वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पाचवा
एऱ्हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा । ते सांख्यकर्मसंस्था । जाणती केवीं ॥26॥ सहजें ते अज्ञान । म्हणोनि म्हणती हे भिन्न । एऱ्हवी दीपाप्रति काई अनान । प्रकाशु आहाती ॥27॥ पैं सम्यक् एकें अनुभवें । जिहीं देखिलें तत्व आघवें । ते दोन्हींतेंही ऐक्यभावें । मानिती गा ॥28॥
यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तत् योगैरपि गम्यते । एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥5॥
आणि सांख्यीं जें पाविजे । तेंचि योगीं गमिजे । म्हणोनि ऐक्यता दोहींतें सहजें । इयापरी ॥29॥ देखें आकाशा आणि अवकाशा । भेदु नाहीं जैसा । तैसे ऐक्य योगसंन्यासा । वोळखे जो ॥30॥ तयासींचि जगीं पाहलें । आपणपें तेणेंचि देखिलें । जया सांख्ययोग जाणवले । भेदेंविण ॥31॥
संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः । योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति ॥6॥
जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता । तो महासुखाचा निमथा । वहिला पावे ॥32॥ येरा योगस्थिति जया सांडे । तो वायांचि गा हव्यासीं पडे । परि प्राप्ति कहीं न घडे । संन्यासाची ॥33॥
योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेद्रियः । सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥7॥
जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें । गुरुवाक्यें मन धुतलें । मग आत्मस्वरुपीं घातलें । हारौनिया ॥34॥ जैसें समुद्रीं लवण न पडे । तवं वेगळे अल्प आवडे । मग होय सिंधूचि एवढें । मिळे तेव्हां ॥35॥ तैसें संकल्पोनि काढिलें । जयाचें मनचि चैतन्य जाहलें । तेणें एकदेशियें परी व्यापिलें । लोकत्रय ॥36॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसें द्वयर्थ हें बोलतां, आम्हां नेणतयांचिया चित्ता…
अर्थ
एरवी तरी अर्जुना, जे पूर्णपणे अज्ञानी आहेत, ते सांख्ययोग आणि कर्मयोग यांचे स्वरुप कसे जाणू शकतील ? ॥26॥ ते स्वभावत:च मूर्ख असतात, म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. एरवी प्रत्येक दिव्याचे प्रकाश काय वेगवेगळे आहेत? ॥27॥ एकाचेच चांगले आचरण करून ज्यांनी संपूर्ण रीतीने तत्वांचा अनुभव घेतला ते दोन्ही (मार्ग) एकच आहेत, असे समजतात. ॥28॥
सांख्य मार्गाने जाणार्यांना जे (मोक्षरूपी) स्थान प्राप्त होते, तेच (निष्काम) कर्मयोगाचे अनुष्ठान करणारांनाही प्राप्त होते. सांख्ययोग आणि कर्मयोग हे एकच आहेत, असे जाणणारा खरा ज्ञाता होय. ॥5॥
आणि सांख्य मार्गाने जे मिळते तेच योगाने प्राप्त होते. म्हणून अशा रीतीने या दोन मार्गात सहजच ऐक्य आहे. ॥29॥ पाहा, आकाश आणि पोकळी यांच्यामध्ये ज्याप्रमाणे भिन्नता नाही, त्याप्रमाणे कर्मयोग आणि सांख्ययोग यांची एकता ज्याला पटलेली असते ॥30॥ (असा), ज्याला सांख्य आणि कर्मयोग अभिन्नतेने पटले, त्यालाच जगात उजाडले, (ज्ञानप्राप्ती झाली) आणि त्यानेच आत्मस्वरूप पाहिले. ॥31॥
हे महाबाहो, पण कर्मयोगावाचून कर्मसंन्यासाची प्राप्ती होणे दुष्कर आहे. कर्मयोगयुक्त मुनीला ब्रह्माची प्राप्ती लवकर होते. ॥6॥
अर्जुना, जो निष्काम कर्म करण्याच्या हातवटीच्या रस्त्याने मोक्षरूप पर्वतावर चढतो, तो परमानंदरूपी शिखर त्वरेने गाठतो. ॥32॥ त्याहून दुसरा, ज्याचे हातून कर्मयोगाचे अनुष्ठान होत नाही, तो व्यर्थच (संन्यासाच्या) छंदात पडतो. परंतु त्याला संन्यासाची प्राप्ती केव्हाच घडत नाही. ॥33॥
निष्काम कर्मयोगाचे ठिकाणी रत असलेला, शुद्धचित्त, जितदेह, जितेंद्रिय आणि ज्याचा आत्मा सर्व भूतांच्या ठिकाणी असणारा जो आत्मा त्याच्याशी एकरूप झालेला आहे, असा मनुष्य कर्म करीत असला तरी, त्यापासून अलिप्त असतो. ॥7॥
ज्याने विषयांपासून हिरावून घेतलेले आपले मन गुरूपदेशाने स्वच्छ करून आत्मस्वरूपात मुरवून ठेवले, ॥34॥ समुद्रात मीठ पडले नाही, तोपर्यंत ते वेगळे अल्प असे दिसते, मग ज्यावेळी समुद्राशी त्याचा संयोग होतो, त्यावेळी ते समुद्राएवढे होते ॥35॥ त्याप्रमाणे संकल्पापासून दूर गेल्यामुळे ज्याचे चित्त चिद्रूप झाले, तो परिछिन्न दिसला तरी, त्याने तिन्ही लोक व्यापले आहेत, असे समज. ॥36॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : मी माझें ऐसी आठवण, विसरलें जयाचें अंतःकरण…


