Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 25
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » नासका आंबा… रोहन घरी आला अन् त्याने धक्कादायक बातमी दिली!
    ललित

    नासका आंबा… रोहन घरी आला अन् त्याने धक्कादायक बातमी दिली!

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेNovember 11, 2025No Comments10 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, नासका आंबा, दादा आबा वाद, विनायक दादा, विनायक गणेश, रोहन काका भेट, रोहन माई भेट,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 2

    दादा घर सोडून गेला आणि घरातील वातावरण पार बदलून गेले होते. मी त्याचा कपड्याचा  खण तपासून बघितला आणि माझ्या लक्षात आले की, तो थोडेफार कपडे घेऊन गेला होता. दादाचे घरात नसणे, हे पचवणे मला आणि कुसुमला खूप कठीण जाणार होते.

    दादा वंशाचा पहिला दिवा. सगळ्यांचा लाडका होता आमच्या आळीमध्ये. जरा मोठा झाल्यावर आळीतील कोणाकडेही काही सणसमारंभ असला की, मदतीला म्हणून दादाला हक्काने आणि मानाने बोलावले जायचे. दादा अभ्यासात हुशार होताच, पण खेळातही खूप रुची घ्यायचा. शिवाय, आमच्या घरातील अडगळीच्या खोलीत कितीतरी जुने तुटलेले लोखंडी सामान, शेतीची अवजारे वगैरे गोष्टी ठेवलेल्या होत्या. घरी असताना दादा त्या खोलीत जाऊन काहीतरी करण्यात गर्क असायचा. आबांना देखील त्याच्या या तांत्रिक आवडीचे फार कौतुक वाटे. दादाला आमच्या गावच्या समुद्राचे देखील खूप आकर्षण होते. वेळ मिळेल तेव्हा तो एकटाच समुद्रावर जाऊन तासनतास बसायचा.

    आबा आणि माईच्या शिकवणीत तसेच संस्कारात लहानाचे मोठे झालेलो आम्ही आबांसाठी आशास्थान होतो. अभ्यासाव्यतिरिक्त खेळात आणि इतर कौशल्यात आम्ही प्रवीण असले पाहिजे, असा आबांचा कायम आग्रह असायचा. पण आबा आणि माईच्या संस्कारांना तडा जाणारा एक प्रसंग घडला… आमच्या शाळेत दादाच्या दहावीच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या वेळी! पण ती गोष्ट मला समजायला एक आठवडा गेला. माझ्या एका शाळेतील मित्राने शाळा सुटल्यावर घरी येताना कानात हळूच ही गोष्ट सांगितली. ती ऐकताच मी मित्रावर चिडलो आणि म्हणालो की, हे शक्य नाही! दादावरचे संस्कार त्याला असे करू देणार नाहीत. पण माझा मित्र त्याच्या बोलण्यावर ठाम राहिला आणि मला दरदरून घाम फुटला. तो सांगतो तसंच घडलं असेल तर, घरात काय रामायण घडेल, या भीतीने मी कासावीस झालो होतो. त्या मित्राने मला सांगितले होते की, माझा दादा चोरून सिगारेट पितो. एवढेच नाही तर, त्याने त्यांच्या अड्ड्याची जागा मला सांगितली. ती जागा म्हणजे समुद्राच्या किनाऱ्याचे शेवटचे टोक. जिथे गावातील कोणीच जायचे नाहीत, कारण तिथे चिखलाची जमीन होती आणि खाचरं तयार झाली होती. खाचराच्या आजूबाजूला कमरे इतक्या उंचीची झुडपे दाटीवाटीने वाढली होती. शिवाय, त्या टोकाला कोणाची राहण्याची घरे देखील नव्हती.  

    मी एक गोष्ट काही दिवस बघत होतो, त्याची मला अचानक आठवण झाली. दादाचे कायम आमच्या दिवाणखान्यातील घड्याळाकडे लक्ष असायचे आणि माईला काहीतरी पटेल, असे कारण देऊन दादा घरातून सटकायचा. त्याच्या या अशा वागण्याचा अर्थ माझ्या मित्राने सांगितलेली गोष्ट ऐकून मला हळूहळू कळायला लागला होता.

    याची शहानिशा करण्यासाठी त्या अड्ड्यावर पाळत ठेवायचे मी ठरवले. शनिवार होता… शाळा लवकर सुटली होती. शाळेतून घरी न जात मी वाट वाकडी करून त्या अड्ड्यावर जायचे ठरवले. मी अड्ड्यापासून जरा लांब आडोसा बघून लपून बसलो होतो. दादाचे काही मित्र मी लांबूनच ओळखले. पण दादा दिसला नाही म्हणून मी सुखावलो क्षणभर… पण माझा आनंद फार काळ टिकला नाही, कारण पुढच्याच क्षणी दादा सिनेमातल्या हीरोसारखा तिथल्या झुडपातून बाहेर आला सिगारेट पीत! मला ते बघून धक्काच बसला. काही वेळाने कापडी पिशवीतून कसल्याशा बाटल्या काढल्याचा आवाज मी ऐकला आणि मला अजून एक धक्का बसला. मी तिथे फार काळ न थांबता घरी परत आलो, कारण ‘शाळेतून यायला उशीर का झाला?’ या माईच्या प्रश्नाला द्यायला माझ्याकडे उत्तर नव्हते.

    हेही वाचा – नासका आंबा… अन् दादानं पहाटेच घर सोडलं!

    दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टीच होती. दुपारची जेवणे झाल्यावर माई आणि आबा वामकुक्षी घेतेवेळी दादाला मागच्या परसात विहिरीजवळ बोलावून या गोष्टीचा शहानिशा करण्याचे मी ठरवले. पण दादा नेहेमीचेच कारण देऊन घरातून सटकला. त्यानंतर मी दादाला गाठायची संधी शोधत असतानाच एक दिवस ही गोष्ट आबांच्या कानांवर आली. पण मला अपेक्षित असलेले रामायण न घडता आबा चक्क दादाला त्यांच्या परीने शांतपणे समजावीत होते की, तो करत असलेली गोष्ट त्याच्या आयुष्याची नुसती दिशाच बदलणार नाही तर, जगण्याची दशा करून टाकेल! क्षणभराच्या मोहाच्या बदल्यात शैक्षणिक कारकिर्दीचा खेळखंडोबा कसा होऊ शकतो, ते आबा दादाला पटवून देत होते. दादाने अगोदर त्याच्या आवडीचे शिक्षण पूर्ण करून आयुष्यात स्थिर व्हावे आणि नंतर स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर या बाबतीतले निर्णय स्वतः घ्यावेत, असे आबांनी दादाला सुचवले. या सगळ्याचा दादावर किती परिणाम झाला ते समजणे कठीणच होते.

    पुढे दोन वर्षांनी बारावीची परीक्षा दादा खूप चांगल्या मार्कानी उत्तीर्ण झाला. आबा, माईंनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता, दादाचा निकाल बघून! दादाच्या कॉलेजचे दुसरे वर्ष संपायच्या वेळेला एक विचित्र गोष्ट आमच्या गावात घडली. अचानक आलेल्या वादळाच्या तडाख्यात सापडून आपला नेहेमीच मार्ग बदलून एक मोठे जहाज आमच्या गावच्या समुद्रकिनारी भरकटत आले आणि थोडेसे एका बाजूला कलंडून चिखलात रुतून बसले. ही बातमी  वाऱ्यासारखी गावात पसरली आणि जो तो किनाऱ्यावर धावत गेला, ते अडकलेले जहाज बघायला! दादा ते बघून हबकून गेला होता.

    बातमी कळताच पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी लगोलग किनाऱ्यावर आले आणि त्यांनी गावकऱ्यांना जहाजाजवळ जायला परवागी नाकारली. पूर्ण जहाजाभोवती साखळी बांधून ठेवण्यात आली. सागरी यंत्रणा लगोलग कामाला लागली आणि जहाजावरील लोकांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्याचे काम सुरू झाले. इथेच दादाला भेटला जॉन नावाचा एक फिरंगी… कशी कोण जाणे पण त्याची आणि दादाची मैत्री झाली. तो फिरंगी जहाजाचा कप्तान होता. जहाजाचा काय तो सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत तो फिरंगी रत्नागिरीतच मुक्काम करणार होता. फिरंग्यासोबत त्याची बायको आणि दोन मुली देखील होत्या. त्या सुट्टीवर म्हणून फिरंग्यांच्या जहाजावर काही दिवसांसाठी म्हणून आल्या होत्या. फिरंग्यांच्या कंपनीने त्यांच्या राहण्याची सोय रत्नागिरीतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये केली होती. तिथेच दादाची ओळख झाली फिरंग्यांच्या मुलीशी म्हणजे सोफियाशी आणि दादा चक्क तिच्या प्रेमात पडला.

    का कोण जाणे, पण त्या फिरंग्याला दादा खूप आवडायचा. त्याने जाणीवपूर्वक या प्रेमकहाणीला उत्तेजन दिले आणि दादाला परदेशी येऊन त्याचा व्यवसाय सांभाळण्यास सांगितले. बदल्यात तो दादाचे सोफियाशी लग्न लावून त्याला आपला घरजावई करणार होता.  दादा सोफियासाठी इतका वेडा झाला होता की, एक दिवस त्याने ही गोष्ट भीतभीत आबांच्या कानावर घातली आणि वादाची ठिणगी पेटली आमच्या घरात. आबा आणि दादामध्ये वरच्या पट्टीत वादावादी झाली आणि शेवटी दादाला उद्याच्या उद्या सूर्योदयापूर्वी घर सोडून जायला सांगून आबा आरामखुर्चीत कोसळले.


    झाडावरून आंबे उतरवायचे काम नुकतेच सुरू झाले होते. गेल्या कित्येक पिढ्यांनी त्यांना जमेल तसे हे काम केले होते. म्हणूनच आमचे राहते घर आणि वाडी आज अजूनही तितक्याच जोमाने उभी आहे. आजवर कित्येक हात तिथे राबले होते. आबांच्या भाषेत बोलायचे तर आंब्याच्या या पंढरपुरी वावरणारी गडीमाणसे ही वारकरी म्हणून येतात आणि तहानभूक विसरून कष्टाच्या गजरात काम करतात. म्हूणनच या घराला आजवर सुखाचे दिवस बघायला मिळाले आहेत.

    मी नाही म्हणत असताना देखील आबा जातीने हजर होते, यावर्षीच्या मोसमाच्या पहिल्या दिवसाच्या पूजेला. पहिल्या दिवशी सर्वात जुन्या गड्याकडून आबा पहिल्या आंब्याच्या झाडाची पूजा करून घ्यायचे आणि त्यानंतरच आंबे खाली उतरवायला सुरुवात व्हायची. उतरवलेला पहिला आंबा माईच्या हस्ते ग्रामदेवतेला प्रसाद म्हणून अर्पण केला जायचा.

    आबांनी वाडीतच एका बाजूला एक मोठी शेड बांधून घेतली होती. त्यात मोठ्या मोठ्या अशा खोल्या बांधून घेतल्या होत्या उतरवलेले आंबे वाळलेल्या गवतावर पसरवून ठेवण्यासाठी. बघता बघता अर्ध्या अधिक कलमांचे आंबे उतरवून झाले. पुढची कामं जोरात सुरू होती आणि एक दिवस संध्याकाळी उन्हे उतरत असतानाच एक गडी मला बोलवायला आला…

    “दादा बाहेर कोणीतरी आले आहे, मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन. तुमची चौकशी करत आहेत…”

    मला एकदम रोहनची आठवण झाली. हातातील कामं बाजूला ठेवून मी घराच्या अंगणात आलो. तेवढी पावलं टाकताना मनात विचार आला की, कसा असेल रोहन? शेवटी आमच्या घराचा तो वारस आहे. आबांचा नातू. त्याचे स्वागत कसे करायचे आणि मुख्य प्रश्न तर वेगळाच होता… तो म्हणजे आबांना त्याची ओळख कशी करून द्यायची?

    जे होईल ते बघून घेऊ त्यावेळी, असा विचार करत मी अंगणात पोहोचलो. पुढच्याच क्षणी तो मला सामोरा गेला. मोठाल्या बॅगा होत्या तिथून चालत माझ्याजवळ आला आणि मला हात जोडून नमस्कार केला… स्वत:ची ओळख करून देत मला म्हणाला, “तूच माझा गणेशकाका आहेस ना?”  मी “हो” म्हणालो आणि लगोलग खाली वाकून त्याने मला नमस्कार केला. काही कळायच्या आत मी त्याला गच्च मिठी मारली आणि म्हणालो, “आपल्या घरात तुझे स्वागत आहे.”

    “अगदी बाबा म्हणाला तसंच झालं…”

     “काय म्हणाला होता माझा दादा?”

    “हे असेच स्वागत करशील तू माझे, जरी मी तुला पहिल्यांदा भेटत असलो तरी!”

    रोहनचे बोलणं ऐकून डोळ्यांत पाणी आलं माझ्या.

     “दादा कसा आहे?”

    रोहनने पटकन उत्तर द्यायचे टाळले आणि माझ्या पोटात धस्स झाले.

    “रोहन तू बोलत का नाहीस? दादा कसा आहे. प्लिज बोल काही तरी…”

    “काका, बाबा आता नाही या जगात…” असं म्हणून रोहनने मला मारलेली मिठी आणखी गच्च केली.

    “म्हणजे?”  रोहनच्या बोलण्यावर माझा विश्वास मुळीच सुद्धा बसत नव्हता.

    “तुला पत्र लिहिले होते बाबांनी त्यानंतर दोन दिवसांनी ते गेले. कॅन्सर झाला होता त्यांना. शेवटची स्टेज होती. डॉक्टरांना काहीच आशा उरली नव्हती. तेव्हा एक दिवस बाबाने मला जवळ बसवून त्याच्या बालपणापासून तो अमेरिकेत जाईपर्यंतची सगळी गोष्ट सांगितली.”

    हेही वाचा – लढाई… व्यवहार की भावना?

    आतून माईचा आवाज आला आणि मी भानावर आलो, कारण आम्ही कितीतरी वेळ बाहेरच उभे होतो.

     “चल आधी आत जाऊ आपण, नंतर बोलूया…”  मी रोहनला म्हणालो.

    आम्ही बॅगा घेऊन आत गेलो. मी रोहनला त्याची खोली दाखवली. तो फ्रेश व्हायला गेला आणि मी माईला भेटायला स्वयंपाकघरात गेलो. माईच्या डोळ्यांत कुतूहल होते. तिने काही विचारायचा आत मीच तिला म्हणालो, “उद्या सांगतो सगळं. आताच आलाय तो. जरा हातपाय धुवून त्याला विश्रांती घेऊ दे. थोडा चहा करून दे बरं आमच्या दोघांसाठी. रात्रीच्या जेवणाला तो आहे बरं का! एक जास्तीचे ताट वाढायला विसरू नकोस.” माई कामाला लागली खरी पण तरीही माझी पावलं तिथेच घुटमळत होती.

    “काय रे गणेश काय झाले? तू तुझ्या कामाला न जात इथेच का थांबला आहेस?”

    आबांना सांगायचं कसं…. त्याचे उत्तर माईचं देऊ शकत होती म्हणून तिला आधी विश्वासात घ्यायचे ठरवले मी.

    “माई तुझ्या खोलीत येतेस का थोडा वेळ? ते चहाचे नंतर बघू जरा…” असं म्हणून मी माईला बळेबळे तिच्या खोलीत नेऊन खोलीचा दरवाजा आतून बंद केला.

    माईच्या जवळ जाऊन मी तिला शांतपणे म्हणालो, “माई आलेला पाहुणा दुसरा-तिसरा कोणी नसून आपल्या दादाचा मुलगा रोहन आहे… तुझा नातू रोहन!”

    हे ऐकून माईला धक्काच बसला.

    “अरे काय सांगतोस काय तू? दादाचा मुलगा आहे तो!” असं म्हणून माई रडायला लागली.

    “माई शांत हो. त्रास करून घेऊ नकोस. जे पूर्वी झाले ते झाले. शेवटी आपल्या घराचा वारस आहे तो. आणखी एक गोष्ट त्याने सांगितली, ती तुला सांगून टाकतोय मी… मन घट्ट कर आणि ऐक… आपला दादा आता या जगात नाही. काही महिन्यांपूर्वी त्याचे निधन झाले कॅन्सरने!”

    माईने मला जोरात मिठी मारली… ती थरथरत होती. मी तिला शांत करायला तिच्या डोक्यावरून हात फिरवत होतो. काही मिनिटे अशीच निःशब्द गेल्यावर माईने मला विचारले, “तो इथे का आला आहे?” त्यावर मी माईला म्हणालो, “तो सांगेल सगळं आपल्याला. आपण त्याला थोडा वेळ देऊया. विचारायची घाई नको करूस बिलकुल… तो आपलाच आहे गं! जे घडून गेले दादाच्या बाबतीत त्यात त्याची बिचाऱ्याची काय गं चूक? दादाच्या जाण्याने तो आधीच खचून गेला असेल… तरी सुद्धा इतक्या लांबून प्रवास करत तो इथपर्यंत आला, त्या मागे नक्कीच काहीतरी तसेच कारण असेल…”

    माझे म्हणणे माईला बहुतेक पटले असावे. “मी जाते आता स्वयंपाकघरात. चहाचे बघते. असं म्हणून आधी माई आणि नंतर मी तिच्या खोलीतून बाहेर पडलो. जाताना माई मला सांगून गेली की, “त्याला घेऊन स्वयंपाकघरातच ये. टेबलावर बसून चहा प्या दोघेजण.”

    मी रोहनच्या खोलीत डोकावले. एव्हाना तो फ्रेश होऊन बसला होता त्याची बॅग उघडून.

    “रोहन चल. आपण चहा प्यायला जाऊया.”

    आम्ही स्वयंपाकघरात आलो. माईची आणि रोहनची नजरानजर झाली. रोहन पुढे होऊन माईच्या पाया पडत म्हणाला, “माई आशीर्वाद दे. मी खूप वर्षं वाट बघितली तुझ्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेण्याची… पण आता आणखी उशीर नकोय. झाला तेवढा उशीर खूप झाला.”

    पुढच्याच क्षणी माईने रोहनच्या डोक्यावरून हात फिरवला. रोहन परत उभा राहिला आणि त्याने माईला मिठी मारली, “माई, कुठे गं होतीस तू इतकी वर्ष. बाबा सारखी तुझी आठवण काढत बसायचा. खूप त्रास दिला ना त्याने तुला आणि आबांना. करतील ना गं आबा बाबांना माफ ? आता तर बाबा सुद्धा नाही या जगात! मला खूप वर्षांपासून इथे यायचे होते. पण बाबांनी नाही पाठवले, कारण बाबांना खात्री नव्हती की, तुम्ही माझा स्वीकार कराल की नाही याची… तो चुकला की बरोबर होता, हा प्रश्न आता उरतच नाही. पण त्याने या घरातील त्याच्या वास्तव्याच्या खूप आठवणी शेवटपर्यंत जपून ठेवल्या होत्या. मी आबांना भेटल्यावर सगळं सांगणार आहे, जे बाबाने सांगण्यासाठी माझ्याकडून वचन घेतले होते. शिवाय, त्याने आबांसाठी एक पत्र दिले आहे माझ्याजवळ. माई प्लीज जमलं तर बाबांना माफ कर तू!” असं म्हणून रोहन रडायला लागला. माईने त्याला जवळ घेतले आणि शांत करायचा प्रयत्न केला.

    रोहन शांत झाला आणि आम्ही माईने केलेला चहा प्यायला सुरुवात केली.

    एवढा वेळ मी स्वयंपाकघरात काय करतो आहे, ते बघायला म्हणून आबा तिथे आले आणि त्यांना बघून रोहन खुर्चीवरून उठला. मी त्याला खुणेनेच बसायला सांगितले.

    “हा कोण आला आहे पाहुणा?” आबांनी विचारले.

    “माझ्या मित्राचा मुलगा आहे. आताच आला आहे दमून. उद्या देतो ओळख करून तुमच्याशी…” मी शांतपणे आबांना सांगितले आणि आबांना ते पटले असावे…

    “ठीक आहे,” असं म्हणून आबा बाहेर गेले. मी आणि माईने सुटकेचा नि:श्वास सोडला. अर्थात, हे तात्पुरते होते. उद्या आणखी काय नाट्य घडणार होते, याची चिंता डोक्यात ठेऊनच मी रोहनला त्याच्या खोलीत सोडून परत आंब्यांच्या खोलीत जायला निघालो…

    क्रमशः

    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026 ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026 ललित

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    By डॉ. अस्मिता हवालदारMarch 24, 2026

    द. मा. मिरासदारांनी अनेक विनोदी कथा लिहिल्या आहेत. त्यांनी ललित लेखन, वगनाट्य, नाटिका, चित्रपटाचे संवाद…

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Bookshelf : ‘भुताचा जन्म’… मर्यादा सांभाळून केलेला निखळ विनोद

    March 24, 2026

    प्रत्येक घराचा ‘आधारवड’!

    March 24, 2026

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 509
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn