पराग गोडबोले
जवळपास चार एक महिन्यांपूर्वीची ही गोष्ट असेल. ऑफिसच्या कामासाठी हल्ली खूप फिरावं लागतं. बऱ्याच वेळा मुंबईतच वेगवेगळ्या ठिकाणी, तर कधी मुंबईबाहेर सुद्धा! अशीच एक चेन्नईची भेट संपवून पुण्याला जायला निघालो होतो. दुपारी साडेतीनचं उड्डाण होतं आणि त्याच्या दोन तास आधी तरी विमानतळावर पोहोचायचं होतं. उशिराच्या विमानांची तिकिटं उपलब्ध नव्हती, त्यामुळे हे लवकरचं विमान!
सकाळी पटापटा कामं उरकली आणि साधारण दुपारी एकच्या सुमारास मी आणि माझा सहकारी विमानतळावर पोहोचलो. सकाळी मस्त इडली, डोसे, पायसम वगैरे भरपेट न्याहारी केल्यामुळे भूक फारशी नव्हती. तरीही, चेन्नईतल्या नावाजलेल्या ‘अडयार आनंद भवन’ हॉटेलमधून सांबार-भात बांधून आणला होता, त्याचा फन्ना उडवला.
सहकारी मुंबईच्या विमानाकडे वळला आणि मी पुण्याच्या… आता एकटाच होतो आणि बराच वेळ हाताशी होता. राजन खान यांचा ‘जिरायत‘ नावाचा अप्रतिम कथासंग्रह सोबत आणला होता, त्यात रमलो… दोन कथा वाचून झाल्या आणि तेवढ्यात सात-आठ तरुणांचा एक गट माझ्यासमोर येऊन बसला. विशी-पंचविशीतले काळेसावळे तरुण, सारख्या गणवेशातले… थोडेसे उत्सुक, विस्फारल्या नजरांनी इकडे-तिकडे बघत असलेले. चकचकाट आणि एकंदर वातावरण, यामुळे थोडेसे बुजलेले…
बहुदा पहिल्यांदाच विमान प्रवास करत असावेत, याचा अंदाज येत होता त्यांच्याकडे बघून. दिसायला स्थानिक वाटत होते, पण त्यांच्या हिंदीत गप्पा सुरू होत्या! चेन्नईत हिंदी, तेही तिथल्या स्थानिक प्रजेकडून म्हणजे अगदी अशक्यप्राय गोष्ट, याचा अंदाज मला एक रात्र आणि अर्धा दिवस, त्या शहरात घालवल्यानंतर आला होता आणि खूप आश्चर्य वाटत होतं.
एक जण जरा वयाने मोठा, त्यांचा म्होरक्या होता. त्यांचं सर्वानुमते ठरलं की, ‘चला चहा घेऊया!’ सगळे जण सामान वागवत जाण्यापेक्षा, दोघांनी जाऊन चहाचे कप घेऊन यावे, असं ठरलं त्यांचं आणि दोन जण गेले मोहिमेवर… येताना, उतरलेल्या चेहेऱ्यांनी, हात हलवत परत आलेले बघून बाकीचे वैतागले. चहा आणायला गेलेल्यांपैकी एक जण म्हणाला, “सालो, चाय ढाईसौ रुपये गिलास है, पिओगे?” हादरलेल्या सगळ्यांनी, एका सुरात ‘नाही, नाही…’ची घोषणा केली आणि तो विषय तिथेच संपला, चहाशिवाय!
आम्ही सगळे विमानात चढलो आणि त्यातला एक जण नेमका माझ्या शेजारी आला बसायला. सगळे स्थिरस्थावर झाल्यावर, ‘कुर्सी की पेटी’ बांधायची सूचना आली. साधं ‘बक्कल’ ते, त्याला ‘पेटी’ का म्हणतात? हे मला आजवर न उलगडलेलं कोडं आहे. माझ्या बाजूचा मुलगा ती पेटी बांधायची झटापट करत होता आणि जसं ते कित्येक लोकांना उलगडत नाही, तसं ते त्यालाही नव्हतं झेपत… थोडी मदत केली मी आणि पेटी बसली जागच्या जागी.
हेही वाचा – मन तृप्त करणारं… रथीनम!
हवाई सुंदरीची सुरक्षा प्रात्यक्षिकं झाली आणि विमान धावपट्टीवर घरंगळायला लागलं. माझ्या शेजारच्या मुलाच्या चेहेऱ्यावर अतीव उत्सुकता दिसत होती. मी खिडकीजवळ आणि तो मधल्या आसनावर होता. मान वाकडी कर-करून तो हा पहिलावहिला अनुभव नजरेत साठवून घेत होता. विमान आकाशस्थ झालं आणि सगळे सैलावले. आता जवळजवळ दीड तासांची निश्चिती होती.
माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी त्या मुलाशी संवाद साधायला सुरुवात केली. जेमतेम बावीस वर्षांचा तो मुलगा, झारखंडचा निवासी. मला त्या सगळ्यांच्या हिंदी बोलण्याचा क्षणार्धात उलगडा झाला आणि आमच्या संभाषणाची गाडी सुरू झाली, भरधाव! बी.कॉम. शिकलेला तो, झारखंडमधल्या एका छोट्याशा आदिवासी गावातून चेन्नईत अवतरला होता, नोकरी करायला! कुठे झारखंड, कुठे चेन्नई, दोन टोकं… लगोलग त्याने मला त्याच्या कंपनीचं ओळखपत्र दाखवलं आणि म्हणाला, इस कंपनी में जॉब लगा है, सर. हमारी कंपनी कार के पार्ट्स और गियर बॉक्स बनाती हैं. त्याचं खातं ‘Quality Control ‘ असं लिहिलं होतं, त्याच्या कार्डावर!?
मनात विचार आला बीकॉम मुलगा आणि QC चं काम कसं करणार? त्याला विचारल्यावर तो म्हणाला, “जॉब मिलना आवश्यक था, सो जो मिल गया, वही थाम लिया.” मी मान डोलावली. जीवनाचं सार होतं त्या उत्तरात!
घरी शेती करणारे वडील, आई आणि धाकटा भाऊ. दहा-बारा एकरांचं वावर. गहू, तांदूळ, भाज्या, कडधान्य असं सगळं पिकवतो म्हणाला. पाणी भरपूर आहे, सरकारने बोरिंग घ्यायला मदत केलीय. तो सुटला होता नुसता… बऱ्याच दिवसांनी असा, ऐकणारा श्रोता मिळाला होता बहुतेक त्याला!
घरी कोंबड्या, बकऱ्या आणि म्हशी आहेत. वडील कोंबडे पाळून त्यांना झुंज करायचं शिक्षण देतात आणि तसा एक कोंबडा दोन-तीन हजार रुपयांना विकला जातो. बापाबद्दलचा अभिमान ओतप्रोत भरलेला, प्रत्येक शब्दात!!
मी विचारलं, “आता पुण्याला कशाला?”
“चेन्नई में तीन महिना Training लिया, अब पुणे की फॅक्टरी में काम करूंगा… तिथे जाऊन मला accounts मध्ये काम देणार आहेत. माझे बाकीचे सहकारी पण BSc, ITI, Diploma झालेले आहेत. आम्ही सगळे झारखंडचे आहोत. जवळपासच्या गावांमधले आदिवासी आहोत आम्ही…”
मला खूप कौतुक वाटलं, त्याचं आणि इतर सगळ्यांचंच. कुठल्यातरी लांबच्या राज्यातून पार परक्या प्रदेशात, एकमेकांना सोबत करून, साथ देऊन, पुढे जाऊ पाहणारी ती मुलं आवडून गेली मला एकदम.
कंपनी राहायची आणि जेवायची सोय करणार आहे आमची. खूप पैसे वाचतील. मला शिकायचं आहे म्हणला पुढे खूप. त्याच्या निरागस डोळ्यात स्वप्नं दिसत होती मला, उद्याची.
पुणं जवळ आलं होतं आता. मी विचारलं, इथे बसायचं आहे का खिडकीत? तयार झाला लगेच आणि आम्ही जागा बदलल्या आमच्या. विमान उडताना ज्या आनंदाला तो मुकला होता, तो आनंद शिगोशिग अनुभवला त्याने विमान उतरताना, बालसुलभ! छोट्याशा गोष्टी… पण भारावून गेला तो, पहिल्याच विमान प्रवासात त्याच्या.
हेही वाचा – पुस्तकांमध्ये रमलेला माणूस
विमानातून उतरल्यावर मला म्हणाला, थांबा सर आणि मी नाही नाही म्हणत असतानाही, पटकन वाकून नमस्कार केला त्याने. मी नि:शब्द झालो. भरभरून आशीर्वाद दिला त्याला, माझा फोन नंबरही दिला, म्हणालो, “कधी गरज वाटली तर फोन कर. शक्य असेल ती मदत मी नक्की करेन.”
तिथून आमच्या वाटा वेगळ्या झाल्या, बहुदा पुन्हा कधीही न भेटण्यासाठी! हा मुलगा नाव काढेल अशी चिन्ह दिसत होती. पाळण्यात दिसत होते त्याचे पाय मला! मनात विचार येऊन गेला, आपली सुखवस्तू मुलं असा संघर्ष करू शकतील का जगण्याशी?


