चंद्रकांत पाटील
आदिती गार्डनमध्ये रोज सायंकाळी ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा भरायचा… चेष्टा, विनोद चालायचे, वाढदिवस साजरे व्हायचे, नाटक,सिनेमा, राजकारण यांच्यावर गप्पा चालायच्या… वसंतराव या सर्वांमध्ये भरभरून भाग घ्यायचे… अगदी आनंदी आनंद असे. पण आज वसंतराव या मिटींगमध्ये नव्हते. दूरवरच्या झाडाखाली खिन्नपणे बसून राहिले होते. आकाश ढगाळ झालेले… एरवी वार्याच्या झुळकेने हालणारी झाडे, वेली स्तब्ध झाली होती… वातावरण सुन्न झाले होते… केव्हाही पाऊस पडेल असे वाटत होते.
वसंतराव एका नामांकित कंपनीतून रिटायर झाले होते, तेव्हापासून ते पुण्यातच राहत. वसंतरावानां एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी इंग्लंडला आणि मुलगा यूएसमध्ये! घरी दोघेच नवराबायको. सकाळी उठल्या-उठल्या हास्यक्लब, योगा नंतर चहा… तोपर्यत पेपर आलेला असे, मग पेपर वाचून झाल्यावर ब्रेकफास्ट… पुढे निवांतपणे दाढी अन् आंघोळ! तदनंतर मिसेसला स्वयंपाकात मदत करणे… जेवण झाल्यावर दोन वाजताच्या बातम्या बघायच्या आणि मग विश्रांती! रात्री एखाददुसरी टीव्ही सीरियल बघणे, नंतर झोप… असा त्यांचा दिनक्रम असे… मधे मधे व्हॉट्सॲप आणि फेसबुक असेच जोडीला!
वसंतरावांचं वैशिष्ट म्हणजे लोकांच्या ओळखी काढणे, चर्चा करणे, सायंकाळी पाच वाजता मिस्टर ॲण्ड मिसेस फिरायला जात असत, एखादा नवखा माणूस दिसला आणि त्याच्याशी ओळख काढायची झाली तर, त्याला ते म्हणत, “आपण स्टेट बँकेत होता काय? मी तुम्हाला पाहिल्या सारखे वाटते…” आपसुकच तो माणूस खरी माहिती देत असे, “नाही… नाही, मी स्टेट बँकेमध्ये नव्हतो, मी महाराष्ट्र बँकेत होतो. तिथून रिटायर झालो…” आणि मी सध्या काय करतो, वगैरे वगैरे….
तसेच एखादी ओळखीची कामवाली दिसली तर “काय गो, बऱ्याच दिवसांत दिसली नाहीस?” असे विचारत. लहान मुलांना “तुझे नाव काय रे, कितवीत आहेस?” असे विचारत. वसंतराव मनाने फार निर्मळ आणि हळवे होते. लहान मुलांसाठी चॉकलेट खिशात ठेवीत आणि मुले दिसली की त्यांना ती देत असत. चॉकलेटच्या बाबतीत त्यांच्यावर मिसेस रागवत असे, कारण त्या म्हणत असत “अशी चॉकलेट देत जाऊ नका, मुलांच्या आयांना बरे वाटत नाही…”
वसंतराव सोसायटीतल्या आर बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहात… बिल्डिंग सर्वसोयींनी युक्त अशी होती. नवव्या मजल्यावर ब्रह्माकुमारी सेंटर होते, तिथे ते Meditation साठी जात असत. लिफ्टमध्ये कोणी भेटल्यास त्याच्याशी बोलत असत… बिल्डिंगमध्ये बहुतांशी लोक त्यांच्या ओळखीचे झालेले, पण भाड्याने दिलेल्या काही फ्लॅटमध्ये कित्येकवेळा नवीनच कुटुंब येऊन राहायला लागे, त्यामुळे त्याचा पत्ता लागत नसे. सवयीप्रमाणे प्रत्येक नवीन माणसाची ओळख करून घेतल्याशिवाय वसंतरावांना चैन पडत नसे. त्यामुळे ते त्यांना घरी बोलवत असत, आपुलकीने चौकशी करत आणि जाताना सांगत… “काही लागले सवरले तर, सांगा… संकोच करू नका!” याच सवयीमुळे त्यांची सर्वांशी ओळख होती, शिवाय भेटल्यावर ‘हाय’, ‘हॅलो’ होत असे…
वसंतरावांच्या शेजारचा फ्लॅट जाधवांचा होता, ते राहात केशवनगरला आणि त्यांनी हा फ्लॅट भाड्याने दिला होता. सध्या तिथे कोणीतरी रमेश नावाचा आयटी इंजिनीअर राहायला आला होता. चांगला सज्जन मुलगा होता, एकटाच राहत असे. तो एका मोठ्या आयटी कंपनीत काम करीत होता. रात्री उशिरा घरी येई. मोबाइलमध्ये काही बिघडले किंवा कळाले नाही तर, वसंतराव त्याला विचारीत असे, त्यामुळे त्यांचा स्नेह वाढला होता.
रोजच्या प्रमाणे सायंकाळी सहा वाजता वसंतराव ब्रह्माकुमारी सेंटरला जायला निघाले… पांढरी विजार, पांढरा नेहरूशर्ट, पांढरे शुभ्र केस, गुळगुळीत दाढी आणि डोळ्यावर सोनेरी काडीचा चष्मा असा त्यांचा पेहराव… नेहमीप्रमाणे ते लिफ्ट समोर आले आणि वर जाण्याचे बटन दाबले. थोड्याच वेळात लिफ्ट वर आली, दार उघडले पाहतात तर त्यामध्ये एक सहा-सात वर्षांची मुलगी होती. बहुदा शाळेतून आली असावी, कारण तिच्याकडे दप्तर होते. मुलगी एकदम गुटगुटीत, गोरीपान, पाणिदार डोळे, केसांचा बॉबकट अशी होती. तिला सातव्या मजल्यावर जायचे असावे, कारण तिने सात नंबरचे बटण दाबले होते. वसंतरावना नवव्या मजल्यावर जायचे होते… वसंतरावांनी तिला आज पहिल्यांदाच पाहिले. मुलीचा चेहरा ओळखीचा नव्हता, शिवाय महाराष्ट्रीयपण वाटत नव्हती. यामुळे त्यांनी तिला हिंदीतच विचारले… “क्या नाम है तेरा?” तेवढ्यात लिफ्टमधील लाइट गेले आणि लिफ्टमध्ये अंधार झाला… लिफ्ट मधेच अडकून पडली होती!
वसंतरावानी मोबाइलचा लाइट लावला आणि इमरजन्सी बेल वाजवली… वॉचमनला फोन लावायचा प्रयत्न केला, परंतु रेंज नसल्याने फोन लागला नाही. मोबाइलचा लाइट अंधूक व्हायला लागला… बराच वेळ झाला पण लाइट येईना अन् वाचमनही दार उघडेना. मुलगी घाबरली आणि रडायला लागली… वसंतरावांनी परत परत इमरजन्सी बेल वाजवली. मुलीला आधार देण्यासाठी पाठीवर थोपटल्यासारखे केले, खिशातले एक चॉकलेट काढून दिले. “रो मत अभी लाइट आयेगी,” असे सांगून तिला आधार देण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा – जीवनाचे टार्गेट
बर्याच वेळाने वॉचमन आला दार उघडले… तर लिफ्ट पाचव्या मजल्यावर पोहचली होती. वंसतरावांनी त्या वॉचमनला बर्यापैकी झापला, “अरे, वेळेवर येत जा! इथे काय अवस्था होते माहीत आहे का?” वगैरे वगैरे… अन् सुस्कारा टाकत, “सुटलो बुवा एकदाचा…” असे म्हणत ते लिफ्टच्या बाहेर पडले. तेवढ्यात त्यांना मिसेसचा फोन आला की, “तुमचे मित्र आलेत, तुम्ही घरी या.” म्हणून ते वाचमनला म्हणाले, “अरे, हिला जरा सातव्या मजल्यावर हिच्या घरी सोड. मी जरा खाली घरी जातोय. मुलगी घाबरलीय बिचारी.”
मुलीच्या डोळ्यातून अश्रूधारा सुरूच होत्या. चेहरा लालबुंद झाला होता. वसंतरावानी दिलेले चॉकलेट तसेच तिच्या हातात होते, अशा अवस्थेत ती घरी पोहचली. मुलगी इतकी घाबरली होती की, तिला नीट बोलताही येत नव्हते मुलीची आई तिला विचारत होती की, “क्या हुआ? क्या हुआ?” पण एक ना दोन… ती काहीच रिस्पॉन्स देत नव्हती. नेहमी हसतखेळत येणारी मुलगी आज एकदम धास्तावलीय अन् रडतेय… मुलीच्या आईला काहीच बोध होईना. शेवटी नाईलाजाने ती घरी पोहोचवायला आलेल्या वॉचमनला भेटायला गेटवर गेली अन् काय प्रकार आहे, हे विचारू लागली तेव्हा त्यांनी सर्व स्टोरी म्हणजे लिफ्ट बंद पडली, लाइट गेले होते… मुलगी आणि वसंतराव दोघेही बराच वेळ अंधारात अडकले होते. तसेच वसंतरावांनी तुमच्या मुलीला मदत केली, असेही सांगितले. मग तिला उलघडा झाला की, लिफ्ट बंद पडली त्यावेळी काहीतरी घोटाळा झाला असावा. त्यामुळे ही रडते आहे! ती मुलीला म्हणाली, “लिफ्ट में कुछ हुआ क्या? उस आदमी ने तुझे कुछ किया क्या? फिर रोती क्यों है?”
मुलगी काहीच बोलत नव्हती. “बोलती क्यों नही? बोलती क्यो नहीं?” असे म्हणत तिने रागाने तिला एक चापट मारली, त्याबरोबर तिच्या हातातून चॉकलेट खाली पडले अन् ती जास्तीच रडायला लागली. चॉकलेट बघून बाईंच्या मनात नाही नाही ते विचार यायला लागले! त्याला कारणही तसेच होते, गेल्या वर्षी त्या दिल्लीला असताना त्याच्या बहिणीच्या मुलीवर लिफ्टमध्ये अत्याचार झाला होता. त्यावेळी त्या मुलीला पण असेच चॉकलेट दिले गेले होते. त्यामुळे माझ्या मुलीबाबत पण असेच काय तरी घडले असावे? अशी शंका तिच्या मनात यायला लागली. पुन्हा एकदा “तुझे कुछ किया है क्या?” असे तिने दरडावून विचारले; पण मुलगी मान हलवून ‘नाही’ म्हणत होती… शेवटी न राहून ती मुलीला घेऊन वसंतरावांच्या फ्लॅटकडे निघाली…
हेही वाचा – सिंधू मॅडम अन् कलेक्टर शिल्पा…
बाई अगोदरच गोरी त्यांत रागाने तापलेली त्यामुळे लालभडक झालेली… ती कॅरिडॉरमधूनच ओरडत आली… तिच्या मनाने पक्के घेतले होते की, माझ्या मुलीला या म्हाताऱ्याने लिफ्टमध्ये काहीतरी केले आहे! म्हणून ती मुलीला “तुझे उस बुढे ने कुछ किया है क्या
बताओ?” अस म्हणत तिने वसंतरावांच्या फ्लॅटची बेल दाबली. वसंतरावानीच दार उघडले तर, ती आत न येताच बाहेरूनच ओरडत होती, “तुमने मेरी बेटी को चॉकलेट क्यों दिया? तुमने कुछ किया क्या? बताओ? नहीं तो मैं पुलिस को बुलाउंगी… वो क्यों रो रही है?” त्या बाईने एवढा दंगा घातला की, आजूबाजूच्या फ्लॅटमधील सर्व बायका-मुले बाहेर आली… “काय झाले, काय झाले…” करीत एकदम गलका झाला… कुणालाच काही कळेना. तेवढ्यात एका उत्तर भारतीय भाडेकरू बाईने तिला विचारले, “क्या हुआ?” तर ती म्हणाली की, “मेरी लडकी को लिफ्ट में कुछ हुआ है… इसी वजह से वह रो रही है!” ती मुलीच्या सर्व अंगाला हात लावून काय दिसते का, ते पाहत होती. शेवटी तर तिने मुलीचा प्रायव्हेट पार्टही तपासला. त्यामुळे मुलगी जास्तीच रडायला लागली… वसंतरावांनी काही सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकायच्या मन:स्थितीत नव्हती…
“मैं पुलिस स्टेशन जा रही हूं!” असं म्हणत ती निघून गेली. बाकी सर्वजण, ‘काहीतरी भानगड असावी, त्याशिवाय का मुलगी रडत आहे,’ असे म्हणत निघून गेले. “हल्ली कुणाचं काssय सांगता येत नाही,” असं म्हणत जमना काकू निघून गेल्या. एकंदर परिस्थिती बघून…. आलेला मित्र, ‘नंतर येतो’ म्हणून निघून गेला. मित्र निघून गेल्यावर वसंतरावांच्या बायकोने देखील “नक्की काय झाले हो?” म्हणून संशयाने प्रश्न विचारला!
वसंतरावांनी उत्तारादाखल काही सागायचा प्रयत्न केला. पण ते ऐकून न घेताच त्या म्हणाल्या, “तुम्हाला हजार वेळा सांगितलंय की, मुलांना चॉकलेट देत जाऊ नका म्हणून! पण तुम्ही ऐकलंय का? आता भोगा…”
शेजारीपाजारी पण कोणी काही बोलले नाहीत, सर्वजण संशयाने पाहत निघून गेले. वसंतरावांना झाल्या गोष्टीचा खूप मनस्ताप झाला. छातीत दुखू लागले, खूप वाईट वाटू लागले. संध्याकाळी शेजारचा रमेश दार उघडे होते म्हणून आत डोकावला, त्याला वहिनींनी सर्व स्टोरी सांगितली… तद्नंतर त्यांनी मुलीचे वर्णन, ठिकाण विचारले. त्यानुसार मग मुलीच्या फ्लॅटमध्ये चौकशी केली तर, तिथे गुप्ता म्हणून नवीन भाडेकरू राहायला आले होते.
रमेश त्यांच्या घरी गेला तेव्हा मुलीचे वडील पण नुकतेच कामाहून आले होते. चर्चा करता करता असे समजले की, मुलीचे वडील पण रमेशच्याच कंपनीमध्ये काम करतात. शिवाय, ते त्यांच्या भागातलेच निघाले. रमेशने वसंतरावांच्या बद्दल सांगितल्यानंतर गुप्ता म्हणाला, “ठीक हैं, आप कहते हैं तो मान लेते हैं कि He may be decent & not that type of personality but मेरी बीबी भी ऐसा क्यों allegation करती हैं… उसकी भी कुछ वजह होगी, वह भी सुन लो… लास्ट ईयर हम दिल्ली में थे और उसी सोसायटी में एक बुढे ने इसकी बहन की लड़की पर लिफ्ट में अत्याचार किया था और वह भाग गया… उस घटना को वह अभी तक भूली नहीं। that is the background…” चर्चेच्या शेवटी मिसेस गुप्ता पण बाहेर आल्या त्या म्हणाल्या की, “मुलीने शांत झाल्यावर मला सर्वकाही सागितले आहे, पण ती घाबरल्यामुळे लवकर बोलली नाही. त्यामुळे माझा गैरसमज झाला. I am sorry…”
एकदम एवढा संशय घ्यायला नको होता म्हणून त्यांनीही मान्य केले. शेवटी ते तिघेही वसंतरावांच्या घरी आले त्यांनी झाल्याप्रकाराची क्षमा मागितली अन् प्रकरण संपले.
पण झाल्या प्रकारामुळे हळव्या वसंतरावाचं जीवनच बदलून गेलं, ते फार खचून गेले… त्यांचा खेळकरपणा, मोकळेपणा गायबच झाला. कोणाशी बोलायचे म्हटले तर किवा चेष्टा करायची म्हटले तर, ते आजकाल बावरू लागले, एकलकोंडे झाले… आतून उद्ध्वस्त झाले… “माझे काय चुकले, असे त्यांना वाटे. त्यामुळे हल्ली ते कुठेतरी एकटेच कोपर्यात बसलेले दिसत, अन् अश्रूंना वाट मोकळी करून देत…
मोबाइल – 9881307856


