Thursday, January 15, 2026

banner 468x60

Homeललितधुळवड… आयुष्यात नव्याने रंग भरणारी!

धुळवड… आयुष्यात नव्याने रंग भरणारी!

दीपक तांबोळी

आरवने घड्याळात पाहिलं. सकाळचे आठ वाजले होते. त्याच्या मित्रांचा अजून पत्ता नव्हता. खरं म्हणजे ते येणार असं काही ठरलं नव्हतं, पण दरवर्षीप्रमाणे ते येतील मग रंगांची आतषबाजी सुरू होईल, असं त्याला वाटत होतं.

“आरव आंघोळ करून घे रे…”

किचनमधून आई ओरडली. तिने असं ओरडायची ही तिसरी वेळ होती. आरवने तिला काहीही उत्तर दिलं नाही. आपण मित्रांची वाट बघतोय, हे तो तिला कोणत्या तोंडाने सांगणार होता? कारण गेल्या कित्येक महिन्यांत कुणीही मित्र त्याला भेटायला आला नव्हता किंवा तो स्वतःही कुणाला भेटायला गेला नव्हता. पण आज कुणीतरी येईल, ही आशा सोडवत नव्हती म्हणून तो दरवाजाकडे डोळे लावून बसला होता.

नऊ वाजले तसं त्याला निराशेने घेरलं. अजूनही त्याचे मित्र आले नव्हते आणि त्यांनी का यावं? आरवने बारावी नापास झाल्यानंतर सगळ्या मित्रांशी संबंध तोडून टाकले होते. त्याच्या आईवडिलांनी, मित्रांनी त्याला किती समजावलं होतं की, नापास होण्यात त्याची काहीही चूक नव्हती… आणि ते खरंच होतं. आरव कॉलेजमधला सर्वात हुशार विद्यार्थी! तो मेरीटमध्ये येणार हे सगळ्यांनीच गृहीत धरलं होतं, पण परीक्षेच्या पाच दिवस अगोदर आरव डेंग्यूने आजारी पडला. डेंग्यूचं निदान झालं तसं डॉक्टरांनी त्याला ॲडमिट व्हायला सांगितलं. आरवने नकार दिला. परीक्षा ऐन तोंडावर असताना ॲडमिट होणं, त्याला शक्यच नव्हतं. पण पहिल्या पेपरच्या आदल्या दिवशी आरव तापाने फणफणला. त्याच्या वडिलांनी धावपळ करून त्याला ॲडमीट केलं. आरवची अवस्था क्रिटिकल झाली. त्याला आयसीयूमध्ये ठेवावं लागलं. देवाची कृपा म्हणूनच तो वाचला…

हेही वाचा – कडक उन्हाच्या झळा अन् माणुसकीचा ओलावा

वीस दिवसांनी तो घरी परतला तेव्हा परीक्षा संपली होती. निकाल लागला. आरव अर्थातच नापास झाला. आरवचे अगदी सामान्य बुद्धीमत्तेचे मित्रमैत्रिणीही पुढे निघून गेले. कुणी इंजीनियरिंगला गेलं, कुणी मेडिकलला… कधीही नापास न झालेला आणि करिअरची मोठमोठी स्वप्नं पहाणारा आरव डिप्रेशनमध्ये गेला. घरी आलेल्या मित्रांनाही तो भेटेनासा झाला. त्यांचे फोन उचलेनासा झाला. मग काही दिवसांनी फोन येणंही बंद झालं. ऑक्टोबरला तो परत परीक्षेला बसला, पण त्याचं अभ्यासातलं मन उडून गेलं होतं. मेरीटचा विद्यार्थी होता तो, पण चक्क चार विषयांत नापास झाला. आईवडिलांच्या आग्रहाखातर आता परत मार्चमधल्या परीक्षेसाठी त्याने फॉर्म भरला होता. पण आताही त्याचं अभ्यासात मन लागत नव्हतं. याही परीक्षेत आपण नापासच होणार, अशी भीती त्याला वाटू लागली होती. त्याने तो अधिकच निराशेच्या गर्तेत जाऊ लागला…

साडेनऊ झाले तशी त्याच्या आईने त्याला पुन्हा हाक मारली… “आरव आता बस झालं वाट बघणं! तुझे मित्र येतील, असं वाटत नाही. करुन घे आंघोळ. मला मग पुढची कामं करायला बरं पडेल…”

तो मित्रांचीच वाट बघतोय, हे त्या माऊलीच्या लक्षात आलं होतं!

जड अंतःकरणाने आरव उठून आंघोळीला गेला. आंघोळ झाल्यावर पुस्तक घेऊन तो त्याच्या रूममध्ये जाऊन बसला. अर्थात, काही वाचण्यात त्याचं मन लागणार नव्हतंच!

सव्वादहा वाजले तशी दारावरची बेल वाजली. अक्षयने कान टवकारले.

“ए आऱ्या बाहेर ये…”

तो आवाज ऐकताच आरवच्या मनाने एकदम उडी मारली. होय, हा त्या सुम्याचाच आवाज. आरवने पुस्तक ठेवलं आणि तो झपाट्याने बाहेर आला… बाहेर त्याची तीच ती सुप्रसिद्ध गँग अर्धवट रंगलेल्या अवस्थेत बाहेर उभी होती.

“ए आऱ्या भूल गया क्या हम को?”

“अरे, याने तर आंघोळ केलेली दिसतेय!”

“बस का आरव… अरे, थोडी तर वाट बघायचीस?”

“अरे, साडेनऊपर्यंत तुमची वाट बघितली. मला वाटलं तुम्ही मला विसरलात…”

“असं कसं विसरू? अरे, या शिरीषची गाडी पंक्चर झाली होती म्हणून वेळ लागला यायला…”

“ए आता गप्पा पुरे. ए चल आरव. नेहमीसारखा हंगामा करायचाय आपल्याला!”

“पण मी आंघोळ केलीय आणि माझ्याकडे रंगसुद्धा नाहीयेत खेळायला…”

आरवने बचावात्मक पवित्रा घेतला.

हेही वाचा – जोशी सर… भलेपणाचा वसा

“अरे, रंगाची फिकीर तू कशाला करतो बॉस. ये देख पुरा ड्रम भरके लाया है तेरे लिये!” एक मुलगी म्हणाली…

“नको. यावर्षी राहू द्या. इच्छा होत नाहीये रंग खेळायची.”

त्याने तसं म्हणायचा अवकाश दोन मुलं आत आली, त्यांनी आरवला उचलूनच बाहेर आणलं. तो बाहेर आल्यावर सगळे मित्रमैत्रिणी रंग घेऊन त्याच्यावर तुटून पडले… मग आरवलाही जोर चढला त्याने त्यांच्याचकडचे रंग घेऊन सगळ्यांना रंगवायला सुरुवात केली. सगळे रंगून झाल्यावर एक जण म्हणाला,

“ए चला चौकात जाऊया… आपले सगळे मित्र वाट बघताहेत!”

“चल आरव, बस मागे”

आरव अवघडला… “अरे, पण ते तुमचे मित्र ना? मग मला…”

“ए आरव, यह क्या लगा के रखा है? तुमचे मित्र… माझे मित्र? चल बैठ जल्दी, जादा शाणपणा मत कर!”

आरव मुकाट्याने मागे बसला. सगळे चौकात आले. दोन तास सगळ्यांनी मनसोक्त धूम केली. सगळे रंगून थकल्यावर आरव सगळ्यांना म्हणाला, “आज संध्याकाळी माझ्याकडून सगळ्यांना पावभाजीची पार्टी!”

लगेच सुम्या म्हणाला, “नाही आरव आज तुलाच आमच्याकडून वेलकम पार्टी. एक वर्ष झालं तू मित्रांना भेटला नाहीस. अरे नापास झालास म्हणून काय मित्रांना तोडून टाकायचं? तू त्या जीवघेण्या आजारातून वाचलास हे काय कमी आहे? एक वर्ष वाया गेलं म्हणजे आयुष्य संपत नसतं आरव. तुझ्या तशा वागण्याने आम्ही सगळेच अस्वस्थ होतो. खूप बरं वाटलं आज तुला आमच्यात बघून. आज की शाम तेरे नाम… दोस्त मरते दम तक ये दोस्ती टूटना नहीं चाहिए!”

आरवने तशाच रंगलेल्या अवस्थेत सुम्याला मिठी मारली. ते पाहून सगळे मित्रमैत्रिणी जवळ आले. त्यांनी आरवला उचलून घेतलं आणि एकच जल्लोष केला.

आरव हवेत तरंगतच घरी आला. मित्रांसोबत रंग खेळल्यामुळे त्याच्या मनावरची नैराश्याची धूळ उडून गेली होती. प्रसन्नतेचे नवीन रंग त्यावर चढले होते. आंघोळ झाल्यावर तो आईला म्हणाला,

“आई लवकर वाढ खूप भूक लागलीये आणि हो, मला लगेच अभ्यासाला बसायचंय. यावेळी मला मेरिटमध्ये यायचंच आहे!”

आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू कधी बाहेर पडले, हे तिलाही कळलं नाही.


(ही कथा लेखकाच्या ‘कथा माणुसकीच्या’ पुस्तकातील आहे.)

मोबाइल – 9209763049

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!