वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय चौथा
आतां अविवेककुमारत्वा मुकले । जयां विरक्तीचें पाणिग्रहण जाहलें । मग उपासन जिहीं आणिलें । योगाग्नीचें ॥122॥
दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते । ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥25॥
जे यजनशील अहर्निशीं । जिहीं अविद्या हविली मनेंसीं । गुरुवाक्यहुताशीं । हवन केलें ॥123॥ तिहीं योगाग्निकीं यजिजे । तो दैवयज्ञु म्हणिजे । जेणें आत्मसुख कामिजे । पंडुकुमरा ॥124॥ दैवास्तव देहाचें पाळण । ऐसा निश्चयो परिपूर्ण । जो चिंतीना देहभरण । तो महायोगी जाण दैवयोगें ॥125॥ आतां अवधारीं सांगेन आणिक । जे ब्रह्माग्नी साग्निक । तयांतें यज्ञेंचि यज्ञु देख । उपासिजे ॥126॥
श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति । शब्दादीन् विषयानन्य । इंद्रियाग्निषु जुह्वति ॥26॥
एथ संयमाग्निहोत्री । जे युक्तित्रयाच्यां मंत्रीं । यजन करिती पवित्रीं । इंद्रियद्रव्यीं ॥127॥ एकां वैराग्यरवि विवळे । तंव संयती विहार केले । तेथ अपावृत्त जाहले । इंद्रियानळ ॥128॥ तिहीं विरक्तीची ज्वाळा घेतली । तंव विकारांचीं इंधनें पळिपलीं । तेथ आशाधूमें सांडिलीं । पांचही कुंडें ॥129॥ मग वाक्यविधीचिया निरवडी । विषयआहुति उदंडी । हवन केलें कुंडी । इंद्रियाग्नीचां ॥130॥
सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे । आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥27॥
हेही वाचा – Dnyaneshwari : कैसी अधिकाधिक आवडी, घेत महासुखाची गोडी…
अर्थ
आता ज्यांचे अविवेकाचे बालपण गेलेले आहे (म्हणजे विवेकरूप तारुण्य ज्यांना प्राप्त झालेले आहे), ज्यांनी विरक्तीशी लग्न लाविले आहे आणि मग ज्यांनी योगरूप अग्नीची उपासना स्वीकारली आहे ॥122॥
दुसरे योगी दैवयज्ञाची उपासना करतात आणि कित्येक योगी ब्रह्मरूपी अग्नीच्या ठिकाणी यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात. ॥25॥
जे रात्रंदिवस यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत, ज्यांनी गुरुवाक्यरूपी अग्नीमध्ये मनासह अविद्येची आहुती देऊन हवन केले आहे, ॥123॥ ते योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले अग्निहोत्री जो यज्ञ करतात, त्यास दैवयज्ञ असे म्हणतात. अर्जुना, त्यात आत्मसुखाचीच इच्छा असते. ॥124॥ देहाचे पालन प्रारब्धवशात होत असते, असा ज्याचा पूर्ण निश्चय झालेला असतो, तो देहाच्या पोषणाविषयी मनात चिंता वाहात नाही. तो या दैवयज्ञरूप योगाने महायोगी झालेला आहे, असे समज. ॥125॥ दुसरा प्रकार आता तुला सांगतो ऐक. जे ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्री आहेत, ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात. ॥126॥
दुसरे कोणी संयस्वरुपी अग्नीच्या ठिकाणी श्रोत्र-आदिकरून इंद्रियांचे हवन करतात. कित्येक इंद्रियरुपी अग्नीच्या ठिकाणी शब्द-आदी करून विषयांची आहुती देतात. ॥26॥
धारणा-ध्यान-समाधिरूप संयम, हेच कोणी अग्निहोत्र, त्याचे आचरण करणारे कित्येक मूलबंधादिक तीन बंधरूपी मंत्रद्वारा इंद्रियरूपी पवित्र द्रव्यांनी यज्ञ करतात. ॥127॥ दुसरे कित्येक वैराग्यरूपी सूर्य उगवल्याबरोबर संयमरूप कुंडाची रचना करतात आणि मग त्या कुंडात इंद्रियरूप अग्नी प्रकट होतो. ॥128॥ त्या इंद्रियरूप अग्नीतून वैराग्याची ज्वाळा निघते, तेव्हा कामक्रोधादी विकारांची लाकडे पेटू लागतात. त्यावेळी आहवनीयादिक अग्नी असलेल्या इंद्रियरूपी पाच कुंडातून आशारूप धूर निघून जातो. ॥129॥ मग वेदात सांगितलेल्या विधिवाक्याच्या कुशलतेने इंद्रियरूपी अग्नी असलेल्या कुंडात विषयरूप अनेक आहुति देऊन यज्ञ करतात. ॥130॥
दुसरे कोणी इंद्रियांची सर्व कर्मे आणि प्राणांची सर्व कर्मे यांची, ज्ञानरूपी अग्नीने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयमस्वरुपी योगाग्नीमध्ये आहुती देतात. ॥27॥
क्रमश:


