Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeललितअनिता… भूतकाळ अन् वास्तव!

अनिता… भूतकाळ अन् वास्तव!

विवेक वैद्य

मी ठाण्याला गेलो होतो काकाकडे. त्याच्या घरापासून जवळच असलेल्या मोठ्या रस्त्याला एक मॉल आहे. मॉलमध्ये जायला मला लईच आवडते. थंडगार हवा… तो झगमगाट… उत्साहाने येणारे लोक… त्या दिवशी रिकामा होतो तर, गेलो मॉलमध्ये! तिथे मी खरेदीबिरेदी काही करत नाही फारसा. एकदाच बेल्ट घ्यायला गेलो आणि ‘Only 2999/-‘ किंमत बघितल्यावर चक्करच आली… तरी एखाद्या वस्तूवर एक फ्री असेल तर… आणि तीही बजेटमध्ये असेल तर घेतो किंवा ट्रॉलीत पडलेले दोनदोनशे रुपयाचे टी शर्ट किंवा half पॅन्ट घेतो…

ते जाऊदे तर, गेलो थोडा फिरलो आणि एका काऊंटरवर ती दिसली! गोड चेहरा…  गोड खळ्या गाली… गौरवर्ण… मन वीस-पंचवीस वर्षे मागे गेले. आमच्या कॉलेजला होती. उत्साही, चटपटीत, हसली तर धबधब्यासारखी हसायची… अनिता! आमच्या ग्रुपमध्ये असायची. माझ्याशी एकदम मोकळेपणाने वागायची. पुढे कॉलेज सुटलं आणि काही दिवसांनी तिची लग्नपत्रिकाचं आली. मुंबईला लग्न होतं. जायची इच्छा होती, पण नवीनच नोकरी लागलेली… रजा मिळाली नाही. पुढे संपर्कच तुटला…

मी भानावर आलो. पुन्हा तिच्याकडे पाहिले. जीन्सची पॅन्ट, शर्ट हातात महागडे घड्याळ… सडपातळ शरीरयष्टी… ही नक्कीच अनिताची मुलगी असणार, सेम तशीच दिसते! जाऊ की नको? या विचारत पडलो. गळ्यात मंगळसूत्र नव्हते म्हणजे अजून आईवडिलांबरोबरच राहात असेल…

हेही वाचा – थ्रिल… आयुष्याला कलाटणी देणारं!

तरी पुन्हा विचार केला. या तरुण पिढीचे काही खरे नाही बाबा! एकदम खाडकन उलटून बोलतात. शिवाय, ती अनिताचीच मुलगी कशावरून? मी स्वतः नाही का सायली संजीवला निवेदिता जोशीची मुलगी समजायचो कितीतरी दिवस!! पण हिम्मत केली. गेलो आणि विचारले,

“नमस्कार… तुमच्या आईचे नाव अनिता आहे का?”

तिने माझ्याकडे काहीसं आश्चर्याने पाहिले…

“तुम्ही कोण?”

“मी तुमच्या आईबरोबर शिकायला होतो. के. पी. कॉलेजला…”

“काय नाव तुमचे?”

“मी वैद्य, विवेक वैद्य!”

तिने माझ्याकडे भूत बघावे तसे पाहिले आणि एकदम ओरडली,

“अरे वैद्य तू?… किती बदललास. मी तर तुला ओळखलेच नाही!”

मी तिच्याकडे ‘आ’ वासून बघायला लागलो.

“अरे बघतोय काय असा… मी अनिताच! तुझ्याबरोबर के. पी. कॉलेजला शिकणारी…”

हेही वाचा – भाषेची ‘शुद्धता’ जपली जावी!

मला मॉलमध्ये दुसऱ्यांदा चक्कर आली. (पहिल्यांदा बेल्टची किंमत बघितल्यावर आली होती.) तरीही स्वतःला सावरत मी म्हणालो,

“तू काय हेमामालिनी, रेखा यांच्याकडून चिरतरुण राहण्याच्या टिप्स घेते काय?”

ती एकदम धबधब्यासारखी हसली आणि माझी खात्री पटली की, हीच अनिता!

पुढे सांगण्यासारखं फार काही झालं नाही. थोडया गप्पा झाल्या. तिने माझ्यासाठी आइस्क्रीम मागवले. तिचे कार्ड दिले आणि म्हणाली,

“राहणार असला तर ये घरी. छान गप्पा मारू. कॉलेजच्या आठवणी वगैरे… माझ्या मिस्टरांशीही ओळख करून देते.”

नंतर ती टॉक टॉक असा तिच्या हाय हिल सॅन्डलचा आवाज करत निघून गेली. ती गेल्यावर मी एका मोठया आरशासमोर उभा राहीलो आणि स्वतःकडे पाहिले…

पांढरे झालेले केस काळे करता येतील, पण पडत चाललेल्या टकलाचे काय करायचे?  विग घेऊया का? आणि हे वाढलेले पोट कसे लपवणार?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!