वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पाचवा
आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें । आणि करी जऱ्ही आघवें । तऱ्हीं अकर्ता तो ॥37॥
नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् । पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन्नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् ॥8॥
प्रलपन् विसृजन् गृण्हन्नुन्मिषन् निमिषन्नपि । इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥9॥
जे पार्था तया देहीं । मी ऐसा आठऊ नाहीं । तरी कर्तृत्व कैचें काई । उरे सांगें ॥38॥ ऐसें तनुत्यागेंवीण । अमूर्ताचे गुण । दिसती संपूर्ण । योगयुक्ता ॥39॥ एऱ्हवीं आणिकांचिये परी । तोही एक शरीरी । अशेषींही व्यापारीं । वर्ततु दिसे ॥40॥ तोही नेत्रीं पाहे । श्रवणीं ऐकतु आहे । परि तेथींचा सर्वथा नोहे । नवल देखें ॥41॥ स्पर्शासि तरी जाणे । परिमळु सेवी घ्राणें । अवसरोचित बोलणें । तयाहि आथी ॥42॥ आहारातें स्वीकारी । त्यजावें तें परिहरि । निद्रेचिया अवसरीं । निदिजे सुखें ॥43॥ आपुलेनि इच्छावशें । तोही गा चालतु दिसे । पैं सकळ कर्म ऐसें । रहाटे कीर ॥44॥ हें सांगों काई एकैक । देखें श्वासोच्छ्वासादिक । आणि निमिषोन्निमिष । आदिकरुनि ॥45॥ पार्था तयाचां ठायीं । हें आघवेंचि आथि पाहीं । परी तो कर्ता नव्हे कांही । प्रतीतिबळें ॥46॥ जैं भ्रांतीसेजे सुतला । तैं स्वप्नसुखें भुतला । मग ज्ञानोदयी चेइला । म्हणोनियां ॥47॥
ब्रह्मण्याधाय कर्माणि संग त्यक्त्वा करोति यः । लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ॥10॥
आतां अधिष्ठानसंगती । अशेषाही इंद्रियवृत्ती । आपुलालिया अर्थीं । वर्तत आहाती ॥48॥
दीपाचेनि प्रकाशें । गृहींचे व्यापार जैसे । देहीं कर्मजात तैसें । योगयुक्ता ॥49॥ तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे । जैसें न सिपें जळीं जळें । पद्मपत्र ॥50॥
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि । योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्त्वात्मशुद्धये ॥11॥
हेही वाचा – Dnyaneshwari : मी माझें ऐसी आठवण, विसरलें जयाचें अंतःकरण…
अर्थ
आता कर्ता-कर्म-कार्य हा त्रिपुटीचा व्यवहार स्वभावत:च बंद पडतो, आणि यावर त्याने सर्व (कर्म) जरी केले तरी, तो (तत्वत:) त्याचा कर्ता होत नाही. ॥37॥
पाहात असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, खात असता, चालत असता, झोप घेत असता, श्वास घेत असता, बोलत असता, देत असता, घेत असता, डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप करीत असता, विषयांच्या ठिकाणी इंद्रियांची प्रवृत्ती असते, असे लक्षात आणून खरे स्वरूप जाणणार्या (तत्ववित्) कर्मयोग्याने ‘मी काही करीत नाही’ असे लक्षात ठेवावे. ॥8-9॥
कारण अर्जुना, त्याच्या ठिकाणी ‘मी देह’ अशी आठवणच नसते. तर मग कर्तेपणा कोठचा? तो (कर्तेपणा) तेथे राहील काय? सांग. ॥38॥ याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याशिवाय अव्यक्त परमात्म्याचे सर्व गुण, त्या कर्मयोग्याच्या ठिकाणी स्पष्टपणे अनुभवास येतात. ॥39॥ एरवी तोही इतर लोकांप्रमाणे शरीरात असून, सर्व व्यवहार करीत असताना दिसतो. ॥40॥ तो देखील (इतर लोकांसारखा) डोळ्यांनी पहातो, कानांनी ऐकतो, परंतु आश्चर्य पाहा की, तो त्या व्यवहाराने मुळीच लिप्त होत नाही. ॥41॥ तो स्पर्शासही समजतो, नाकाने गंधाचा अनुभव घेतो आणि समयोचित बोलण्याचा व्यवहारही त्याच्याकडून होतो. ॥42॥ आहाराचे सेवन करतो, टाकायचे ते टाकतो आणि झोपेच्या वेळेला सुखाने झोप घेतो. ॥43॥ तो आपल्या इच्छेनुसार चालताना दिसतो. असे तो सर्व कर्मांचे खरोखर आचरण करतो. ॥44॥ हे एकेक काय सांगावे? पाहा, श्वास घेणे आणि सोडणे, तसेच पापण्यांची उघडझाप करणे इत्यादी कर्मे ॥45॥ अर्जुना पाहा, त्याच्या ठिकाणी ही सर्वच असतात. परंतु तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर यांचा कर्ता मुळीच होत नाही. ॥46॥ ज्यावेळी तो भ्रांतिरूप अंथरुणावर झोपला होता, त्यावेळी तो स्वप्नाच्या सुखाने घेरला होता, मग ज्ञानाचा उदय झाल्यावर तो जागा झाला म्हणून (तो आपल्याला कर्ता समजत नाही) ॥47॥
जो ब्रह्माच्या ठिकाणी कर्मे अर्पण करून, फलाची आसक्ती टाकून कर्मे करतो, तो कमलपत्र जसे पाण्यापासून अलिप्त असते, तसा पापापासून अलिप्त असतो. ॥10॥
आता चैतन्याच्या आश्रयाने सर्वेंद्रियांच्या वृत्ती आपल्या विषयांकडे धाव घेत असतात. ॥48॥ दिव्याच्या उजेडावर घरातील व्यवहार चालतात, त्याप्रमाणे (ज्ञानाच्या प्रकाशात) योगयुक्तांची सर्व कर्मे देहात चालतात. ॥ 49॥ ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात असून पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मे करतो, परंतु (धर्माधर्मरूप) कर्मबंधानाने आकळला जात नाही. ॥50॥
कर्मयोगी (केवळ) शरीराने, (केवळ) मनाने, (केवळ) बुद्धीने आणि (केवळ) इंद्रियांनी कर्मयोगी फलासक्ती टाकून कर्म करतात, म्हणून त्यांची चित्तशुद्धी होते. (ते अहंकारविरहित कर्म करत असतात, म्हणून ते कर्म करीत असूनही शुद्ध असतात.). ॥11॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : देखें आकाशा आणि अवकाशा, भेदु नाहीं जैसा…


