वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय चौथा
श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः । ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥39॥
तरी आत्मसुखाचिया गोडिया । विटे जो कां सकळ विषयां । जयाचां ठायीं इंद्रियां । मानु नाही ॥187॥ जो मनासी चाड न सांगे । जो प्रकृतीचे केलें नेघे । जो श्रद्धेचेनि संभोगें । सुखिया जाहला ॥188॥ तयातेंचि गिंवसित । हेंहें ज्ञान पावे निश्चित । जयामाजि अचुंबित । शांति असे ॥189॥ तें ज्ञान हृदयीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे । मग विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा ॥190॥ मग जेउती वास पाहिजे । तेउती शांतीचि देखिजे । तेथ अपारा पारु नेणिजे । निर्धारितां ॥191॥ ऐसा हा उत्तरोत्तरु । ज्ञानबीजाचा विस्तारु । सांगता असे अपारु । परि असो आतां ॥192॥
अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति । मायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥40॥
ऐकें जया प्राणियाचां ठायीं । इया ज्ञानाची आवडी नाहीं । तयाचें जियालें म्हणों काई । वरी मरण चांग ॥193॥ शून्य जैसें गृह । कां चैतन्येंवीण देह । तैसें जीवित तें संमोह । ज्ञानहीना ॥194॥ अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परी ते चाड एकी जरी वाहे । तरी तेथ जिव्हाळा कांही आहे । प्राप्तीचा पैं ॥195॥ वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परी ते आस्थाही न धरी मानसीं । तरी तो संशयरूप हुताशीं । पडिला जाण ॥196॥ जे अमृतही परि नावडे । ऐसें सावियाचि आरोचकु जैं पडे । तैं मरण आले आलें असे फुडें । जाणों ये कीं ॥197॥ तैसा विषयसुखें रंजे । जो ज्ञानेंसींचि माजे । तो संशये अंगीकारिजे । एथ भ्रांति नाहीं ॥198॥ मग संशयी जरी पडला । तरी निभ्रांत जाणें नासला । तो ऐहिकपरत्रा मुकला । सुखासी गा ॥199॥
हेही वाचा – Dnyaneshwari : देखें विश्वभ्रमाऐसा, जो अमूर्ताचा कवडसा…
अर्थ
श्रद्धावान, तत्पर आणि जितेंद्रिय अशा मनुष्याला ज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर अत्यंत श्रेष्ठ अशी शांती त्याला प्राप्त होते. ॥39॥
तर आत्मसुखाची चटक लागल्यामुळे जो सर्व विषयांना विटतो, ज्याच्या ठिकाणी इंद्रियांचा बडेजाव नसतो. ॥187॥ जो कशाचीही इच्छा मनात येऊ देत नाही, जो प्रकृतीकडून होणारी कर्मे (त्या कर्माचे कर्तृत्व) आपल्याकडे घेत नाही, श्रद्धेच्या उपभोगाने जो सुखी झालेला असतो. ॥188॥ ज्या ज्ञानात निर्भेळ शांतीची वसती असते, ते ज्ञान त्याला शोधीत येऊन निश्चित प्राप्त होते. ॥189॥ ते ज्ञान अंत:करणात स्थिर होते आणि मग शांतीचा अंकुर फुटतो. मग आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळच प्रकट होतो. ॥190॥ मग जिकडे पाहील तिकडे त्याला शांतीच दिसते. त्या अमर्याद शांतीचे पैलतीर कुठे आहे, ते विचार करूनही समजत नाही. ॥191॥ अशा या ज्ञानरूप बीजाचा उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार सांगू लागलो तर तो अपार आहे. पण ते आता राहू दे. ॥192॥
आत्मज्ञानहीन, श्रद्धाहीन आणि संशयी मनुष्य नाश पावतो. (त्यातून) संशयी मनुष्याला तर इहलोक साधत नाही, परलोकही साधत नाही आणि सुखही मिळत नाही. ॥40॥
ऐक, ज्या प्राण्याच्या ठिकाणी या ज्ञानाची आवड नाही, त्याच्या जगण्याला काय म्हणावे? त्यापेक्षा मरण बरे. ॥193॥ जसे ओसाड घर किंवा जसा प्राणरहित देह (व्यर्थ होय), तसे ज्ञानहीनास जीवित हे केवळ शून्यवत् आहे. ॥194॥ अथवा खरोखर ज्ञानाची प्राप्ती झालेली नसली, पण त्याची नुसती इच्छा जरी मनुष्याने बाळगली तरी, त्याला ज्ञानप्राप्त होण्याची काहीतरी आशा आहे. ॥195॥ एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला? पण जो त्याच्याबद्दल मनात आस्थाही बाळगत नाही, तो संशयरूप अग्नीत पडला, असे समज. ॥196॥ अमृतही आवडत नाही, अशी अरुची ज्यावेळेस स्वभावत:च येते, त्यावेळेस मरण ओढवले आहे, असे निश्चित समजावे. ॥197॥ त्याप्रमाणे जो विषयसुखाने रंगून जातो आणि ज्ञानाविषयी जो बेपर्वा असतो, तो संशयाने घेरला जाईल, यात संशय नाही. ॥198॥ अशा रीतीने जो संशयात पडला त्याचा नि:संशय घात झाला, असे समज. तो इहलोकातील सुखाला आचवला. ॥199॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : एथ ज्ञान हें उत्तम होये, आणिकही एक तैसें कें आहे…


