नितीन फलटणकर
(भाग – 1)
प्रसंग 1
स्टेजवर लख्ख प्रकाश…. खोलीत पसारा पडलेला…. बेडवरील चादर आर्धी खाली लोळतेय तर अर्धी बेडवर… पंखा सुरू… टीव्हीही सुरू…. पण तिथे मात्र कोणीच नाही… तितक्यात बाहेरून केतन आणि त्याचा मुलगा किरण दोघांचाही प्रवेश…
केतन : हातपाय धुवून घे… कपडे बदल मी जेवायला वाढतो.
किरण : नको मला… भूक नाही. मी डबा खाल्लाय शाळेत.
केतन : रहा उपाशी… (किरण धावत आत जातो… ताटात भाजी-पोळी वाढून घेतो. पटापट खायला लागतो.)
किरण : तू रागावू नको ना बाबा…!
केतन : मी रागोवलेलो नाही. पण तुला एंटरटेन करायला मला मुळीच वेळ नाही. पटकन खा. काही हवं का सांग, नाहीतर मी जरा पडतो.
किरण : नाही, मला काही नको.
केतन : ठीक. बेल वाजली तर, पटकन दार उघडू नको. मला सांग आधी.
किरण : हं… (किरण एकटाच फूटबॉल खेळायला लागतो.)
प्रसंग 2
मंद प्रकाश… बेडवर केतन झोपलेला… केतकी आणि किरण त्याची उठण्याची वाट पाहात आहेत… किरण सारखा केतनच्या बेड भोवती फेऱ्या मारतोय. केतकी त्याला असे करण्यापासून रोखतेय.
अखेर किरणचा संयम संपतो… तो केतनला उठवायचे म्हणून लडीवाळपणे त्याच्या अंगावर पडतो… त्यामुळे केतनचा पारा चढतो… तो त्याला ढकलतो…
केतन : गाढव आहेस का? दिसत नाही मी झोपलोय? आज सुट्टी आहे, झोपू दे मला… केतकी, समजत नाही का तुला? घे याला बाहेर…
किरण : बाबा, संडेला आपण खेळणार, असं तू प्रॉमिस केलं होतंस…
केतन : म्हणूनच मी तुला काही सांगत नाही. मी रात्री किती वाजता आलोय माहितीय का? ऑफिसमध्ये बॉसची कटकट आणि घरी तू अन् तुझी आई सुधरू देत नाही… जा बाहेर…
हेही वाचा – कन्फेशन कॉल…
प्रसंग 3
हॉलमध्ये लख्ख प्रकाश… केतन फोनवर बोलतोय… किरण नुकताच झोपेतून उठलेला. केतकीची ऑफिसला जाण्याची तयारी… घाईघाईत ती स्वयंपाकघरातून बाहेर येते… केतन आज तू याच्या शाळेत जाऊन येशील. पॅरेंट्स मीटिंग आहे आज!
केतन : मला जमणार नाही. आज मला लवकर जायचंय…
केतकी : अरे, कधी तरी बाप म्हणून काहीतरी जबाबदारी घेत जा…
(याच विषयावर आदळआपट होते, किरण केतकीला येऊन बिलगतो…)
किरण : आई, बाबा का भांडतो गं सारखा? माझं काहीच काम करत नाही… मी त्याला आवडत नाही का?
केतकी : नाही रे बाळा… अरे, त्याला खूप कामं असतात ना! त्याला वेळच नसतो रे… म्हणून त्याची चीडचीड होते. ऐक तुझ्या शाळेत मी जाऊन येते आज…
(किरण हिरमुसल्या चेहऱ्याने आत जातो आणि ब्रश करायला लागतो.)
प्रसंग 4
केतकी : मनू नीट राहा आत्याकडे, तिला त्रास देऊ नकोस… रात्री झोपशील ना रे आईला सोडून?
किरण : अगं हो गं… आत्याकडं कितीतरी मजा येते मला. तिकडे तबला आहे, बाग आहे, दादा आहे, काकाही खूप खेळतात माझ्यासोबत… दादासोबतही ते खूप खेळतात… मज्जा ना?
केतकी : नीट जा. मी आणि बाबा दोन दिवसांनी घ्यायला येतो तुला… बाय…
हेही वाचा – केतनचा वाढदिवस… भैरवी!
प्रसंग 5
केतकी : केतन, मला काही बोलायचंय तुझ्याशी!
केतन : मला वेळ नाही. आपण उद्या बोलूयात…
केतकी : नाही, आताच बोलायचंय… विषय तितकाच महत्त्वाचा आणि गंभीर आहे.
केतन : बोल पटकन… माझ्याकडे वेळ नाही. मला मीटिंगला जायचंय.
(इतक्यात केतनचा फोन वाजतो. तो हॉलमधून उठून जायला लागतो. तितक्यात केतकी रागाने त्याच्यावर धावून जाते. त्याच्या हातातून फोन ओढून घेते.)
केतकी : रागाने तुला समजत नाही का मी काय म्हणतेय? महत्त्वाचं बोलायचंय म्हटल्यावरही तू इतकं कसं क्यज्युअली घेतोय? तुला कधी तुझ्या कामातून घरासाठी वेळ मिळत नाही… कधी किरणचं काहीच करत नाहीस… तुला कुटुंब नकोच आहे का? तसं तरी स्पष्ट सांग!
(केतकीचा रुद्रावतार पाहून केतन घाबरला… जरा भानावर आला. केतकीने फोन घेतल्यानंतर चढलेला त्याचा पारा पार उतरला होता… आता तो सरेंडरच्या मूडमध्ये होता. दुसरीकडे केतकीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते.)
केतन : सॉरी, तुला टाळायचं नव्हतं… प्लीज, काय झालंय सांगशील का?
(केतकीच्या हातातून फोन बाजूला घेत तो तिला कवेत घेतो. तशी केतकी त्याला दूर करते.)
केतकी : खूप झालं आता… किती सहन करायचं? किरणचा काय दोष? त्याचा बाप कधी होशील तू? मी देखील नोकरी करते. मी देखील थकते. मी देखील मेहनत करते. पण मी कुटुंबाला वेळ देते. मी या चार भिंतींना आपलं घर समजते… तुला काहीच कसं वाटत नाही? माझ्याबद्दल, किरणबद्दल! इतका कसा निष्ठूर बनलास तू? हल्ली किरण किती शांत शांत झालाय कळतंय का तुला? अरे, इतकासा होता तो तळहातावर मावायचा. आता किती मोठा झालाय… पण तुझ्यापासून तो दूरच आहे… तू दूर ठेवलंस त्याला. का?
केतन : अगं, असं काही नाही. कामाच्या नादात आणि टेन्शनमध्ये मला काही सूचत नाही. घरी आल्यावर डोक्यावरचा ताण इतका नकोसा होतो की, वाटतं आपण जन्मालाच आलो नसतो तर… तर किती बरं झालं असतं! 24 तास काम, काम अन् काम! जबाबदारी माणसाला सारं काही विसरायला भाग पाडते केतकी…. तुला नाही समजणार ते!
केतकी : छान. म्हणजे मी ऑफिसमध्ये काय करते, असं वाटतंय तुला? कामाचा ताण फक्त तुलाच आहे का? तू घरी आल्यावर भाजी निवडतोस की स्वयंपाक करतोस? का महिन्याचा किराणा भरतोस? अरे आपल्या लग्नाला 10 वर्षं होत आलीत, मी तेव्हापासून आजपर्यंत कधी माझ्यासाठी वेळ दिलाय का? घरी कधी सुट्टी घेतलेली पाहिलीस का तू?
केतन : मला सगळं मान्यय. पण मला कुणी समजून घेणारेय का? एक बाप म्हणून मलाही कुणी समजून घेईल का? बाप रागावतो, चुकल्यावर बोलतो म्हणून तो मुलांना व्हिलन वाटतो. पण तो मुलांना सुधरवण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच तर पुढची पिढी वाया जाण्यापासून वाचते. हे कुणालाच कसं कळत नाही?
केतकी : अरे, आता तू बाप झालायस.. आता तू कुणाला तरी समजून घेणं गरजेचं आहे. तुलाच का दरवेळी कुणीतरी समजून घ्यावं? तुला माहितीय किरण किती हळवा झालाय? खूप छळतो तो मला, तू घरी नसलास की. सारखं मला त्याच्याशी खेळावं लागतं. कधी घेतलाय का तू त्याचा अभ्यास? कधी त्याला आंघोळ घातलीस का? कधी आठवणीने त्याच्या आजारपणात त्याला औषधं दिलीस तू? तुला काय वाटलं? तो लहान आहे म्हणून तो सारं सहन करेल? तुझ्या वागण्याकडे दुर्लक्ष करेल? तू खूप लांब गेलाय आमच्यापासून, किरण पासून… तुला माहितीय तो मला काय विचारत होता परवा? आई आपल्याला बाबा बदलता येतील का? मला बाबा बदलायचाय…
क्रमश:


