Thursday, January 15, 2026

banner 468x60

Homeललितचॅलेंज.. अहंकार मोडून काढणारं!

चॅलेंज.. अहंकार मोडून काढणारं!

हेमाचा मेकअप सुरू होता, पंढरीदादा तिला अस्वली बनवत होते. अस्वली… एका आदिवासी बेटाची राणी… उर्वरित जगाचा फारसा संपर्क नसलेले बेट… राणीसह सारेच जंगली… दाट जंगल आणि त्यात वाहाणारे झरे… मोठमोठे वृक्ष, वृक्षाच्या ढोली… असंख्य रानटी प्राणी, सरपटणारे असंख्य जीव… प्राणी मारून खाणारी माणसे… बोट भरकटल्यामुळे दोन प्रवासी या बेटावर आलेले असतात.. ते प्रवासी आणि बेटावरील आठ जंगली माणसे आणि त्त्यांची राणी अस्वली…

या नाटकात राणीची म्हणजेच अस्वलीची भूमिका हेमा करणार होती. हेमाचा मेकअप सर्वात कठीण, म्हणून मुख्य मेकअपमन पंढरीदादा स्वतः तिचा मेकअप करत होते, त्त्यांचे दोन सहकारी इतरांचा मेकअप करत होते. हेमाचा मेकअप संपताच जयाने तिच्या अंगावर अस्वलीचे कपडे चढवले… पायात, हातात कडी घातली… कमरेला चामड्याचा जाड पट्टा बांधला… डोक्यावर मोरपिसे खोवलेला मुकुट चढविला… राणी अस्वलीची तयारी झाली आणि स्पर्धेच्या नाटकाची पहिली बेल खणखणली!

स्टेजवर गडबड होती… हा या नाटकाचा पहिलाच प्रयोग आणि राज्य नाट्य स्पर्धेत सादर होणार होता! संस्था मान्यवर, आजपर्यंत चार वेळा अंतिम स्पर्धेत पहिला नंबर मिळविलेली, मुंबईतील एक बलाढ्य कंपनी आणि त्याचा कला विभाग दरवर्षी स्पर्धेत भाग घेत होता. याकरिता बऱ्याच होतकरू कलाकारांना या कंपनीत नोकरी देण्यात आली होती. आर्थिक पाठबळ होतच.. उत्तम दिग्दर्शक कंपनीत नोकरीला होते, सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाट्यलेखक विनायकराव याच कंपनीत! विनायकराव हे नाव गाजत होते… स्पर्धेच्या नाटकात आणि व्यवसायिक रंगभूमीवर सुद्धा!! नवनवीन प्रयोग त्यांच्या नाटकात दिसत. कलाकारांना चॅलेंज असे. पण कंपनीत अनेक उत्तम कलाकार होते… त्यामुळे स्पर्धेत नाटक पहिले किंवा दुसरे येतच असे.

हेमा स्टेजवर आली. दिग्दर्शक विकास प्रकाश व्यवस्था पाहात होता… हे काम पाहणाऱ्या विराजला सूचना करत होता. या नाटकात लाइव्ह म्युझिक होतं, त्यामुळे ढोल, ड्रम, ताशे, तुतारी, लेझीम घेऊन वादक विंगेत तयार होते…

दुसरी बेल झाली आणि प्रेक्षक आणि स्पर्धेचे तीन परीक्षक जागेवर येऊन बसले. स्टेजची पूजा झाली होती. सर्व कलाकार स्टेजवर आले. एकमेकांना शुभेच्छा देऊ लागले… हेमाने सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या आणि ती मधून थोडा पडदा उघडून प्रेक्षगृहात पाहू लागली… प्रेक्षागृह प्रेक्षकांनी भरलेले होते. पहिल्या रांगेत नाटकाचे दर्दी बसले होते आणि मधोमध होते, नाटकाचे लेखक विनायकराव..

विनायक सरांना पहाताच हेमाच्या काळजात धडधडले… तसे नाटक सुरू होताना प्रत्येक कलाकारांचे काळीज धडधडते.. पण हेमाचे जरा जास्तच… त्याला कारण पण तसेच होते…   दोन महिन्यांपूर्वी विनायक सरांनी नवीन नाटक विकासच्या हातात दिले होते. विकास हा या ग्रुपचा अनुभवी आणि यशस्वी दिग्दर्शक… विकासने नाटक वाचले. विनायक सरांनी या वर्षी अत्यंत उत्तम, पण करायला कठीण असे नाटक लिहिले होते. विकास आणि त्याच्या सहदिग्दशकाने पात्रानुसार कलाकार ठरवले… तसे बहुतेकजण ग्रुपचे अनुभवी कलाकार होतेच पण अत्यंत महत्त्वाची राणीची भूमिका दिली हेमाला!

आणि याचमुळे विनायक सर आणि विकास यांचे वाजले… चिडलेले विनायकराव विकासला सांगत होते, “विकास, तू दिग्दर्शक म्हणून ग्रेट आहेस, पण हे काय चालवले आहेस?”

“काय झालं सर?”

“अरे, राणीची भूमिका त्या हेमाला दिलीस? या नाटकातील राणी कशी हवी, जंगलात राहणारी… तसा वेष घातलेली… क्रूर… कुणाचाही जीव घेणारी… कुस्ती करणारी… शिव्या देणारी… कच्चे मांस खाणारी… आणि ही हेमा माहीममध्ये राहणारी पांढरपेशी बाई… पुणेरी शुद्ध मराठी अन् नाजूक आवाजात बोलणारी! ही आदिवासी नृत्य करू शकेल? कुस्ती करेल? दारू पिण्याची ॲक्टिंग करेल?”

हेही वाचा – लक्ष्मीव्रत… जहिराची कहाणी

“सर्व काही करेल विनायक सर, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा… दोन वर्षांपूर्वी तिने झुंज नाटकातील रखमा केली होती… आठवतं?”

“आठवतं… अरे, झुंजमधील रखमा केवळ अर्धातास स्टेजवर असते… या नाटकात ही राणी अस्वली अडीच तास… इथे नाच आहेत, कर्कश ओरडणं आहे…”

“हेमा सर्व करेल, माझा तिच्यावर विश्वास आहे…”

रागाने विनायक सर बाहेर पडले. खरंतर, या आधीच्या त्यांच्या प्रत्येक नाटकाच्या तालमींना ते हजर असत, पण या नाटकाच्या एकाही तालमीला ते आले नाहीत! मागील आठवड्यात दोन रंगीत तालमी केल्या… विकासने फोन करून बोलावले, पण विनायक सर आले नाहीत… पण आज नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला विनायक सर पहिल्या रांगेत बसले होते.

विकासचे आणि विनायक सरांचे तू तू मी मी झाल्याचे दुसऱ्या दिवशी हेमाच्या कानी आले अन् ती विकासला भेटायला गेली…

“’विकास सर, मला अस्वलीची भूमिका देण्यावरून लेखक नाराज आहेत असे समजले. त्त्यांचा माझ्यावर विश्वास नसेल तर, तुम्ही दुसरी कलाकार निवडा…”

“नाही हेमा, ही भूमिका तूच करायची. या आधी दोन नाटकांत तू काम केलंस… चांगल केलंस! तू आहेस पांढरपेशी… याचा अर्थ असा नाही की, अस्वलीची भूमिका करू शकणार नाहीस. कलाकाराला चॅलेंज स्वीकारावं लागतं. तो जसा दिसतो तशीच त्याने भूमिका केली तर, त्याचे कौतुक कसले? दिलीप प्रभावाळकरांनी अंडीवाला स्टेजवर उभा केला… खरोखरच्या आयुष्यात ते किती साधे दिसतात… पण स्टेजवर? अस्वली हे तुझ्यासाठी चॅलेंज आहे हेमा… अशी भूमिका नटाला आयुष्यात कवचितच मिळते. तुला ती मिळाली आहे, हे चॅलेंज आहे तुझ्यासाठी! या भूमिकेसाठी लोकांनी तुला आठवायला हवं…”

“होय विकास सर, तुम्ही माझ्याकडून मेहनत करून घ्या… मी चॅलेंज स्वीकारते आहे!”

हेमाने दीर्घश्वास घेतला आणि ती अस्वलीच्या भूमिकेसाठी सज्ज झाली. तिच्या कानात विकास सरांचे शब्द ऐकू येत होते… “हेमा, स्टेजवरील कलाकाराला चॅलेंज वाटावे, अशी भूमिका एकदाच मिळते. ती तुला अस्वलीच्या भूमिकेमुळे मिळणार आहे… स्वीकार हे चॅलेंज!”

नाटक सुरू झाले… दुसऱ्या प्रवेशात अस्वलीची एन्ट्री… पहिला प्रवेश मनासारखा होत नव्हता म्हणून विंगेत विकास चरफडत होता… पण दुसऱ्या प्रवेशात रानटी, जंगली अस्वली आणि तिच्या बेटावरील लोकांनी स्टेजवर प्रवेश केला आणि नाटकाचा टेम्पो वर चढला… वर चढला आणि तो चढतच राहिला… यात अस्वलीचे मॉबसह नृत्य होते… मारामारी होती… तलवारबाजी होती… खटकेबाज सवांद होते… यात कुठेही हेमा कमी पडली नाही. उलट, नेहेमी हेमाला पाहाणारे आश्रयचकित होत होते…

दुसऱ्या अंकात अस्वलीचे वेगळे रूप होते… ती बेटावर आलेल्या एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. त्या तरुणाकडून तिला रिस्पॉन्स नव्हता. त्यावेळी तिच्या मनाची झालेली अवस्था हेमाने उत्तम दाखवली… नाटक कमालीचे रंगत होते. सर्वच कलाकार उत्तम अभिनय करत होते. मनाला खिळवून ठेवणारे नाटक संपते… तेव्हा काहीतरी विलक्षण पाहिल्याचे समाधान घेऊन प्रेक्षक बाहेर पडत होते.

नाटक संपले आणि प्रेक्षकांचा लोंढा आत घुसला. प्रत्येकजण दिग्दर्शक विकास आणि अस्वली झालेल्या हेमाचे कौतुक करत होता. त्यात नाट्यसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळी होती. हेमाचा नवरा हेमंत, कन्या अश्विनी यांच्या डोळ्यातून कौतुक आणि अभिमान ओसंडून वाहात होता… हेमाला एवढे कौतुक अपेक्षित नव्हते.. नाटकाचा दिग्दर्शक विकास तर तिचे कौतुक करून करून थकला होता, पण…

पण ती वाट पहात होती, नाटकाच्या लेखकाची.. विनायक सरांची! ज्यांनी तिच्या भूमिकेला विरोध केला होता. पुन्हा पुन्हा तिचे लक्ष मेकअपरूमच्या दाराकडे जात होते.. तिला वाटत होते, सर चटकन आत येतील आणि हात हातात घेतील… मग आपण सरांच्या पायाला हात लावून वंदन करू.

रात्रीचे साडेबारा वाजले… तशी मंडळी पांगली. हेमा नवऱ्याच्या गाडीतून घरी जायला निघाली. नाटकाला कोण कोण आले होते आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या, हे कन्या आणि नवरा सांगत होते… तिच्या मोबाइलवर मेसेज आणि कॉल्स येतच होते… पण त्यात विनायक सरांचा मेसेज किंवा कॉल नव्हता.

हेमा घरी पोहोचली. कपडे बदलून दोन घास खाऊन बेडवर पडली. आज दिवसभर दगदग झाली होती… नाटकाचा पहिला प्रयोग म्हणजे वार्षिक परीक्षाच असते… केवढा ताण, टेन्शन… पण नाटक उत्तम झाले आणि प्रेक्षकांच्या कौतुकाचा पूर आला म्हणजे एवढ्या दोन महिन्यांत केलेल्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटते… हे नेहमीचेच असते. पण आज हेमाला त्यापेक्षा नाटकाच्या लेखकाकडून कौतुकाचे दोन शब्द हवे होते… पण नाटक संपताच सर निघून गेलेले!

हेमाला झोप येईना… विनायक सरांना मी केलेली अस्वली आवडली नाही का? तसा त्त्यांचा पहिल्यापासून मला अस्वलीची भूमिका द्यायला विरोध होताच! पण विकासने मलाच भूमिका दिली… विनायक सरांनी आपले मत द्यायला हवे होते… ही चुटपुट लागून राहिली मनाला…

दुसऱ्या दिवशी हेमाला मेसेज, फोन येतच होते… ती सर्वांचे कौतुक स्वीकारत होती. पण तिला हवा होता तो फोन किंवा मेसेज आला नाहीच… संध्याकाळी विकासचा फोन आला, तेव्हा तिने विचारले…

“विकास सर… विनायक सर भेटलेले काय? किंवा फोन?”

“त्यानी रात्री मेसेज पाठविला होता, नाटक छान झाले… सर्वांनी कामे चांगली झाली… असा.”

“एवढेच? अस्वलीच्या कामाबद्दल?”

“काहीच नाही गं.. जाऊदे ना… बाकी सर्वांनी म्हणजे नाट्यक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तुझे तोंडभरून कौतुक केले आणि काय हवंय? बघू. रिझल्ट काय येतो?”

…आणि स्पर्धेचा निकाल आला, नाटक अंतिम फेरीत गेलं! आनंदी आनंद… पण विनायक सरांचा मेसेज, फोन नाही.

अंतिम फेरीसाठी पुन्हा नाटकाच्या तालमी सुरू झाल्या… धोबीतलावच्या उघड्या नाट्यमंदिरात  झालेल्या अंतिम फेरीत हेमाने अस्वली गाजवली… मुंबईतील सर्व वर्तमानपत्रात कौतुकावर कौतुक.. अंतिम फेरीत महाराष्ट्रभरातून आलेल्या एकवीस नाटकांतून ते नाटक पहिले! नाट्यलेखनाचा पुरस्कार विनायक यांना… सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार विकासला.. आणि अस्वलीच्या अविस्मरणीय भूमिकेसाठी हेमाला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार!

हेही वाचा – लक्ष्मीव्रत… जहिराच माझी ‘छकुली’

नाटकाचा जयजयकार सुरू होता. हेमाचे पण कौतुक सुरूच होते… शासनाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात तिला विनायक सर दिसले… तिच्या पुढील रांगेत बसले होते… मंत्र्यांच्या हस्ते त्यांनी पारितोषिक स्वीकारले… पाठोपाठ हेमाने पण पदक स्वीकारले… पण विनायक सर काहीच बोलले नाहीत. जे हवे होते ते हेमाला मिळत नव्हते…

या नाटकाचे अजून पंचवीस प्रयोग महाराष्ट्रभर झाले.. आणि नाटक थांबले. मग इतर अनेक ग्रुप्स हेच नाटक करत राहिले.

हेमाने पुढील काही वर्षांत आणखी तीन नाटके स्पर्धेसाठी केली, पण अस्वलीसारखी भूमिका तिला परत मिळाली नाही. काही बड्या निर्मात्यांनी तिला व्यावसायिक नाटकांबद्दल विचारले, पण हेमाने आपल्या संसाराला आणि नोकरीला प्राधान्य दिले. उत्तम संसार केला… मुलीला डॉक्टर केले… नवऱ्याबरोबर जग फिरली. नवरा निवृत्त झाला अन् एका वर्षाने ती निवृत्त झाली.. मुलीचे लग्न झाले.

निवृत्तीनंतर ती बऱ्याच वेळा गॅलरीत बसायची तेव्हा तिच्या डोळ्यासमोर तिचा भूतकाळ यायचा… उत्तम कंपनीत नोकरी. सुस्वभावी नवरा. हुशार मुलगी. उत्तम आर्थिक स्थिती. पुण्यात घर… आणि तिला अचानक अस्वली आठवायची! आपण अस्वली गाजवली. मग ती पेपरतील कात्रणे काढायची… आणि तिला चुटपुट पण लागायची.. नाटकाचे लेखक विनायक सर यांनी मात्र अस्वलीबद्दल काहीच…

आणि नेहेमी यायचा तसा विकासचा फोन आला.

“हेमा.. काल विनायक सरांच्या मुलाचा फोन आलेला. सर हल्ली सांगलीला राहतात मुलाकडे… सर जास्त आजारी आहेत म्हणे. त्यांना सर्व नाटकाच्या ग्रुपला भेटायची इच्छा आहे. आपला सर्व ग्रुप जातोय त्यांना भेटायला… तू येणार काय? कारण सरांचा मुलगा म्हणत होता, त्यांना हेमाला भेटायचंय म्हणून…!”

“अरे, मी हल्ली सरांची आठवण काढत असतेच आणि सरांचा फोन… हो मी आणि माझा नवरा येतोय.”

“मग येत्या रविवारी सांगलीला जायचंय.. मी गाडी सांगितली आहे.. सकाळी लवकर निघायचं आणि परत रात्रीपर्यंत मुंबई…”

“होय. आमची दोघांची जागा ठेव…”

रविवारी सकाळी टेम्पो ट्रॅव्हल्सने बारा लोकांचा नाटकाचा ग्रुप निघाला. आता सर्वजण कंपनीतून निवृत्त झाले होते आणि आजी, आजोबा पण झाले होते… आज पुन्हा नाटकाचा विषय… त्या कडक तालमी.. पहिला नंबर… हेमा नव्हे अस्वली… अभिनयाचे प्रथम पारितोषिक.. मान्यवरांचे कौतुक… हेमा मात्र अलिप्त होती. सर्वांनी कौतुक केलं हे खरे, पण, एक माणूस.. आणि तोच आजारी आहे म्हणून त्याला भेटायला जातोय…!

दुपारपर्यंत गाडी सांगलीत पोहोचली. नाटकाचा ग्रुप विनायक सरांना भेटायला वरच्या मजल्यावर गेला… सर वाट पाहात होते. बेडवर लोडाला टेकून बसवले होते… नाटकाचा ग्रुप पहाताच त्यांच्या डोळ्यात चमक आली. सर्वजण त्यांच्या अवतीभवती बसले… हेमा थोडी लांब उभी होती… तिच्याकडे पाहात कापऱ्या आवाजात विनायक सर बोलू लागले…

“तुम्हाला मी मुद्दाम बोलावलं. माझं आयुष्य थोडं राहिलंय याची मला कल्पना आली आहे. त्या आधी जे त्या वेळीच बोलायला हवे होते, ज्याची रुखरुख माझ्या मनाला आयुष्यभर राहिली, ती गोष्ट कबूल करायला हवी. विकास, माझे नाटक तू करायला घेतलंस आणि अस्वलीची भूमिका हेमाला दिलीस, त्याला मी विरोध केला. मी तालमींना पण आलो नाही. कारण अस्वलीची अवघड भूमिका हेमा करूच शकणार नाही, असे मला वाटले होते. पण… पण… मी मान्य करतो, त्या नाटकात हेमाने जी अस्वली केली, त्याला तोड नाही!”

“काय?” हेमा जवळजवळ किंचाळलीच!

“होय हेमा, तुझी भूमिका मी दोन्ही स्पर्धेत पाहिली. अंतिम स्पर्धेत मी आलो होतो. पण पण… कुणाला कल्पना न देता शेवटच्या रांगेतून मी नाटक पाहिलं. हे नाटक मग अनेकांनी केल. अनेक स्पर्धेत त्याचा नंबर आला… पण हेमासारखी अस्वली, कुणालाच जमली नाही…

रडत रडत हेमा म्हणाली, “हे त्याचवेळी का सांगितलं नाही सर? मी वेड्यासारखी तुमच्या प्रतिक्रियेची वाट पहात होते… किती दिवस… किती वर्षे वाट पहिली मी…!”

“क्षमा कर मला हेमा. यालाच अहंकार म्हणतात… आपले मत चुकीचे होते, हे प्रांजळपणे मान्य करायला मोठे मन लागते अन् ते माझ्याकडे नव्हते.”

“पण सर त्यामुळे त्या नाटकाचा आणि त्याच्या यशाचा आनंदच घेऊ शकले नाही मी… आजही मी एकटीच असते आणि माझा भूतकाळ आठवते, काय मिळाले आणि काय नाही याचा हिशेब चालू असतो मनात… तेव्हा जे मिळाले त्यात मी समाधानी आहे. पण अस्वलीसारखी कवचितच मिळालेली भूमिका… त्याचा लेखक जेव्हा अबोल राहातो, तेव्हा यातना होतात सर! लेखकाच्या दृष्टीने आपण कमी पडलो का… हा प्रश्न आयुष्यभर सतावत होता सर…”

“चूक झालीच माझी हेमा. कदाचित नाट्यलेखक म्हणून जो माझा जयजयकार होत होता त्याकाळी, त्याचा कैफ असेल कदाचित… पण… पण.. आयुष्याच्या संध्याकाळी आपली चूक कबूल केलीच पाहिजे…”

बोलता बोलता विनायक सरांना ग्लानी आली. त्यांच्या मुलाने त्यांना व्यवस्थित झोपवले… त्यांना भेटून मंडळी बाहेर आली.

मुंबईचा परत प्रवास करताना सर्व मंडळी गप्प गप्प होती. विनायक सरांनी एकापेक्षा एक नाटकें या ग्रुपला दिली होती… अशी नाटकें लिहिणारा दुसरा नाट्यलेखक नाही. विकास हेमाला म्हणाला,

“शेवटी लेखकाने मान्य केलेच… त्या यशात तीच एक त्रुटी होती… अस्वलीची भूमिका तुला देताना मी एक चॅलेंज स्वीकारले होते आणि तू पण भूमिकेचे चॅलेंज घेतले होतेस… आपण ते चॅलेंज पूर्ण केले…”

मोबाइल – 9307521152 / 9422381299

प्रदीप केळुस्कर
प्रदीप केळुस्कर
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!