आज कित्येक वर्षांनी दिनेशने आणि माँनी एकमेकांना समोरासमोर बघितले होते. ही भेट घडवून आणण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. व्हीलचेअरवर बसलेल्या माँ खूप बारीक झाल्या असल्या तरी चेहऱ्यावरचं तेज अजून कमी झालेलं नव्हतं. बाहेर बऱ्यापैकी थंडी असल्याने माँनी अंगाभोवती शाल गुंडाळली होती. क्षीण झालेले डोळे दिनेशकडे टक लावून बघत होते… पुढे काय होणार त्याची वाट बघत!
मी लांबूनच दिनेशला न्याहाळत होतो. माँचं खचलेलं आणि खंगलेलं रूप बघून, आजवर माँना न भेटण्याच्या त्याचा निश्चयाचा डोंगर अखेर मातृप्रेमाच्या सुरुंगाने फुटायला सुरुवात झाली होती. माझ्या हाताला फक्त वाट बघणं होतं. कधी… कधी……कधी…?
…आणि पुढच्याच क्षणी ‘माँSSS’ असा हंबरडा फोडून दिनेशने माँने घातलेल्या गाऊनला गच्च पकडून त्यांच्या मांडीवर डोके ठेवले. माँनी त्यांचे थरथरते हात महत्प्रयासाने दिनेशच्या डोक्यावर ठेवले. मलाही हुंदका फुटला… पण मी स्वतःला वेळीच सावरलं.
हेही वाचा – दुसऱ्यांना जगण्याची ताकद देणारा ‘अन्नसोहळा’
दिनेश आणि मी प्राथमिक शाळेपासून शालांत परीक्षेपर्यंत जिगरी दोस्त होतो. माझ्या आठवणीत असल्यापासून दिनेशच्या आई-बाबांचं कधी पटलंच नाही. पुढे पुढे प्रकरण विकोपाला गेले आणि आमची शालांत परीक्षा झाल्यानंतर त्याचे बाबा त्याला घेऊन नैरोबीला त्यांच्या मोठ्या भावाकडे कायमचे गेले. माँचं बालपण कलकत्त्याला गेले होते, म्हणून त्यांनीही बॅंकेकडून बदली मागून घेतली आणि मुंबई सोडून कलकत्त्याला स्थायिक व्हायचं ठरवलं. अधूनमधून माँ त्यांची खुशाली कळवायच्या आमच्या घरी… पण हळहळ व्यक्त करण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकत नव्हतो!
यथावकाश माँ निवृत्त झाल्या आणि तिथल्याच एका आश्रमात कायमच्या राहायला गेल्या. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवाळीत मी त्यांना आठवणीने फोन करायचो. एकदोनदा त्यांना भेटूनही आलो होतो. पण तेव्हा त्यांनी दिनेशला भेटण्यासाठी खूप हट्ट केला. त्यांचा कासावीस चेहरा नंतर कित्येक दिवस माझ्या डोळ्यांसमोरून हलतच नव्हता. दिनेशला मी फोन करून हे कळवायचो पण तो माँना न भेटण्याच्या निर्णयावर ठाम होता.
अशातच एक दिवस आश्रमातून आलेल्या फोनने मी हादरून गेलो. माँना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. मी तातडीने कलकत्त्याला गेलो खरा पण डॉक्टरांनी मला अंतिम सत्य सांगितलं… आणि दिनेशला शेवटचं भेटण्याची माँची इच्छा पूर्ण करण्याचं मी ठरवलं. माँच्या तब्येतीची सत्य परिस्थिती सांगणारं एक पत्र डॉक्टरांकडून घेतले आणि ते स्कॅन करून दिनेशला ईमेलवर पाठवून दिले. गेल्याच आठवड्यात सकाळी सकाळी फोन करून दिनेशने अखेर माँना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. भारतात परतण्याची तयारी त्याने सुरू केली… आज अखेर मी त्या दोघांना आमनेसामने आणलं. चार दिवसांनी दिवाळी होती.
माँ आणि दिनेश यांच्यात फक्त स्पर्शातून व्यक्त होणाऱ्या संवादाला शब्दांची गरज नव्हती, बिलकुल. माँनी मला खुणेनेच जवळ बोलावून घेतले आणि माझा हात पकडून त्या क्षीण आवाजात मला म्हणाल्या, “इतकी वर्षं मी ज्याची आतुरतेने वाट बघितली ती मातृत्वाची दिवाळी, माझ्या उरल्यासुरल्या आयुष्याची मिणमिणती पणती विझता विझता का होईना, पण मला आज साजरी करता आली ती फक्त तुझ्यामुळे! उद्या मला माझ्या हाताने दिनेशचं औक्षण करायचं आहे. एकदा का हातात ताम्हण घेऊन ते करताना त्याला डोळे भरून बघितले की, मग मी…”
दिनेशने लगेचच माँच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, “शपथ आहे माझी परत असं काही वेड्यासारखं बोललीस तर! मी आल्यापावली परत निघून जाईन…”
हेही वाचा – लढाई… व्यवहार की भावना?
माँ एव्हाना खूप थकल्या होत्या. सिस्टरने मग आम्हाला बोलणं थांबवायची विनंती केली आणि ती माँना घेऊन हळूहळू खोली बाहेर निघून गेली. मी दिनेशच्या खांद्यावर हात ठेवून त्याचं सांत्वन केले. माझ्या हातावर थोपटून तो मला म्हणाला, “मी ना बाबांचा झालो ना माँचा! दोन्ही बाजूंनी मायेला पारखा झालो. कॉलेज शिक्षण संपवून मी नोकरी धरली आणि बाबांचं घर सोडलं. पुष्कळ वेळा वाटलं माँना येऊन भेटावंसं… पण हिंमत नाही झाली! त्यावेळी बाबांसोबत नैरोबीला जायला तयार होऊन मी माँना खूप दुखावलं होतं. नंतर कोणत्या तोंडाने माँना येऊन भेटायचं, या विचाराने बेचैन व्हायचो. अशीच वर्षांमागून वर्ष निघून गेली. तुझा ईमेल आला आणि नंतर मात्र माझा निश्चय साफ ढासळला. आज नाही तर कधीच नाही माँना भेटू शकणार… या विचाराने मी पुरता हादरलो आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करून शक्य तेवढ्या लवकरच्या विमानाने इथे आलो. माँच्या मातृत्वाची दिवाळी जशी आज साजरी झाली, तसंच माझ्या मनांतील अपराधीपणाचा अंधार दूर होऊन अखेर समाधानाची दिवाळी साजरी झाली, ती केवळ तुझ्यामुळे.” असं म्हणून दिनेशने मला गच्च मिठी मारली.


