सकाळपासून फोनवर या प्रश्नांचा भडिमार श्रीवर सुरू होता. त्यांना भेटून जेमतेम वर्ष झाले असेल आणि ती श्रीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. श्रीरंगला सुद्धा ती आवडायला लागली होती. पण आज सकाळपासून तिला काय झालंय काही कळत नव्हतं. ‘मी तुझ्यासोबत वाट तर चुकत नाहीये ना?’ याचीच आवर्तन सुरू होती. शेवटी श्रीरंगने तिला संध्याकाळी त्यांच्या नेहमीच्या जागी भेटायला बोलावले.
संध्याकाळ झाली… दोघे भेटले… वातावरण ढगाळ आणि हवेत चांगलाच गारठा होता. समोर टेबलवर ठेवलेला चहाचा वाफाळलेला एक कप उचलून श्री तिच्याकडे एकटक बघत होता. आणि तिला त्याच्या अशा बघण्याने काहीच सुचत नव्हते. श्रीला हसायला येत होते. शेवटी श्रीरंगने शांततेचा भंग करत तिला बेचैन असण्याचे कारण विचारले…
ती म्हणाली, काल तिची एक नातलग तिला भेटली, त्या बाईने खूप कौन्सलिंग केलं… ‘तू खूप मोठी चूक करतेयस, अस गुंतत नको जाऊ. इतक्या कमी वेळेत इतकं प्रेम कधी होऊच शकत नाही… तुझं भविष्य तुलाच घडवायचं आहे, घरच्यांचा विचार कर…’ वगैरे वगैरे.
श्रीला तिच्या बेचैनीचे कारण आता नीट समजले होते. नातलग बाई काय बोलली, हे पुराण अजून संपलेच नव्हते आणि त्या बाईच्या सांगण्यामुळे तिला काय वाटले, ही बडबड चालूच होती. पण आता श्रीचे तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. तिच्या डोळ्यातले क्षणाक्षणाला बदलणारे भाव पाहून त्याला खूप मजा येत होती. मधेच तिची एक बट तिच्या गालावर येत होती, श्री त्या बटेकडे पाहात होता. तिच्या ओठांच्या हालचाली तो पाहात होता.
श्रीने आजूबाजूला पाहिले, हॉटेलमध्ये फक्त ते दोघेच होते. त्याने आपला चहाचा कप अगदी तिच्या कपला चिटकून ठेवला आणि खुर्चीवरून उठून तो तिच्याजवळ आला. तिचे बोलणे आता बंद झाले होते. ती त्याच्याकडे पाहत होती… त्याने हात धरून तिला उठवले आणि काही कळायच्या आत तिला एक घट्ट मिठी मारून हळूच तिच्या कानात सांगितले की, “तो उद्या आई-बाबांना घेऊन तिच्या घरी लग्नाची बोलणी करायला येणार आहेत.”
हेही वाचा – गहिवरला मेघ नभी…
श्रीचे बोलून झाले, पण ओठ काही कानाजवळून दूर झाले नाहीत आणि मिठी पण काही क्षण तशीच राहिली. त्या काही क्षणांत तिला तिचे उत्तर मिळाले होते…!
“मी कशी तुझ्यासवे, चुकले वाट रे!”
काही चुकत नाहीये माझं… ही मिठी मला अशीच आयुष्यभर हवी आहे…
आरशामध्ये स्वतःकडे पाहात ती विचार करत होती… ‘आज इतके दिवस झाले श्रीशी ओळख होऊन, पण अजूनही तो आला की, धडधड वाढते हृदयाची! अजूनही तेच फिलिंग येतं जे अगदी सुरुवातीच्या भेटीला आलं होतं… अजूनही त्याच्या मिठीत विरघळून जाते मी!!’
तेवढ्यात श्रीच्या गाडीचा आवाज आला आणि ती भानावर आली. श्री येण्यापूर्वी प्रेम ऊतू जात होतं आणि तो आल्यावर मात्र एकदम गाल फुगवून बसली ती. श्रीरंग घरी आला, पण घरात सगळी शांतता होती. आत जाऊन पाहिलं तर, ती रागात पाठमोरी उभी होती. श्रीरंगने तिच्या खांद्यावर हात ठेवला तर, खांदा उडवून त्याचा हात झटकत तिने राग व्यक्त केला…
श्रीला याची सवय होती. काहीही कारण नसताना तिने रुसायचं आणि मग श्रीने तिला मनवायचं, हे असं याआधी पण बऱ्याचदा घडलं होतं. येतात तिला अधून मधून असे झटके…!
श्री तिच्यानजीक आला आणि कानाजवळ येऊन हळूच बोलला की, “किती वेळ झाला, तू पाठ करून उभी आहे… चेहरा का दाखवत नाहीये? दाढी, मिश खूप वाढल्या आहेत का तुझ्या?” श्रीच्या या वाक्यावर ती गरर्कन वळली… दोन्ही नाकपुड्या फुगल्या होत्या तिच्या… डोळ्यात तर आग होती, आग!
श्री म्हणाला, “अरे यार, आता तुला परत अगदी आधीपासून पटवावं लागेल. किती राग दिसतोय या डोळ्यात? पण, तूझे डोळे ना रागात खूप सुंदर दिसतात!”
त्याच्या या वाक्यावर ती सुखावली. तिला नेमकं हेच हवं असायचं की, श्रीने घरी आल्यावर तिला अटेंड करावं…
डोळ्यांची हलकेच उघडझाप करत ती श्री जवळ आली. तिच्या डोळ्यात बघत श्री परत तिला म्हणाला, “बघ, ही डोळ्यांची नाजूक हालचाल पण बरंच काही सांगून जाते बरं का! फक्त तू ना एक काम कर, ते भुवईवरचे केस आहेत ना, ते थोडे कमी कर म्हणजे तुझे डोळे दिसतील मला…”
“काहीही हं श्री! तू ना नेहमी असाच छळतो मला…” असं म्हणून तिने श्रीच्या छातीवर हलकेच मारायचा प्रयत्न केला, पण तिचा हात छातीला लागायच्या आधीच श्रीने तिला धरून जवळ ओढले आणि तिला मिठीत घेतले. तिचा रुसवा आता पळून गेला होता आणि ती श्रीच्या मिठीत डोळे बंद करून विरघळून गेली होती…
हेही वाचा – मैं जिंदगी का साथ निभाता चला गया…
ती नेहमी अशीच रुसते आणि मग फसते, श्रीच्या या लाघवी बोलण्याला!
मोबाइल – 9423100151


