वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
म्हणे जें जें हा अधिष्ठील। तें आतां आरंभींच यया फळेल । म्हणोनि सांगितला न वचेल । अभ्यासु वायां ॥151॥ ऐसें विवरोनियां श्रीहरी । म्हणितलें तिये अवसरीं । अर्जुना हा अवधारीं । पंथराजु ॥152॥ तेथ प्रवृत्तितरूचा बुडीं । दिसती निवृत्तिफळाचिया कोडी । जिये मार्गीचा कापडी । महेशु आझुनी ॥153॥ पैं योगिवृंदें वहिलीं । आडवीं आकाशीं निघालीं । कीं तेथ अनुभवाचां पाउलीं । धोरणु पडिला ॥154॥ तिहीं आत्मबोधाचेनि उजुकारें । धांव घेतली एकसरें । कीं येर सकळ मार्ग निदसुरे । सांडुनियां ॥155॥ पाठीं महर्षी येणें आले । साधकांचे सिद्ध जाहाले । आत्मविद थोरावले । येणेंचि पंथें ॥156॥ हा मार्गु जैं देखिजे । तैं तहान भूक विसरिजे । रात्रिदिवसु नेणिजे । वाटे इये ॥157॥ चालतां पाऊल जेथ पडे । तेथ अपवर्गाची खाणी उघडे । आव्हांटलिया तरी जोडे । स्वर्गसुख ॥158॥ निगिजे पूर्वींलिया मोहरा । कीं येईजे पश्चिमेचिया घरा । निश्चळपणें धनुर्धरा । चालणें एथिंचें ॥159॥ येणें मार्गें जया ठायां जाइजे । तो गांवो आपणचि होइजे । हें सांगो काय सहजें । जाणसी तूं ॥160॥ तेथ म्हणितलें देवा । तरी तेंचि मग केव्हां । कां आर्तिसमुद्रौनि न काढावा । बुडतु जी मी ॥161॥ तंव कृष्ण म्हणती ऐसें । हें उत्संखळ बोलणें कायसें । आम्हीं सांगतसों आपैसें । वरि पुशिले तुवां ॥162॥
हेही वाचा – Dnyaneshwari : देवकीया उदरीं वाहिला, यशोदा सायासें पाळिला…
अर्थ
श्रीकृष्ण (आपल्यापाशी) म्हणाले की, हा अर्जुन ज्या ज्या कर्माचे आचरण करेल, ते ते याला आरंभालाच फळास येईल. म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही. ॥151॥ (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,) श्रीकृष्णाने असा दूरवर विचार करून त्यावेळेला म्हटले, अर्जुना, हा सर्वोत्कृष्ट मार्ग ऐक. ॥152॥ या मार्गामध्ये प्रवृत्तिरूप झाडाच्या बुडालाच निवृत्तिरूप कोट्यवधी फळे दिसत आहेत. (म्हणजे ज्या मार्गाचे आचरण करावयास लागले असता, मोक्षरूपी फळ मिळते) आणि या मार्गाचे श्रीशंकर अद्यापपर्यंत यात्रेकरू आहेत. ॥153॥ योग्यांचे समुदाय आडव्यातिडव्या मार्गाने मूर्ध्निआकाशाकडे सत्वर जावयास निघाले आणि हे समुदाय अनुभवाच्या पावलांनी जाता जाता तो मार्ग सुलभ झाला. ॥154॥ त्यांनी इतर सर्व अज्ञानाचे मार्ग टाकून आत्मज्ञानाची सरळ मार्गाने एकसारखी धाव घेतली. ॥155॥ नंतर महर्षी याच मार्गाने साधकाचे सिद्ध झाले आणि याच मार्गाने आत्मज्ञानी पुरुष मोठेपणा पावले. ॥156॥ या मार्गाची ओळख झाली असता तहानभुकेची आठवण रहात नाही. या रस्त्यावर रात्र आणि दिवस यांची कल्पना येत नाही. ॥157॥ या मार्गाने जात असता, जेथे पाऊल पडेल, तेथे मोक्षाची खाणच उघडते आणि या मार्गाचे आचरण करणारा जरी भलत्या आडमार्गाला लागला, तरी त्यास स्वर्गसुख मिळते. ॥158॥ अर्जुना, (या मार्गात) पूर्व दिशेच्या मार्गाने निघून पश्चिम दिशेच्या घरास यावे, असे आहे. मनाचा स्थिरपणा हेच या मार्गाने चालणे आहे. ॥159॥ या मार्गाने ज्या मुक्कामास पोहोचावयाचे तो गावच आपण होतो, हे कशास सांगावयास पाहिजे? तुला ते सहजच कळेल. ॥160॥ तेव्हा (अर्जुन) म्हणाला, कृष्णा, (तर मग) तेच तुम्ही केव्हा करणार? मी उत्कंठारूप समुद्रात बुडत असताना त्यातून तुम्ही मला काढू नये काय? ॥161॥ तेव्हा कृष्ण म्हणाले, असे हे उतावीळपणाचे भाषण कशाकरिता? आम्ही आपण होऊनच सांगत होतो, आणखी त्यात तू तेच विचारलेस. ॥162॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जी तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्म मिया होईजेल…


