वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय चौथा
जया काळज्वरु आंगीं बाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे । आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानी ॥200॥ तैसें साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें । संशयीं तो नोळखे । हिताहित ॥201॥ हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं । तैसें संशयीं असतां काहीं । मना नये ॥202॥ म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर । हा विनाशाची वागुर । प्राणियासी ॥203॥ येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाचि एकु जिणावा । जो ज्ञानाचिया अभावा- । माजी असे ॥204॥ जैं अज्ञानाचे गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे । म्हणोनि सर्वथा मागु मोडे । विश्वासाचा ॥205॥ हृदयीं हाचि न समाये । बुद्धींते गिंवसूनि ठाये । तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥206॥
योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसंछिन्नसंशयम् । आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय ॥41॥
ऐसा जरी थोरावे । तरी उपायें एकें आंगवे । जरी हाती होय बरवें । ज्ञानखड्ग ॥207॥ तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें । निखळु हा निवटे । मग निःशेष खता फिटे । मानसींचा ॥208॥
तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः । छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥42॥
याकारणें पार्था । उठीं वेगीं वरौता । नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥209॥ ऐसें सर्वज्ञानाचा बापु । जो कृष्ण ज्ञानदीपु । तो म्हणतसे सकृपु । ऐकें राया ॥210॥ तंव या पूर्वापर बोलाचा । विचारुनि कुमरु पंडूचा । कैसा प्रश्नु हन अवसरींचा । करिता होईल ॥211॥ ते कथेची संगति । भावाची संपत्ति । रसाचि उन्नति । म्हणिपेल पुढां ॥212॥
हेही वाचा – Dnyaneshwari : एथ ज्ञान हें उत्तम होये, आणिकही एक तैसें कें आहे…
अर्थ
ज्याला विषमज्वर झालेला असतो, त्याला जसे शीत-उष्ण काही कळत नाही. तो अग्नी आणि चांदणे ही दोन्ही सारखीच मानतो ॥200॥ त्याप्रमाणे खरे आणि खोटे, प्रतिकूल आणि अनुकूल, हित आणि अहित, ही संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाहीत. ॥201॥ पाहा, ही रात्र आणि हा दिवस, असे जन्मांधाला ज्याप्रमाणे ठाऊक नसते, त्याप्रमाणे जोपर्यंत (मनुष्य) संशयग्रस्त आहे, तोपर्यंत त्याच्या मनाला काहीच पटत नाही. ॥202॥ म्हणून संशयापेक्षा मोठे असे दुसरे घोर पातक कोणतेच नाही. हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे. ॥203॥ एवढ्याकरिता तू याचा त्याग करावा. जेथे ज्ञानाचा अभाव असतो, तेथेच जो असतो. त्या या एकट्यालाच पहिल्याने जिंकावे. ॥204॥ जेव्हा अज्ञानाचा गाढ अंधार पडतो, तेव्हा हा मनात फार वाढतो. म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो. ॥205॥ हा फक्त हृदयालाच व्यापून रहातो असे नाही तर, बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात. ॥206॥
हे धनंजया ! योगाने ज्याने सर्व कर्माचा संन्यास केला आहे (ज्यांची कर्मे नाश पावली आहेत) आणि अद्वैत ज्ञानाने ज्यांचे संशय नष्ट झाले आहेत, अशा आत्मवेत्त्या (ज्ञानी) मनुष्याला कर्मे बांधत नाहीत. ॥41॥
एवढ जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो. चांगले ज्ञानरूप खड्ग जर हाती असेल ॥207॥ तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो. मग मनावरील सर्व मळ नि:शेष नाहीसा होतो. ॥208॥
म्हणून अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या आणि स्वत:च्या हृदयाच्या ठिकाणी असलेल्या या संशयाचा ज्ञानरूपी खड्गाने छेद करून (आपल्या क्षात्रधर्माला उचित अशा) कर्मयोगाचा अवलंब कर. हे भरतकुलोत्पन्ना, युद्धाला उभा राहा. ॥42॥
एवढ्याकरिता अर्जुना, अंत:करणात असलेल्या सर्व संशयांचा नाश करून लवकर उठ पाहू, ॥209॥ (संजय म्हणाला) राजा धृतराष्ट्रा ऐक. सर्व ज्ञानाचा जनक आणि ज्ञानाचा केवळ दीपच असा जो श्रीकृष्ण तो मोठ्या कृपाळू्पणाने (याप्रमाणे) अर्जुनास बोलला. ॥210॥ पुढे या मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन कसा समयोचित प्रश्न विचारील ॥211॥ ती संगतवार कथा, ती अर्थाची खाण, तो रसांचा उत्कर्ष, पुढे सांगण्यात येईल. ॥212॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जया प्राणियाचां ठायीं, इया ज्ञानाची आवडी नाहीं…


