वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पाचवा
अर्जुन उवाच : संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि । यत् श्रेय एतयोरेकं तत् मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥1॥
मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे । हां हो हें कैसें तुमचे बोलणें । एक होय तरी अंतःकरणें । विचारूं ये ॥1॥ मागां सकळ कर्माचा संन्यासु । तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु । तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु । पोखीतसां पुढती ॥2॥ ऐसें द्वयर्थ हें बोलतां । आम्हां नेणतयांचिया चित्ता । आपुलिये चाडे अनंता । उमजू नोहे ॥3॥ ऐकें एकसारातें बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे । हें आणिकीं काय सांगिजे । तुम्हांप्रति ॥4॥ तरी याचिलागीं तुमतें । म्यां राउळासी विनविलें होतें । जे हा परमार्थु ध्वनितें । न बोलावा ॥5॥ परी मागील असो देवा । आतां प्रस्तुतीं उकलु देखावा । सांगें दोहींमाजि बरवा । मार्गु कवण ॥6॥ जो परिणामींचा निर्वाळा । अचुंबितु ये फळा । आणि अनुष्ठितां प्रांजळा । सावियाचि ॥7॥ जैसें निद्रेचें सुख न मोडे । आणि मार्गु तरी बहुसाल सांडे । तैसें सोकासनां सांगडे । सोहपें होय ॥8॥ येणें अर्जुनाचेनि बोलें । देवो मनीं रिझले । मग होईल ऐकें म्हणितलें । संतोषोनियां ॥9॥ देखा कामधेनुऐसी माये । सदैवा जया होये । तो चंद्रुही परी लाहे । खेळावया ॥10॥ पाहें पां शंभूची प्रसन्नता । तया उपमन्यूचिया आर्ता । काय क्षीराब्धि दूधभाता । देईजेचिना ॥11॥ तैसा औदार्याचा कुरुठा । कृष्ण आपु जाहलिया सुभटा । कां सर्व सुखांचा वसौटा । तोचि नोहावा ॥12॥ एथ चमत्कारु कायसा । गोसावी लक्ष्मीकांताऐसा । आतां आपुलिया सवेसा । मागावा कीं ॥13॥ म्हणोनि अर्जुनें म्हणितलें । तें हांसोनि येरें दिधले । तेंचि सांगेन बोलिले । काय कृष्णें ॥14॥
हेही वाचा – Dnyaneshwari : म्हणऊनि संशयाहूनि थोर, आणिक नाहीं पाप घोर…
अर्थ
अर्जुन म्हणाला, ‘हे श्रीकृष्णा, कर्माचा त्याग करावा (असे तू सांगतोस) आणि पुनः कर्माचे अनुष्ठान करावे असे(ही) तू सांगतोस. या दोन्हीपैकी (तुझ्या मताने) जे खरोखर श्रेयस्कर असेल ते एक मला निश्चित सांग.’ ॥1॥
मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, अहो, हे असे कसे तुमचे बोलणे? यात (बोलण्यात) एकवाक्यता असेल तर, त्यासंबंधी मनाने काही विचार करता येईल. ॥1॥ सर्व कर्मांचा त्याग करावा, असे तुम्हीच मागे अनेक रीतीने सांगितले होते, तर आता कर्मयोगाविषयीच्या भराला जास्त उत्तेजन का देता? ॥2॥ श्रीअनंता, असे हे दुटप्पी बोलले असता आमच्यासारख्या अल्प समजुतीच्या लोकांच्या मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाही. ॥3॥ ऐका, एक तत्व जर सांगावयाचे असेल तर, एकच निश्चितपणे सांगितले पाहिजे, हे तुम्हाला दुसर्यांनी सांगवयास पाहिजे काय? ॥4॥ एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या थोरांना (मागे) विनंती केली होती की, हे तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नये. ॥5॥ परंतु देवा, मागे झाले ते राहू द्या. आता यावेळी उलगडा करा आणि या दोन मार्गांपैकी चांगला कोणता ते सांगा. ॥6॥ ज्याचा शेवट शुद्ध असून ज्याचे फळ अचूक प्राप्त होते आणि ज्याचे अनुष्ठान सहजच सरळ आहे. ॥7॥ ज्याप्रमाणे झोपेच्या सुखात व्यत्यय न येता रस्ता तर बराच काटत जातो, अशा सुखकारक वाहनासारखा जो सोयीचा मार्ग असेल (तो सांगा.) ॥8॥ अर्जुनाच्या या बोलण्याने देव मनात आनंदीत झाले. मग संतुष्ट होऊन म्हणाले, ‘ऐक तसेही होईल -’ ॥9॥ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पाहा ज्या दैववानाला कामधेनूसारखी आई मिळते, त्याला चंद्र पण खेळावयास मिळतो. ॥10॥ हे पाहा, श्री शंकरांनी प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्याला दूधभाताकरता क्षीरसमुद्र दिला नाही का? ॥11॥ त्याप्रमाणे उदारपणाचे घर, जो श्रीकृष्ण, तो अर्जुनाच्या अधीन झाल्यावर मग तो (अर्जुन) सर्व सुखांचे वसतीस्थान का होऊ नये ? ॥12॥ यात आश्चर्य कसले? लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला असता आता आपल्याला हवे तसे त्याने का मागून घेऊ नये? ॥13॥ म्हणून अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन दिले. (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) श्रीकृष्ण जे काय म्हणाले, तेच मी सांगेन. ॥14॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसें बिंब तरी बचकें एवढें, परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें…


