Thursday, January 15, 2026

banner 468x60

Homeअवांतर26/11 : उरल्या केवळ श्रेयसच्या आठवणी

26/11 : उरल्या केवळ श्रेयसच्या आठवणी

हिमाली मुदखेडकर

मला अजूनही आठवतोय तो दिवस… कसा विसरणार? सतरा वर्षे झाली आज! पण अजूनही ती आठवण… ती कळ शांत होत नाही… टीव्हीवरील न्यूज पाहून हात-पाय लटपटले माझे… ताबडतोब मामाला फोन लावला… तो उचलेना म्हणून मामीचा नंबर डायल केला… ती बिचारी तिच्या घरगुती कामात मग्न! तिला कशाचा सूतराम पत्ता नाही…

“मामी… अगं श्रेयस कुठाय?”

“सकाळीच गेलाय तो आज. लवकर जायचे होते त्याला… आज फॉरेन डेलिगेट्स यायचे होते म्हणे व्हिजिटसाठी…” ती निवांतपणे उत्तर देत होती!… आणि तिला कसं सांगू हे मला कळत नव्हतं..

आमचा श्रेयस… लहानपणापासून शेफ होण्याचे स्वप्न त्याचे… आणि त्यासाठी खूप मेहनतही घेतली होती त्याने… सर्वसामान्य मध्यमवर्गात जन्माला आला असला तरी, स्वप्न आकाशाला गवसणी घालण्याचे होते… स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर कलिनरी आर्ट्स यासारख्या सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या कोर्सला अ‍ॅडमिशन मिळवली त्याने…! एवढेच नव्हे तर, मेरिटच्या जोरावर स्कॉलरशिपही मिळवली… चार वर्षं भरपूर मेहनत घेऊन डिस्टिंक्शन घेऊन पास झाला…

‘ताज’ सारख्या मोठ्या हॉटेलमध्ये असिस्टंट शेफ म्हणून हल्लीच दोन-तीन महिन्यांपूर्वी जॉइन झालेला… फार मोठं स्वप्न पूर्ण झालं, या आनंदात होता तो आत्ता…! अगदी ‘आज मेरे जमीन पर नहीं हैं कदम…’ अशा अवस्थेत होता… तो खूश म्हणून आम्हीही त्याच्यासाठी खूश…!

हेही वाचा – आशीर्वाद सर अन् Best Reader किताब

आणि आज अचानक ‘ताज’वर दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी टीव्हीवर आली… माझ्या पायाखालची जमीन सरकली! ताबडतोब गिरगाव गाठले… तिथपर्यंत पोहोचणे फार कठीण गेले… रस्त्यात अनेक ठिकाणी पोलीस.. आडवाअडवी.. चौकशी…

घरी पोहोचल्यावर मामीला सगळी परिस्थिती समजावताना नाकी नऊ आले… तिचे तर हातापाय गळाले… तिला शेजारच्या काकूंच्या हवाली करून मामासोबत मी पुढली माहिती घेण्यासाठी ताजच्या दिशेने निघाले…

पण कसचे काय…! ताजपासून दोन किलोमीटर आधीच आम्हाला अडवले… बॅरिकेड्स टाकून रस्ताच बंद केला होता… दहशतवादी अजूनही सक्रिय होते… पोलीस, कमांडो, आर्मी ऑफिसर हे सगळे त्यांना तोंड देत होते… पण परिस्थिती आटोक्यात येत नव्हती… आत असणार्‍या लोकांच्या जीवाची हमी कोणीच देऊ शकत नव्हते…

रात्री आठ वाजता तिथे पोहोचलेले आम्ही, पहाटेचे 3 वाजत आले होते तरी, अधांतरी परिस्थितीत होतो, श्रेयसची काळजी करत चरफडत बसलो होतो… पहाटे साडेचारच्या सुमारास आतील काही पर्यटक आणि स्टाफला बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं. ती बाहेर आलेली मंडळी आमच्यापर्यंत पोहोचे तो 5 वाजलेले… त्यातील एक जण खूप जखमी आहे अशी बातमी आलेली…

हेही वाचा प्रेमाची पखरण करणारे ऋणानुबंध…

जीव खालीवर होत होता नुसता… ती ॲम्ब्युलन्स आमच्यापर्यंत आली… आणि जीवाचा थरकाप उडाला… श्रेयसला गोळी लागली होती… पोटात! बराच रक्तस्त्राव झालेला… गोळी लागून चार तास होऊन गेलेले… बोलण्याचे त्राण ही त्याच्यात उरले नव्हते… त्याला ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलला नेले… उपचार ताबडतोब सुरू झाले… प्रयत्नांची पराकाष्ठा केली डॉक्टरांनी.. देवाला सुचतील ते सगळे नवस बोलून झाले… पण दान पदरी पडायचे नव्हतेच… दोन दिवस झुंज देऊन श्रेयस गेला… कायमचा!

पर्यटकांपैकी एका दाम्पत्याला दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले… त्यांचे लहान बाळ… अगदीच वर्षभराचे.. भुकेने व्याकूळ होऊन रडत होते… त्या बाळाला दूध पाजले, हीच काय ती श्रेयसची चूक… तीच बेतली त्याच्या जीवावर…

26 /11च्या दहशतवादी हल्ल्यात अनेक जण शहीद झाले… त्यांना आपण श्रद्धांजली वाहतो… पण आमच्या श्रेयससारखे अनेक हकनाक बळी गेलेत… ज्यांची कुठेही नोंद नाही… ज्यांची कोणाला माहितीही नाही…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!