हिमाली मुदखेडकर
पुण्यात पाषाण आणि बाणेरच्या मधे सोमेश्वर वाडी नावाचे ठिकाण आहे. इथे साधारण 900 वर्षे जुने सोमेश्वर महादेवाचे एक खूप सुंदर हेमाडपंती मंदिर आहे. मंदिराचा परिसर भव्य असून अतिशय सुबक असे नक्षीकाम केलेले दगडी बांधकाम आहे. येथील शिवलिंग स्वयंभू असल्याचे सांगितले जाते.
मुळा नदीची उपनदी असणार्या राम नदीच्या काठावर हे मंदिर आहे. मंदिराला चार प्रवेश द्वार असून मुख्य प्रवेशद्वारा समोर एक भव्य चाळीस फूट उंचीची दीपमाळ आहे. दगडी कोरीवकाम असणारी एक भिंत सभोवताली असून तिच्या एका कोपर्यात एक छान गॅलरी आहे. त्या गॅलरीत मोडी लिपीतील जुनी पत्रे, चित्रे, काही खास छायाचित्रे जतन करून ठेवली आहेत. मंदिरात ठिकठिकाणी स्मरण शिळा… शिलालेख.. आहेत.
या सर्व पुरातन गोष्टींच्या संदर्भानुसार हे मंदिर बाराव्या शतकातील असल्याचे पुरावे सापडतात. सतराव्या शतकात लाल महालामध्ये वास्तव्य असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांनी इथे अनेकदा भेट दिल्याचे सांगितले जाते. पुढे नानासाहेब पेशव्यांच्या काळात या मंदिर परिसरात उत्खननात सोन्याच्या मोहरांचा खजिना सापडल्याचा दाखला असून हे सोने नानासाहेब पेशव्यांनी याच मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा – भाविकांचे श्रद्धास्थान पुण्यातील चतुःश्रृंगी देवस्थान
मंदिराचा एकूणच परिसर रम्य आणि शांत आहे. पुण्यातील ऐतिहासिक महत्त्व असणार्या इतर वास्तूंमध्ये असते तशी पर्यटकांची गर्दी इथे फारशी नाही. या परिसरातील स्थानिक लोकांनी मंदिराचे पावित्र्य अबाधित ठेवले आहे. श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. फारसे प्रसिद्धी न पावल्यामुळे कदाचित मंदिर स्वतःचे दैवी स्थानमहात्म्य टिकवून आहे.
प्राचीन वास्तू आणि मंदिरांमध्ये रुची असणार्यांनी या मंदिरास एकदा जरूर भेट द्यावी.
हेही वाचा – आयुष्याचं गणित बरोब्बर सोडविणारी… वनिता
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


