नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते… पुन्हा एकदा तुमच्या भेटीला!
मी ‘लग्नाची बेडी’ सीरियलमध्ये काम करत होते. ‘राघव’ची ‘माई आत्या’… म्हणजे रायाच्या आईची भूमिका होती. आता माझा मुलगा ‘राया’ आर्मीमध्ये असतो आणि तो ड्युटीसाठी एक पोस्टवर जातो अन् तिथून गायब होतो, हरवतो! त्याचे वडील पण शहीद झाले होते. आता ती माई बिचारी या त्या देवस्थानला जाऊन ‘रायाला सुखरूप ठेव… लवकर घरी येऊ दे…’ अशी प्रार्थना करत असते… असे बरेचसे सीन टेलिकास्ट झाले.
सांगायची गोष्ट अशी की, गुढी पाडाव्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या स्वामी समर्थांचा वाढदिवस होता. मी कांदिवलीच्या डहाणूकरवाडी येथील स्वामींच्या मठात दर्शन आणि भंडाऱ्यासाठी गेले होते. अशा गर्दीच्या ठिकाणी मला ओळखणारी माणसे हमखास भेटतात. कौतुक करतात विचारपूस करतात… सेल्फी वगैरे तर असतातच! मलाही छान वाटतं. मीही त्यांच्यात मिसळून जाते.
आता झालं असं की, एक बाई माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, “माई, अहो नका काळजी करू… तुमच्या रायाला काही झालं नसेल. तो हरवला असेल किंवा युद्धकैदी म्हणून पकडला गेला असेल. येईल परत. जास्त त्रास नका करून घेऊ, स्वामी आहेतच…!”
हेही वाचा – बोलीभाषेतली नाती अन् मी!
पुढे त्या काही बोलणार इतक्यात मीच त्यांना थांबवलं आणि म्हटलं, “ताई, एक मिनिट.. नको, स्वामींना मधे आणू नका. त्यांना आधीच खूप भक्तगण आहेत, त्यातील अनेकांचे त्रास त्यांना निवारायाचे आहेत… ही आमची सीरियल आहे. इथे सगळ खोटं असत. नाटक असतं. लेखक लिहितो, दिग्दर्शक सांगतो आणि आम्ही कलाकार त्यानुसार अभिनय करतो… तुम्ही एवढ्या दुःखी नका होऊ. राया माझा खरा मुलगा नाही, तो सैन्यामध्ये नाही आणि तो हरवलेला किंवा शहीदही झालेला नाही. तो उत्तम आहे… दुसरा प्रोजेक्ट करतोय! तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही जी काळजी दाखवली, त्यासाठी खूप खूप आभार.”
त्या बाईंचे डोळे खूप भरून आले होते. त्या बोलल्या काहीच नाहीत. माझ्याकडे बघत राहिल्या… माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, “खूप छान काम करता. तुम्ही आणि तुमचे सगळे कलाकार…”
हेही वाचा – Swami Samarth : स्वामी अन् मुंगळा…
मी “थँक्स” म्हणाले अन् निघाले. पण डोक्यात विचार सुरू झाले… ‘कदाचित, त्या बाई अशा सगळ्या घटनांमधून गेल्या असतील… त्यांचे वडील, भाऊ, नवरा, मुलगा, जावई कोणीतरी शहीद झाले असतील किंवा हरवले असतील. वेळा-उशिराने सापडले असतील. त्यावेळी त्यांनी जे भोगले ते मी समोर ॲक्ट केलं. आम्ही कलाकार ॲक्टिंग करून जातो; पण बरेच लोक काही घटना स्वतःशी जोडून पाहतात…”
देशाच्या संरक्षणासाठी तैनात भारतीय जवान आणि शहिदांना मनापासून मुजरा… आणि त्यांच्या कुटुंबीयांना तर कडक सॅल्यूट!
जय हिंद!!


