दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 27 ऑक्टोबर 2025; वार : सोमवार
- भारतीय सौर : 05 कार्तिक शके 1947; तिथि : षष्ठी अहोरात्र; नक्षत्र : मूळ 13:26
- योग : अतिगंड 07:25; करण : कौलव 19:04
- सूर्य : तुळ; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:35; सूर्यास्त : 18:09
- पक्ष : शुक्र; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस तुमच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय चांगला राहील. नवीन प्रयत्नांना यश मिळेल, रखडलेले प्रकल्प गती घेतील. व्यवसायात नवीन बदल होण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. नोकरदार जातकांना कामाच्या ठिकाणी वाढत्या जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
वृषभ – वृषभ राशीच्या जातकांसाठी आयुष्यात काही संकटे निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी विरोधकांची संख्या वाढल्याने अनावश्यक अडथळे निर्माण होऊ शकतात. शिवाय, सहकाऱ्यांकडून पाठिंबा न मिळाल्याने मानसिक ताण येऊ शकतो. घरगुती पातळीवर काही मतभेदांमुळे मानसिक ताण येऊ शकतो.
मिथुन – आज कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. नोकरी करणाऱ्यांची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. व्यवसायिकांसाठी नवीन गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील. मात्र कौटुंबिक वातावरण काहीसे तणावपूर्ण राहू शकते. वाहनात अचानक बिघाड झाल्यामुळे काही त्रास होण्याची शक्यता आहे.
कर्क – कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उर्जेने भरलेला असेल. एकाच वेळी अनेक कामांमध्ये व्यग्र राहाल आणि तुमच्या कुशल रणनीतीमुळे अडथळ्यांवर मात करण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष एकाग्र करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील.
सिंह – आजचा दिवस कारकीर्दीत एक नवीन ओळख निर्माण करण्याची संधी घेऊन येईल. भाग्याचा स्वामी चंद्र धनु राशीत भ्रमण करत आहे, ज्यामुळे करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. एखादी मौल्यवान वस्तू भेट म्हणून मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय विक्री वाढेल, प्रतिष्ठेत वाढ होईल. सामाजिक संवाद वाढतील, नवीन फायदेशीर संबंध निर्माण होतील.
हेही वाचा – सुपर मार्केट अन् सुपर खरेदी!
कन्या – या राशीच्या जातकांसाठी, आज आदर आणि सन्मानाची संधी निर्माण होईल. सरकारी कामात प्रगती होईल. प्रभावशाली लोकांकडूनही पाठिंबा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याचे संकेत दिसत आहेत. नवीन व्यवसाय करार नफा मिळवून देऊ शकतो. अचानकपणे अनावश्यक खर्चात वाढ होईल. अशा वेळी घाईघाईने निर्णय घेणे टाळा.
तुळ – आज कठोर परिश्रमाचे पूर्ण फळ मिळेल. जास्त श्रम आरोग्यावर थोडासा परिणाम करू शकतात. त्यामुळे काम आणि विश्रांती यांच्यात संतुलन राखणे महत्त्वाचे असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वाढत्या जबाबदाऱ्यांचा अनुभव येऊ शकतो. सहकाऱ्यांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे कामाला गती मिळेल. नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण होतील.
वृश्चिक – आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. पोटाच्या समस्या देखील त्रास देऊ शकतात. कामाच्या ठिकाणी परिस्थिती पूर्णपणे अनुकूल नाही. सध्या नवीन व्यवसाय गुंतवणूक पुढे ढकलणे चांगले राहील. एखादी चांगली बातमी मिळू शकेल.
धनु – धनु राशीच्या जातकांचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी नेतृत्व कौशल्यांचे कौतुक होईल. भौतिक संसाधनांच्या कमतरतेमुळे काही कामे अपूर्ण राहू शकतात. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, नव्याने कोणालाही पैसे उधार देऊ नका. आरोग्यात चढ-उतार येऊ शकतात.
मकर – मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशाने भरलेला असेल. तुमच्या निर्णय क्षमतेला आज बळकटी मिळेल. दीर्घकाळ प्रलंबित वाद किंवा कायदेशीर बाब जिंकू शकाल. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. या काळात पदोन्नती किंवा मान्यता मिळण्याची शक्यता वाढते. फायदेशीर व्यवसाय ऑफर आर्थिक परिस्थिती मजबूत करेल.
कुंभ – आजचा दिवस करिअर विस्तारासाठी शुभ असेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी येतील आणि वरिष्ठांकडूनही पाठिंबा मिळेल. सहकारीही तुमची प्रशंसा करतील. व्यवसायात भागीदारीतील कामामुळे फायदा होईल. कुटुंबातील ज्येष्ठांचे सहकार्य आणि आशीर्वाद यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा अनुकूल काळ आहे.
हेही वाचा – लग्नाला यायचं हं… ते डिजिटल निमंत्रण!
मीन – आजचा दिवस चढ-उतारांचा असेल. कारकीर्दीत लक्षणीय प्रगती होऊ शकते. कामातील कार्यक्षमता वाढेल, वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. पदोन्नती शक्य आहे. व्यावसायिकांना फायदेशीर संधी मिळतील. घरातील वातावरण आनंददायी असेल आणि संततीकडून चांगली बातमी मिळेल. तथापि, मानसिक अशांतता आणि चिंता एकाग्रतेवर परिणाम करू शकतात.
दिनविशेष
राजकवी भा. रा. तांबे
टीम अवांतर
ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1873 रोजी मध्य भारतातील मुगावली येथे झाला. शिक्षण आताच्या मध्य प्रदेश येथील झांशी आणि देवास येथे झाले. मध्य भारतातच अनेक वेगवेगळ्या ठिकाणी युवराजशिक्षक, दिवाण, पोलीस-सुपरिंटेंडंट, सरकारी वकील, न्यायाधीश, शिक्षणखात्यात परीक्षा विभागाचे रजिस्ट्रार यासारख्या अनेक प्रकारच्या नोकर्या त्यांनी केल्या. खरेतर, काव्यास विशेष अनुकूल नसणार्या नोकऱ्यांमध्येही तांबे यांच्या काव्यलेखनाचा छंद कायम राहिला. 1937 साली ते ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी झाले. इंग्रजी स्वच्छंदतावादी संप्रदायाचे टेनिसन-ब्राउनिंग यांसारखे कवी असोत किंवा जयदेव यांच्यासारखे संस्कृत कवी किंवा नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्यांचे संस्कार वेळोवेळी तांबे यांच्यावर होत गेले. परंतु त्यांच्या कवितेचे मुख्य स्वरूप हे भावगीतांचेच राहिले. ब्राउनिंगच्या नाट्यात्मक एकभाषितांप्रमाणे त्यांनी मराठीमध्येही प्रामुख्याने नाट्यगीते लिहिली. त्यांची कविता प्रथम संग्रहरूपाने 1920 मध्ये रसिकांपुढे आली, नंतर दुसरा भाग 1927 साली आणि समग्र कविता हा संग्रह 1935 साली प्रकाशित झाला. त्यामध्ये एकूण 225 कविता आहेत. काही हिंदी कवितांचाही त्यात अंतर्भाव आहे. या तीनही संग्रहांसाठी अनुक्रमे मायदेव, अज्ञातवासी आणि माधव ज्युलियन हे कवी संपादक लाभले. तांबे यांना संगीताचे चांगले ज्ञान होते. त्यामुळे त्यांच्या अनेक कवितांवर, त्या कोणत्या रागांमध्ये गायिल्या जाव्यात, यासंबंधीच्या सूचना त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या गीतपद्धतीची छाप रविकिरण मंडळातील कवी आणि बोरकर, कुसुमाग्रजादी पुढील कवींवरही पडली. परमेश्वरावर त्यांची दृढ श्रद्धा होती. त्यातून काही ‘अनुभवा’ची कविता त्यांच्याकडून लिहिली गेली. परंतु आध्यात्मिकतेचे स्तोम त्यांनी माजविले नाही. सुनीतरचनेमध्ये केशवसुतांना त्यांनी साथ दिली, तथापि त्यामध्ये त्यांचे मन विशेष रमले नाही. एक सौंदर्यवादी आणि स्वतंत्र प्रतिभेचा कवी म्हणून त्यांचे अर्वाचीन कवींमधील स्थान फार वरचे आहे. त्यांनी रूढ केलेला गीतसंप्रदाय हा तांबेसंप्रदाय म्हणूनही ओळखला जातो. ‘अजुनि लागलेचि दार’, ‘कशी काळ नागिणी’, ‘कळा ज्या लागल्या जीवा’, ‘कुणि कोडे माझे उकलिल का’, ‘घट तिचा रिकामा’, ‘घन तमीं शुक्र बघ’, ‘चरणि तुझिया मज देई’, ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’, ‘डोळे हे जुलमि गडे, तिन्ही सांजा सखे मिळाल्या’, ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ इत्यादी कविता नंतर भावगीते म्हणून देखील रसिकप्रिय झाल्या आहेत. 1926 साली भरलेल्या मध्य भारतीय कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1932 साली कोल्हापूर येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनांतर्गत कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. तांबे यांचे 7 डिसेंबर 1941 रोजी निधन झाले.


