वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय चौथा
हें असो विश्व पाहीं । जयासि आपणपेंवांचूनि नाहीं । आतां कवण तें कर्म कायी । बाधी तयातें ॥112॥ हा मत्सरु जेथ उपजे । तेतुलें नुरेचि जया दुजें । तो निर्मत्सरु काइ म्हणिजे । बोलवरी ॥113॥ म्हणोनि सर्वांपरी मुक्तु । तो सकर्मुचि कर्मरहितु । सगुण परि गुणातीतु । एथ भ्रांति नाहीं ॥114॥
गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः । यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥23॥
तो देहसंगें तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे । पाहतां परब्रह्माचेनि कसें । चोखाळु भला ॥115॥ ऐसाही परी कौतुकें । जरी कर्में करी यज्ञादिकें । तरी तियें लया जाती अशेखें । तयाचांचि ठायीं ॥116॥ अकाळींची अभ्रें जैशीं । उर्मीवीण आकाशीं । हारपती आपैशीं । उदयलीं सांती ॥117॥ तैशीं विधिविधान विहितें । जरी आचरे तो समस्तें । तरी तियें ऐक्यभावें ऐक्यातें । पावतीचि गा ॥118॥
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् । ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥24॥
जें हें हवन मी होता । कां इयें यज्ञीं हा भोक्ता । ऐसीया बुद्धीसि नाही भंगता । म्हणऊनियां ॥119॥ जे इष्टयज्ञ यजावे । तें हविर्मंत्रादि आघवें । तो देखतसे अविनाशभावें । आत्मबुद्धि ॥120॥ म्हणऊनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आले जया सम । तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा ॥121॥
हेही वाचा – Dnyaneshwari : कर्तव्यतेलागीं, जया दुसरें नाहीं जगीं…
अर्थ
पाहा, हे विश्वच ज्याला आपल्याहून वेगळे (दिसत) नाही, आता त्याला कर्म ते कसले आणि ते त्याला बाधा काय करणार? ॥112॥ ज्या द्वैतापासून हा मत्सर उत्पन्न होतो, ते द्वैत ज्याच्या ठिकाणी मुळीच उरलेले नसते, तो निर्मत्सर आहे, हे काय शब्दांनी बोलून दाखवले पाहिजे? ॥113॥ म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे, कर्म करीत असताही कर्मरहित आहे आणि गुणयुक्त असूनही गुणातीत आहे, यात संशय नाही. ॥114॥
ज्याची कर्मफलाविषयी आसक्ती नष्ट झाली आहे, जो मुक्त झाला आहे, ज्ञानाच्या ठिकाणी ज्याचे चित्त स्थिर झाले आहे, जो यज्ञाकरिता कर्माचरण करतो, त्याचे ते सर्व कर्म (त्याच्याच ठिकाणी) लय पावते. ॥23॥
तो देहधारी तर असतोच, पण (निर्गुण) चैतन्यासारखा दिसतो. परब्रह्माच्या कसोटीने त्यास पाहिले असता तो अगदी शुद्ध आहे, असे आढळून येते. ॥115॥ असे असून देखील केवळ कौतुकाने त्याने जरी यज्ञादिक कर्मे केली तरी, ती सर्व त्याच्याच ठिकाणी लय पावतात. ॥116॥ आकाशात अकाली आलेले मेघ ज्याप्रमाणे काही जोर न करता, आले तसे आपोआप जागच्या जागी विरून जातात; ॥117॥ त्याप्रमाणे वेदांनी सांगितलेल्या एकूण एक विधानांचे यथासांग जरी तो अनुष्ठान करतो, तरी त्याच्या ऐक्यभावनेमुळे ती शेवटी ऐक्यालाच मिळतात. (त्याच्या ठिकाणी दुजाभाव नसल्यामुळे त्याच्याच ठिकाणी ती लय पावतात.) ॥118॥
कर्मच ब्रह्म आहे, अशी समता ज्याची आहे, असा पुरुष जे अर्पण करतो ते ब्रह्म, ज्याची आहुती देतो ते ब्रह्म, ज्या अग्नीत आहुती देतो तो अग्नी ब्रह्म, स्वत: आहुती देणाराही ब्रह्म आणि ज्याप्रत जाणार तेही ब्रह्म. (अशी त्याची स्थिती असते.) ॥24॥
कारण, हे यज्ञरूपी कर्म आणि ते करणारा मी, किंवा या यज्ञामध्ये (अमुक) भोक्ता, असा त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी भेद नाही. ॥119॥ जे जे इष्ट यज्ञ तो करतो, त्यातील होमद्रव्ये, मंत्र इत्यादी सर्व तो आत्म्याच्या ठिकाणी स्थिरबुद्धी असलेला पुरुष, ती ब्रह्मच आहेत, अशा बुद्धीने पहातो. ॥120॥ म्हणून कर्म ब्रह्मच आहे, असे साम्य ज्याच्या प्रतीतीला आले, त्याने कर्तव्यकर्म जरी केले तरी अर्जुना, ते नैष्कर्म्यच होय. ॥121॥
हेही वाचा – Dnyaneshwari : कैसी अधिकाधिक आवडी, घेत महासुखाची गोडी…
क्रमश:


