गेल्या महिन्यातील ही गोष्ट. मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमधल्या मराठी चित्रपटाच्या प्रीमियर शोची निमंत्रण पत्रिका कुरिअरवाला देऊन गेला. मी त्यावरून नजर टाकली पण एकही ओळखीचं नाव किंवा संदर्भ मला दिसला नाही… मी जास्त विचार न करता ती निमंत्रण पत्रिका बाजूला ठेवून दिली.
पण प्रकरण इथेच थांबलं नाही…
पुढच्या आठवड्यात मेसेंजरवर मेसेज आला… “काका, येताय ना माझ्या ‘चित्रपटाच्या शो’ला? नक्की या… मी आतुरतेने वाट बघतोय.” मेसेज पाठवणाऱ्याचे नाव वाचलं आणि वीज चमकावी तसं क्षणांत काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला!
त्याची आणि माझी ओळख खरंतर, आभासी जगातील फेसबुकवरची. चित्रपट क्षेत्रात धडपडणारा एक तरुण मुलगा होता तो. प्रचंड मेहनत करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरू होते आणि त्याला हळूहळू यश देखील येत होते. अशाच धडपडणाऱ्या मुलांच्या सोबत कोल्हापूरहून आलेला हा मुलगा पेइंगगेस्ट म्हणून राहात होता. या धडपडीत आवश्यक तेवढ्या खाण्यापिण्याकडे प्रचंड दुर्लक्ष होऊन तो ॲनिमिक झाला होता. अंगात रक्त चढवावं लागत होतं वारंवार हॉस्पिटलमध्ये भरती होऊन! ‘स्वबळावर बरं होणार’ या जिद्दीने शक्यतो घरच्या मदतीऐवजी मित्रमंडळींना त्याने मदतीसाठी आवाहन केले होते. मला पण मेसेज आला होता त्याचा…
“काका मला वाचवा!”
पुढे त्याने खरी परिस्थिती सांगून मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. त्याला हवी असलेली रक्कम फार मोठी नव्हती म्हणून मी देखील ती तातडीने दिली होती. शिवाय, रुग्णसेवेला वाहून घेतलेल्या काही सामाजिक संस्थांचे संपर्क क्रमांक त्याला पाठवून दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी ज्यांनी ज्यांनी मदतीचे हात पुढे केले, त्या सर्वांचे त्याने मनापासून आभार मानले होते. तशा आशयाचा मेसेज मला देखील त्याने पाठवला होता. मी पाठवलेल्या संस्थेच्या नावांपैकी एका संस्थेतून आवश्यक तेवढी आर्थिक मदत मिळवण्यात तो यशस्वी झाला असल्याचे त्याने आवर्जून कळवलं होते मला.
हेही वाचा – सदूकाका अन् मानाचा गणपती…
कितीतरी वर्षे उलटून गेली, या गोष्टीला… आणि आज हातात पडली होती ही निमंत्रण पत्रिका!
त्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मी पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचलो. प्रवेशद्वारावर उभा असलेला एक तरुण मला बघताच पुढे आला आणि माझ्या पाया पडून आशीर्वाद घेतला. आजूबाजूला उपस्थित असणारे मान्यवर क्षणांत अवाक् झाले, हे बघून. मला अवघडल्यासारखे झाले होते.
हेही वाचा – मायेचा रहाट…
मला गच्च मिठी मारत तो म्हणाला, “काका, माझी नव्याने ओळख करून द्यायची गरज आहे का?” मी मान हलवून ‘नाही’ म्हणालो. माझा हात घट्ट धरून तो मला आत घेऊन गेला आणि सन्माननीय लोकांसाठी राखीव असलेल्या रांगेतील एका खुर्चीवर बसण्याची मला विनंती केली. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवून पोटभर आशीर्वाद दिला आणि ‘’काका मला वाचवा’ असा मेसेज यापुढे कधीही येणार नाही, याची कायम काळजी घेण्याचं’ वचन त्याच्याकडून घेऊन मी खुर्चीवर स्थानापन्न झालो.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


